Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” याचालीवर बसवलेले दावीदाचे मास्कील तो शौलापासून गुहेत पळून गेला तेव्हाचे
57 देवा, माझ्यावर दया कर.
दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.
संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.
2 मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे मदतीसाठी प्रार्थना करीत आहे
आणि देव माझी पूर्णपणे काळजी घेत आहे.
3 तो स्वर्गातून मला मदत करतो
आणि मला वाचवतो.
मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो.
देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो.
4 माझे जीवन संकटात आहे,
माझ्याभोवती माझे शत्रू आहेत.
ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत.
त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत
आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.
5 देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस
आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर पसरली आहे.
6 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला.
ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
मी त्यात पडेन परंतु शेवटी
तेच त्या खड्यात पडतील.
7 परंतु देव मला सुरक्षित ठेवील.
तो मला साहसी करील.
मी त्याचे गुणगान गाईन.
8 माझ्या आत्म्या, जागा हो.
सतारींनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा.
आपण पहाटेला जागवू या.
9 माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो.
मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो.
10 तुझे खरे प्रेम आकाशातल्या सर्वांत उंचावरील ढगाहून उंच आहे.
11 देव स्वर्गापेक्षा खूप गौरवी आहे.
त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे.
यवाब दावीदाला खडसावतो
19 लोकांनी ही बातमी यवाबाला सांगितली. ते त्याला म्हणाले, “राजा अबशालोमसाठी शोक करत आहे. तो फार दु:खात आहे.” 2 दावीदाच्या सैन्याने त्या दिवशीची लढाई जिंकली होती. पण लोकांसाठी मात्र तो दु:खाचा दिवस ठरला. राजा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दु:खात आहे हे ऐकून लोक फार खिन्न झाले.
3 ते शांतपणे नगरात परतले. युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते. 4 राजा आपला चेहरा झाकून घेऊन आपला मुलगा अबशालोम याच्या नावाने “अरे माझ्या मुला अबशालोम” असा मोठ्याने आक्रोश करत होता.
5 यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्याला म्हणाला, “आपल्या सेवकांना तू आज मान खाली घालायला लावली आहेस. तुझ्या सेवकांनी तुझा जीव वाचवला. तुझी मुले, मुली, बायका दासी यांचे प्राण वाचवले. 6 ज्यांनी तुझा द्वेष केला त्यांच्यावर तू प्रेम दाखवतो आहेस आणि ज्यांनी तुझ्यावर लोभ केला त्यांना तू दूर सारतो आहेस. तुझी माणसे, तुझे सेवक यांना तुझ्या दृष्टीने काही किंमत नाही हे तुझ्या वागण्यावरुन स्पष्ट झाले आहे. आज अबशालोम जगला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर तुला फार आनंद झाला असता असे दिसते. 7 आता ऊठ आणि आपल्या सेवकांशी बोल. त्यांना प्रोत्साहन दे. आत्ताच उठून तू हे ताबडतोब केले नाहीस तर आज रात्रीपर्यंत तुझ्या बाजूला एकही माणूस उरणार नाही याची मी परमेश्वरासमक्ष ग्वाही देतो आणि हा तुझ्या बालपणापासूनच्या आयुष्यातला सर्वात मोठा आघात असेल.”
8 तेव्हा राजा उठून वेशीपाशी गेला. राजा तेथे आल्याची खबर सर्वत्र पसरली. तेव्हा सर्व जण राजाच्या दर्शनाला जमले.
दावीद पुन्हा राजा होतो
अबशालोमला पाठिंबा देणारे सर्व इस्राएल लोक आपापल्या ठिकाणी पळून गेले होते. 9 इस्राएलच्या सर्व घराण्यातील लोक आता बोलू लागले “पलिष्टी आणि आपले इतर शत्रू यांच्यापासून राजा दावीदाने आपल्याला संरक्षण दिले. पण तो अबशालोमपासून पळून गेला. 10 म्हणून अबशालोमची आपण राज्य करण्यासाठी निवड केली. पण तो आता लढाईत मरण पावला आहे. तेव्हा आपण आता पुन्हा दावीदाला राजा करु.”
11 सादोक आणि अब्याथार या याजकांना राजा दावीदाने निरोप पाठवला, “यहूदातील वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांना सांगा, राजा दावीदाला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे का आहा? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्राएल लोकांची बोलणी चाललेली आहेत. 12 तुम्ही माझे बांधव, माझ्या कुटुंबातीलच आहात. मग राजाला परत आणणारे तुम्ही शेवटचे घराणे का आहात? 13 आणि अमासाला सांगा, तुम्ही माझ्या कुटुंबाचाच भाग आहात. यवाबाच्या जागी सेनापती म्हणून मी तुमची नेमणूक केली नाही तर देव मला शासन करो.”
14 दावीदाने यहूदातील सर्व लोकांच्या हृदयाला हात घातला त्यामुळे ते सर्व एकदिलाने राजी झाले. यहूदी लोकांनी राजाला संदेश पाठवला की तुम्ही आणि तुमचे अधिकारी, सेवक यांनी माघारे यावे.
15 मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्याला भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करुन आणण्याचा त्यांचा मानस होता.
शिमीची क्षमायाचना
16 गेराचा मुलगा शिमी हा बन्यामीनच्या घराण्यातील होता. तो बहूरीम येथे राहात असे. यहूदातील लोकांसह राजाची भेट घ्यायला तो लगबगीने आला. 17 बन्यामीनच्या वंशातील हजार माणसेही त्याच्याबरोबर आली. शौलाच्या घराण्यातील सेवक सीबा हाही आला. आपले पंधरा मुलगे आणि वीस नोकर यांनाही त्याने बरोबर आणले. राजा दावीदाला भेटायला हे सर्व यार्देन नदीजवळ तात्काळ पोहोंचले.
18 राजाच्या कुटुंबियांना उतरुन घ्यायला ते यार्देनच्या पलीकडे गेले. राजाला हवे ते करायला ते तयार होते. राजा नदी ओलांडत असताना गेराचा मुलगा शिमी त्याच्या भेटीला आला. शिमीने राजाला जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले.
35 मग येशू म्हणाला. “मीच ती जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. 36 मी तुम्हांला पूर्वीच सांगितले की, तुम्ही मला पाहिले, तरीही विश्वास ठेवीत नाही. 37 पिता माझे लोक मला देतो. त्यातील प्रत्येकजण माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी स्वीकारीन. 38 मी स्वर्गातून खाली आलो, ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. मला पाहिजे ते करायला मी आलो नाही. 39 देवाने मला दिलेल्या लोकांपैकी एकालाही मी गमवू नये. परंतु त्या सर्वांना मी शेवटच्या दिवशी जिवंत असे उठवायला हवे. ज्याने मला पाठविले त्याची मी हेच करावे अशी इच्छ आहे. 40 पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनंतकाळचे जीवन आहे. मी त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी उठवीन, हेच माझ्या पित्याल हवे.”
2006 by World Bible Translation Center