Revised Common Lectionary (Semicontinuous)
दाविदाचे गीत
101 मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन,
परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.
2 मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन.
परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?
3 मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही.
जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो.
मी तसे करणार नाही.
4 मी प्रामाणिक राहीन.
मी वाईट कृत्ये करणार नाही.
5 जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणे वाईट गोष्टी बोलत
असेल तर मी त्या माणसाला थांबवेन.
मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि
ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.
6 ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन
आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन.
जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.
7 मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही.
मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
8 मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन.
दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.
शलमोनाचा राजवाडा
7 राजा शलमोनाने स्वतःसाठी महालही बांधला. त्याला तेरा वर्षे लागली. 2 लबानोनचे वनातील घरही त्याने बांधले. ते 150 फूट लांब, 95 फूट रुंद आणि 45 फूट उंच होते. देवदाराच्या स्तंभांच्या त्याला चार रांगा असून प्रत्येक स्तंभावर नक्षीदार घुमटी होती. 3 या स्तंभांवरुन देवदाराच्या तुळ्या घातलेल्या असून त्यावर छत म्हणून देवदाराच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या. 4 भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या. 5 दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या.
6 शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप 75 फूट लांब आणि 45 फूट रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभांची रांग होती.
7 न्यायनिवाडा करण्यासाठीही त्याने एक दालन बांधून घेतले. त्याला त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते.
8 याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या राजाची मुलगी म्हणजे शलमोनची बायको हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला.
9 या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या. 10 पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी 15 फूट व इतरांची बारा फूट होती.
11 त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते. 12 महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या भोवताली भिंत होती. तिला दगडांच्या तीन ओळी आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ होती.
9 “या वडिलांना (पूर्वजांना) योसेफाचा मत्सर वाटला. त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले, परंतु योसेफाबरोबर देव होता. 10 योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले. 11 मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला. आणि लोकांच्या दु:खाला अंत राहिला नाही. आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले.
12 “जेव्हा याकोबाने ऐकले की, इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले, ही पहिली वेळ होती. 13 ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करुन दिली. आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली. 14 मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना, आणि त्याच्या कुटुंबातील पंच्याहतर लोकांना इजिप्त येथे बोलावण्यासाठी पाठविले. 15 मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले. 16 नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहामाने शेखेम येथे हामोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले.
2006 by World Bible Translation Center