Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” याचालीवर बसवलेले दावीदाचे मास्कील तो शौलापासून गुहेत पळून गेला तेव्हाचे
57 देवा, माझ्यावर दया कर.
दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.
संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.
2 मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे मदतीसाठी प्रार्थना करीत आहे
आणि देव माझी पूर्णपणे काळजी घेत आहे.
3 तो स्वर्गातून मला मदत करतो
आणि मला वाचवतो.
मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो.
देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो.
4 माझे जीवन संकटात आहे,
माझ्याभोवती माझे शत्रू आहेत.
ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत.
त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत
आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.
5 देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस
आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर पसरली आहे.
6 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला.
ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
मी त्यात पडेन परंतु शेवटी
तेच त्या खड्यात पडतील.
7 परंतु देव मला सुरक्षित ठेवील.
तो मला साहसी करील.
मी त्याचे गुणगान गाईन.
8 माझ्या आत्म्या, जागा हो.
सतारींनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा.
आपण पहाटेला जागवू या.
9 माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो.
मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो.
10 तुझे खरे प्रेम आकाशातल्या सर्वांत उंचावरील ढगाहून उंच आहे.
11 देव स्वर्गापेक्षा खूप गौरवी आहे.
त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे.
यवाब दावीदाकडे हे वृत्त पाठवतो
19 सादोकचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला, “मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्याला सांगतो.”
20 यवाब त्याला म्हणाला, “आज तुला दावीदाकडे ही बातमी घेऊन जाता येणार नाही. नंतर जाऊन तू सांग पण आज नको. कारण खुद्द राजाचा मुलगा मरण पावला आहे.”
21 मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, “तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग.”
त्या माणसाने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.
22 सादोकचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली “काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे.”
यवाब म्हणाला, “मुला. तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही.”
23 अहीमास म्हणाला, “त्याची मला पर्वा नाही मला जाऊ द्या.”
तेव्हा यवाबाने त्याला परवानगी दिली.
अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.
दावीद बातमी ऐकतो
24 राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्येच बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढला. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला एक माणूस धावत येताना दिसला. 25 पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले.
राजा दावीद म्हणाला, “तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे.”
धावता धावता तो माणूस शहराच्या जवळ येऊन पोचतोय तोच 26 पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, “तो पाहा, आणखी एक माणूस एकटाच धावत येतोय.”
तेव्हा राजा म्हणाला, “तो ही बातमी आणतोय.”
27 पहारेकरी म्हणाला, “पहिल्याचे धावणे मला सादोकचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते.”
राजा म्हणाला, “अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार”
28 अहीमासने “सर्व कुशाल असो” असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, “देव परमेश्वराला धन्यवाद द्या. धनीस्वामी, तुमच्याविरुध्द ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे.”
29 राजाने विचारले, “अबशालोमचे कुशल आहे ना?”
अहीमास म्हणाला, “यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही.”
30 राजाने मग त्याला बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला.
31 मग तो कूशी आला तो म्हणाला, “माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांना परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.”
32 राजाने त्याला विचारले, “अबशालोम ठीक आहे ना?”
त्यावर कूशीने सांगितले, “तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणसा सारखीच (अबशालोमसारखी) गत होवो.”
33 (यावरुन अबशालोम मरण पावला हे राजाला उमगले) तो फार शोकाकुल झाला. वेशीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्याला रडू कोसळले. आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, “अबशालोम, माझ्या मुला, तुझ्या ऐवजी मीच मरायला हवे होते रे पोरा!”
14 म्हणून प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी तुम्ही या गोष्टींची वाट पाहत आहात, त्याअर्थी आपणास प्रभूसमोर डागरहीत, दोषरहित व शांतता टिकविण्यांचा आटोकाट प्रयत्न करा. 15 आणि ही गोष्ट मनामध्ये ठेवा की, आपल्या प्रभूचा धीर म्हणजे तारण, ज्याप्रमाणे आपला प्रिय बंधू पौल याला देवाने दिलेल्या शहाणपणामुळे त्याने तुम्हांला लिहिले. 16 त्या पत्रात, जसे इतर सर्व पत्रांत असते, त्याप्रमाणे तो या गोष्टीविषयी सांगतो. त्याच्या पत्रामध्ये काही गोष्टी आहेत ज्या समजण्यास कठीण आहेत. अज्ञानी व चंचल मनाचे लोक पवित्र शास्त्रातील इतर गोष्टींप्रमाणे या गोष्टींचादेखील विपर्यास करुन गैर अर्थ लावतात व परिणामी आपला स्वतःचा नाश करुन घेतात.
17 यासाठी, प्रिय मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी अगोदरच माहीत असल्याने स्वतःचे रक्षण करा. यासाठी की, नियमशास्त्रविरहित लोकांच्या चुकीमुळे तुम्ही भरकटत जाऊ नये आणि तुमची जी विश्वासाविषयीची अढळ भूमिका आहे, तिच्यापासून विचलित होऊ नये म्हणून संभाळा. 18 परंतु आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत राहा. त्याला आता आणि अनंतकाळपर्यंत गौरव असो.
2006 by World Bible Translation Center