Revised Common Lectionary (Semicontinuous)
111 परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात
त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले.
2 परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या
चांगल्या गोष्टी लोकांना हव्या असतात.
3 देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो.
त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
4 परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे
हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
5 देव त्याच्या भक्तांना अन्न देतो.
देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.
6 देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या
त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
7 देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते.
त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
8 देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात.
त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
9 देव आपल्या माणसांना वाचवतो.
देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.
10 शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते.
जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात.
देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
दावीद राजाचा मृत्यू
2 दावीद राजाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला जवळ बोलवून सांगितले, 2 “आता मी जाणार. मरण सगळ्यांनाच अटळ आहे. तूही आता चांगला खंबीर, जबाबदार पुरुष झाला आहेस. 3 आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील. 4 तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील. परमेश्वराने मला सांगितले आहे ‘जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने तुझी मुले चालली तर इस्राएलचा राजा हा नेहमी तुझ्याच वंशातला असेल.’”
5 दावीद पुढे म्हणाला, “सरुवेचा मुलगा यवाब याने काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे हे शांततेच्या काळात केले. त्याचा तलवार खोचायचा कमरबंद आणि पायातले सैनिकी जोडे यांवर त्यांचे रक्त शिंपडले आहे. त्याला मीच शासन करायला हवे होते. 6 पण आता तू राजा आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा तू त्यांना धडा शिकवू शकतोस. तो मारला जाईल याची तू खात्री करुन घे. त्याला शांततेने म्हातारपणी मरण येता कामा नये.
7 “गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
8 “गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही. 9 पण आता त्याला तसा सोडू नकोस. तू सुज्ञ आहेस. काय करायचे ते तुला समजते. त्याला म्हातारपणी शांततेने मरु देऊ नकोस.”
10 मग दावीद मरण पावला. दावीद नगरात त्याचे दफन झाले. 11 हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे त्याने इस्राएलवर राज्य केले.
7 तेंव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी [a] स्त्री त्या विहीरीवर आली. येशू तिला म्हणाला. “मला प्यावयास पाणी दे.” 8 हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते.
9 ती शोमरोनी स्त्री म्हणाली, “तुम्ही यहूदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.” (यहूदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. [b] )
10 येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”
11 ती म्हणाली, “महाराज, जिवंत पाणी तुम्हांला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे. आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही. 12 आमचा पिता (पूर्वज) याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हांला दिली. ते स्वतः या विहीरीचे पाणी पीत असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहीरीचे पाणी पीत असत.”
13 येशू म्हणाला, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. 14 परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”
15 ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, “ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही. आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही.”
16 येशूने तिला सांगितले. “जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये!”
17 ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.”
येशू तिला म्हणाला, “हे तू बरोबर सांगितलेस की, तुला नवरा नाही. 18 खरे तर तुझे पाच पती झाले, आणि आता तू ज्याच्याबरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस.”
19 ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला आता कळले की, तुम्ही एक संदेष्टा आहात. 20 आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत. परंतु तुम्ही यहूदी लोक म्हणता की, यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहीजे.”
21 येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. 22 जे तुम्हांला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हांला चांगले कळते, कारण यहूदी लोकांकडूनच तारण येते. 23 असा काळ येत आहे की, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील. तशी वेळ आता आलेली आहे. आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. 24 देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”
25 ती स्त्री म्हणाली, “मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशीहा येईल तेव्हा तो आम्हांला प्रत्थेक गोष्ट समाजावून सांगेल.”
26 येशू म्हणाला, “ती व्यक्ति तुझ्याशी आता बोलत आहे. मीच तो मशीहा आहे.”
2006 by World Bible Translation Center