Revised Common Lectionary (Semicontinuous)
दाविदाचे गीत
101 मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन,
परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.
2 मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन.
परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?
3 मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही.
जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो.
मी तसे करणार नाही.
4 मी प्रामाणिक राहीन.
मी वाईट कृत्ये करणार नाही.
5 जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणे वाईट गोष्टी बोलत
असेल तर मी त्या माणसाला थांबवेन.
मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि
ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.
6 ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन
आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन.
जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.
7 मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही.
मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
8 मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन.
दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.
16 एकदा दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या. 17 त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. आम्ही दोघी गर्भवती होतो आणि आमचे दिवस भरत आले होते. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती. 18 तीन दिवसांनंतर ही पण प्रसूत झाली. आमच्याखेरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहात होतो. 19 एका रात्री ही बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मेले. 20 तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वतःकडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले. 21 दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.”
22 पण तेवढ्यात ती दुसरी बाई म्हणाली, “नाही, जिवंत मूलच माझे आहे, मेलेले बाळ तुझे आहे.”
पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मेले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्राकरे दोघींचाही राजासमोर कडाक्याचा वाद झाला.
23 तेव्हा राजा शलमोन म्हणाला, “जिवंत मूल आपले आणि मेलेले बाळ दुसरीचे असे तुम्ही दोघीही म्हणता.” 24 राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले. 25 राजा शलमोन म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करुन त्याचे दोन तुकडे करु आणि दोघींना एक एक देऊ.”
26 दुसरी बाई म्हणाली, “फार छान! बाळाचे दोन तुकडे करा, म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही.” पण पहिल्या बाईला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.”
27 तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्याला पहिल्या बाईच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.”
28 राजाचा हा निवाडा इस्राएलच्या लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना आदर वाटला. योग्य निर्णय घेण्याचे उच्च कोटीचे परमेश्वरी शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.
विशेष कामासाठी सात जणांची निवड केली जाते
6 अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याचवेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहूदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की, अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो, तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते. 2 बारा प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले.
प्रेषित त्यांना म्हणाले, “देवाचे वचन शिकविण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही! लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले. 3 म्हणून बंधूनो, तुमचे स्वतःचे सात लोक निवडा. लोकांनी त्यांना हे चांगले आहेत असे म्हटले पाहिजे. ते ज्ञानाने व आत्म्याने पूर्ण भरलेले असावेत. आणि त्यांना ही सेवा करण्यास आपण देऊ. 4 मग आपण संपूर्ण वेळ प्रार्थना करण्यात व देवाचे वचन शिकविण्यात घालवू शकतो.”
5 बंधुवर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या सात जणांची निवड केली: स्तेफन (मोठा विश्वास व पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप्प), [a] प्रखर, नीकनोर, तिम्मोन, पार्मिना आणि निकलाव (अंतुखियाकर जो यहूदी झाला होता). 6 नंतर त्यांनी या सात जणांना प्रेषितांसमोर उभे केले. प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली.
7 देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते. यरुशलेममधील अनुयायांचा गट मोठा होत होता. एकढेच नव्हे तर एका मोठ्या यहूदी याजकवर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या.
2006 by World Bible Translation Center