Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी गित्तीथच्या चालीवर बसवलेले कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत.
84 सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.
2 परमेश्वरा, मला वाट पहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे.
मला तुझ्या मंदिरात यायचे आहे.
माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे.
3 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना
आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात.
ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात
आणि तिथे त्यांना पिल्ले होतात.
4 तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात.
ते नेहमी तुझी स्तुती करतात.
5 जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात,
ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. [a]
6 ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला
झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण
केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो. [b]
7 लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना
एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात.
8 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक
याकोबाच्या देवा, माझे ऐक.
9 देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर.
तू निवडलेल्या राजाला दया दाखव.
10 तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे.
माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे.
11 परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे.
देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो
जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात
आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो.
12 सर्वशक्तिमान परमेश्वरा,
जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात.
शलमोन मंदिर उभारतो
5 हिराम हा सोराचा (तायरचा) राजा होता. त्याचे दावीदाशी सख्य होते. त्यामुळे त्याने शलमोन राज्यावर आल्याचे कळताच आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले. 2 शलमोनाने राजा हिरामला असा निरोप पाठवला.
3 “माझे वडील सतत युध्दात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही. सर्व शत्रूंचा पाडाव होईपर्यंत ते थांबले होते. 4 परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू नाहीत. माझ्या लोकांना कोणताही धोका नाही.
5 “परमेश्वराने माझ्या वडीलांना एक वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ एक मंदिर उभारण्याची माझी योजना आहे. 6 त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा. तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. पण मला तुमची मदत हवी आहे. आमचे सुतार तुमच्या सिदोनी सुतारांइतके कुशल नाहीत.”
7 हिरामला शलमोनाचा निरोप ऐकून फार आनंद झाला. तो म्हणाला, “दावीदाला एवढा ज्ञानी मुलगा या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.” 8 मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला:
“तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुला देईन. 9 माझे नोकर ती लबानोनपासून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करुन तुला हव्या त्या ठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तू ती झाडे घे.”
10 हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची झाडे दिली.
11 आणि शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी 1,20,000 बुशेल गहू आणि 1,20,000 गंलन निर्भेळ तेल दिले. 12 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे शलमोनाला शहाणपण दिले. आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले. या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला.
मागत राहा(A)
5-6 मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी कोणाला तरी एक मित्र होता. आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा मित्र नुकताच प्रवास करुन माझ्याकडे आला आहे. आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’ 7 आणि समजा तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! अगोदरच दार लावलेले आहे. आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला देण्यासाठी उठू शकत नाही.’ 8 मी तुम्हाला सांगतो जरी तो उठून त्याला कांही देण्याची टाळटाळ करील तरी त्याच्या मित्राच्या आग्रही वृत्तीमुळे तो खात्रीने उठून त्याला पाहिजे ते देईल. 9 आणि म्हणून मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल आणि ठोठवा म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल. 10 कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल. जो शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. 11 तुम्हांमध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? 12 किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल? 13 जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हांला तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे समजते, तर जे त्याच्याकडे मागतात त्यांना स्वर्गातील पिता किती तरी अधिक पवित्र आत्मा देईल?”
2006 by World Bible Translation Center