Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
2 माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
3 परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
4 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.
5 मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
6 मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
7 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
8 परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
25 अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरुन प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याचा देह नखशिखान्त निर्दोष, नितळ होता. 26 दरवर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत असे. ते पाच पौंड भरत. 27 त्याला तीन मुलगे आणि एक मुलगी होती. या मुलीचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती.
अबशालोम यवाबाला भेटायला बोलावण्याची सक्ती करतो
28 यरुशलेम मध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत राजा दावीदाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही. 29 तेव्हा अबशालोमने यवाबाकडे आपल्या सेवकाला पाठवले. आपली राजाशी भेट घडवून आणावी असा निरोप दूतांकरवी यवाबाला दिला. पण यवाब अबशालोमकडे आला नाही. अबशालोमने त्याला पुन्हा बोलावणे पाठवले तरीही तो येईना.
30 तेव्हा मात्र अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला, “माझ्या शेताला लागूनच यवाबाचे शेत आहे. त्यात जवाचे पीक आले आहे ते पेटवून द्या”
अबशालोमच्या सेवकांनी त्याप्रमाणे यवाबाच्या शेतात आग लावली. 31 तेव्हा यवाब उठून अबशालोमकडे आला आणि त्याला म्हणाला “तुझ्या सेवकांनी माझ्या शेतात जाळपोळ का केली?”
32 अबशालोम यवाबाला म्हणाला, “मी निरोप पाठवून तुला बोलावणे धाडले होते. तुला मी राजाकडे पाठवणार होतो. गशूरहून त्याने मला का बोलावले ते मी तुला त्याला विचारायला सांगणार होतो. मी त्याचे दर्शन घेऊ शकत नसेन तर गशूरहून मी इथे येण्यात काय मतलब? तेव्हा मला त्याला भेटू दे. माझा काही अपराध असला तर त्याने मला खुशाल मारून टाकावे.”
अबशालोमची राजा दावीदाशी भेट
33 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले. राजाने अबशालोमला बोलावले. अबशालोम आला. त्याने राजाला वाकून अभिवादन केले. राजाने त्याचे चुंबन घेतले.
एकमेकांना मदत करा
6 बंधूंनो, कोणी दोषात सापडला, तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे. पण ते सौम्यतेच्या आत्म्याने हे करा. आणि स्वतःकडे लक्ष ठेवा. यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये. 2 एकमेकांची ओझी वाहा. अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. 3 कारण जर कोणी स्वतःला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी, तर तो स्वतःची फसवणूक करुन घेतो. 4 प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वतःची इतरांबरोबर तुलना न करता स्वतःविषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल. 5 कारण प्रत्येकाला त्याची स्वतःची जबाबदारी असलीच पाहिजे.
जीवन हे शेत पेरणान्यासारखे आहे
6 ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.
7 तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल. 8 जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. पण जो आत्म्यात बीज पेरतो, त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. 9 जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करु नये. कारण आपण आळस केला नाही, तर योग्य वेळी आपणांस आपले पीक मिळेल. 10 तर मग ज्याप्रमाणे आपणांस संधि मिळेल, तसे सर्व लोकांचे आणि विशेषतः ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करु या.
2006 by World Bible Translation Center