Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” याचालीवर बसवलेले दावीदाचे मास्कील तो शौलापासून गुहेत पळून गेला तेव्हाचे
57 देवा, माझ्यावर दया कर.
दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.
संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.
2 मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे मदतीसाठी प्रार्थना करीत आहे
आणि देव माझी पूर्णपणे काळजी घेत आहे.
3 तो स्वर्गातून मला मदत करतो
आणि मला वाचवतो.
मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो.
देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो.
4 माझे जीवन संकटात आहे,
माझ्याभोवती माझे शत्रू आहेत.
ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत.
त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत
आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.
5 देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस
आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर पसरली आहे.
6 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला.
ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
मी त्यात पडेन परंतु शेवटी
तेच त्या खड्यात पडतील.
7 परंतु देव मला सुरक्षित ठेवील.
तो मला साहसी करील.
मी त्याचे गुणगान गाईन.
8 माझ्या आत्म्या, जागा हो.
सतारींनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा.
आपण पहाटेला जागवू या.
9 माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो.
मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो.
10 तुझे खरे प्रेम आकाशातल्या सर्वांत उंचावरील ढगाहून उंच आहे.
11 देव स्वर्गापेक्षा खूप गौरवी आहे.
त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे.
अबशालोमच्या बेताचा राजाला सुगावा लागतो
13 एकाने दावीदाकडे येऊन वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे.
14 तेव्हा यरुशलेममध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, “आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरुशलेमच्या लोकांना तो मारून टाकेल.”
15 तेव्हा राजाचे सेवक त्याला म्हणाले, “तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत.”
दावीद आपल्या लोकांसह निसटतो
16 आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्न्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले. 17 राजा आणि त्याच्यामागोमाग सर्व लोक निघून गेले. अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले 18 त्याचे सर्व सेवक तसेच एकूणएक करथी, पलेथी आणि (सहाशे गित्ती) राजामागोमाग चालत गेले.
19 गथ येथील इत्तयला राजा म्हणाला, “तू ही आमच्याबरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे. तू परकाच आहेस ही तुझी माय भूमी नव्हे. 20 तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार. तू कशाला भटकंत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर. तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.”
21 पण इत्तय राजाला म्हणाला, “परमेश्वराची शपथ, तुम्ही जिवंत असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आता जगणे, मरणे तुमच्याबरोबरच.”
22 दावीद इत्तयला म्हणाला, “मग चल तर किद्रोन ओहोळा पलीकडे आपण जाऊ.”
तेव्हा इत्तय आपल्या बरोबरच्या सर्व मुला-माणसांसह किद्रोन ओहोळा पलीकडे गेला. 23 सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते. राजाने ही किद्रोन झरा ओलांडला. मग सर्व जण वाळवंटाकडे निघाले. 24 सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा करारकोश घेऊन निघाले होते. त्यांनी देवाचा पवित्रकोश खाली ठेवला. यरुशलेममधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून प्रार्थना म्हणत होता. [a]
25 राजा दावीद सादोकला म्हणाला, “हा देवाचा पवित्र कोश यरुशलेमला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरुशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल. 26 पण तो माझ्यावर प्रसन्न नसेल तर त्याच्या मनात असेल ते माझे होईल.”
27 पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, “तू द्रष्टा आहेस तू सुखरुप नगरात परत जा. तुझा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा. 28 हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.”
29 तेव्हा देवाचा पवित्र करारकोश घेऊन सादोक आणि अब्याथार यरुशलेमला परतले आणि तिथेच राहिले.
दावीदाचे अहिथोफेल विरुद्ध गाऱ्हाणे
30 दावीद शोक करत जैतूनच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला. त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले. तेही रडत होते.
31 एकाने दावीदाला सांगितले, “अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे.” तेव्हा दावीदाने देवाची करुणा भाकली. तो म्हणाला, “परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.”
5 प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा, 2 आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.
3 जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नावही निघू नये, हे देवाच्या पवित्र लोकांसाठी योग्य नाही. 4 तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. उलट उपकारस्तुति असावी. 5 कारण तुम्हांला हे माहीत असावे की: जो मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा अधाशी जे मूर्तिपूजेसारखेच आहे, त्या मनुष्याला देवाच्या आणि ख्रिस्ताच्या राज्यात वतन असणार नाही.
6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये. कारण या कारणांमुळे जे आज्ञा मोडतात, त्यांच्यावर देवाचा क्रोध येणार आहे. 7 म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका. 8 मी हे सांगतो कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूचे अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. 9 कारण प्रकाशाची फळे प्रत्येक चांगुलपणात, नीतीमत्वात, आणि सत्यात दिसून येतात. 10 नेहमी प्रभूला कशाने संतोष होईल हे शोधण्याचा प्रयत्न करा. 11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्यांचे भागीदार होऊ नका. तर उलट, ती उघडकीस आणा. 12 कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयी बोलणेही लज्जास्पद आहे. 13 पण जेव्हा सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते, तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते. 14 आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते, ती प्रकाश आहे. म्हणूनच आम्ही असे म्हणतो:
“हे झोपलेल्या जागा हो
व मेलेल्यांतून ऊठ,
आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”
2006 by World Bible Translation Center