Revised Common Lectionary (Semicontinuous)
दाविदाचे गीत
101 मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन,
परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.
2 मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन.
परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?
3 मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही.
जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो.
मी तसे करणार नाही.
4 मी प्रामाणिक राहीन.
मी वाईट कृत्ये करणार नाही.
5 जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणे वाईट गोष्टी बोलत
असेल तर मी त्या माणसाला थांबवेन.
मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि
ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.
6 ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन
आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन.
जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.
7 मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही.
मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
8 मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन.
दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.
करारकोशाची मंदिरात स्थापना
8 इस्राएलमधील सगळी वडीलधारी मंडळी,. सर्व घराण्यांचे प्रमुख आणि कुटुंबातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरुशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून करारकोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले. 2 तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी एकत्र आली. तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा माहिना चालू होता आणि ते दिवस मंडपाचा सण ह्या विशेष उत्सवाचे होते.
3 इस्राएलची सर्व वडीलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला. 4 त्याबरोबरच सभामंडप आणि तिथली सर्व पवित्र उपकरणेही त्यांनी घेतली. या कामात याजकांना लेवींनी मदत केली. 5 राजा शलमोन व इस्राएलचे सर्व लोक करार कोशाच्या समोर आले. तेथे त्यांनी अनेक बळी अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते. 6 मग याजकांनी परमेश्वराचा तो करारकोश योग्य जागी ठेवला. मंदिरातील अतिपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला. 7 करुबांचे पंख पवित्र करारकोशावर पसरलेले होते. पवित्र कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते. 8 हे दांडे इतके लांब होते की अतिपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत. 9 करारकोशाच्या आत दोन शिलालेख होते. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता.
10 अतिपवित्र गाभाऱ्यात [a] हा पवित्र करारकोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले. त्याबरोबर मंदिर मेघाने व्यापले. 11 परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेल्यामुळे याजकांना आपले काम चालू ठेवता येईना. 12 तेव्हा शलमोन म्हणाला,
“आकाशात सूर्य तळपतो तो परमेश्वरामुळे,
पण तो स्वतःमात्र काळोख्या ढगात राहतो
13 तुला युगानुयूग राहाण्यासाठी हे मंदिर
मी तुझ्यासाठी बांधले आहे.”
14 सर्व इस्राएल लोक तेथे उभे होते. त्या समुदायाकडे वळून शलमोनाने देवाला त्यांना आशीर्वाद द्यायला सांगितले. 15 शलमोन राजाने मग एक दीर्घ प्रार्थना म्हटली. ती अशी:
“इस्राएलचा परमेश्वर देव महान आहे. माझे वडील दावीद यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने सर्व काही केले. परमेश्वर माझ्या वडीलांना म्हणाला, 16 ‘माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणूनही अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरुशलेम हे नगर मी निवडले आहे आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दावीदाची निवड केली आहे.’
17 “इस्राएलच्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या फार मनात होते. 18 पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘मंदिर उभारण्याची तुझी तीव्र इच्छा मी जाणून आहे. अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे. 19 पण तुझ्या हातून हे काम होणार नाही. तुझा मुलगा हे मंदिर उभारुन दाखवील.’
20 “परमेश्वराने अशा पध्दतीने आपले वचन खरे करुन दाखवले आहे. आता माझ्या वडीलांच्या गादीवर मी आलो आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे इस्राएल लोकांवर माझी सत्ता आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे. 21 त्यात पवित्र करारकोशासाठी एक गाभारा करवून घेतला आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांशी केलेला करार आहे. परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले तेव्हा केलेला तो करार यात आहे.”
येशू यहूदी पुढाऱ्यांविरुद्ध इशारा देतो(A)
14 शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते. एका भाकरीशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. 15 येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.”
16 मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तसे बोलला की काय?”
17 ते काय बोलतात हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हांला समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? 18 तुमचे डोळे आंधळे आहेत काय? तुमचे कान बहिरे आहेत काय? आपल्याकडे पुरेशा भाकरी नसताना मी काय केले हे तुम्हांला आठवत नाही काय? 19 पाच हजारांसाठी मी पाच भाकरी मोडल्या तेव्हा जे खाल्ले गेले नाही अशा भाकरींच्या किती टोपल्या तुम्ही गोळा केल्या ते आठवा.”
शिष्यांनी उत्तर दिले, “बारा टोपल्या.”
20 “चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?”
शिष्यांनी उत्तर दिले, “सात टोपल्या.”
21 मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हांला समजत नाही काय?”
2006 by World Bible Translation Center