Revised Common Lectionary (Semicontinuous)
16 देव दुष्ट लोकांना म्हणतो,
“तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता.
तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता.
17 मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता?
मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर राहाण्यासाठी तुम्ही पळत सुटता.
तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर झोपता.
19 तुम्ही वाईट गोष्टी सांगता आणि खोटे बोलता.
20 तुम्ही इतरांविषयी सतत वाईट बोलता.
स्वत:च्या भावाविषय़ी सुध्दा!
21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे
तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही.
आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते.
पण मी मुळीच गप्प बसणार नाही.
मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन
आणि तुमच्या तोंडावर टीका करीन.
22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात.
मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच
तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले
तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
23 म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो.
जर एखाद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
20 तेव्हा अबशालोम या तिच्या भावाने तिला विचारले, “तू अम्नोनकडे गेली होतीस का? त्याने तुला त्रास दिला का? आता तू शांत हो. तो तुझा भाऊ आहे. तेव्हा त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू याचा त्रास करुन घेऊ नकोस.” यावर तामार काही बोलली नाही. ती शांतपणे अबशालोमच्या घरी राहायला गेली.
21 हे सर्व राजा दावीदाच्या कानावर गेले. तो संतापला. 22 अबशालोमला अम्नोनचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनने आपल्या बहिणीशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.
अबशालोमचा सूड
23 दोन वर्षानंतर, मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते. अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले. 24 अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, “मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत. आपल्या नोकरासहित येऊन हे दृश्य पाहा.”
25 तेव्हा राजा दावीद त्याला म्हणाला, “मुला आम्ही सर्व जण येणं काही शक्य नाही. तुझ्यावरही त्याचा भार पडेल.”
अबशालोमने दावीदाची खूप आर्जवे केली. दावीद गेला नाही पण त्याने आपले आशीर्वाद दिले.
26 अबशालोम म्हणाला, “तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा.”
राजा दावीद म्हणाला, “तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे?”
27 पण अबशालोमने आपला हटृ सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोम बरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली.
अम्नोनची हत्या
28 अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “अम्नोनवर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत घेत त्याला जेव्हा त्याची नशा चढेल तेव्हा मी तुम्हाला संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करुन तुम्ही त्याला ठार करा. शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा.”
29 तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली.
अम्नोनच्या वधाची बातमी दावीदाला समजते
30 राजाचे मुलगे नगराच्या वाटेवर असतानाच राजा दावीदाला या घडामोडीची खबर मिळाली, ती अशी, “अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले. कोणालाही त्यातून वगळले नाही.”
31 राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली.
32 पण, दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, “सर्व मुले गेली असे समजू नकोस. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती. 33 स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करुन समजू नका. फक्त अम्नोन गेला.”
34 अबशालोमने पळ काढला नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता.
त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकांना येताना पाहिले. 35 तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, “बघा, मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत.”
36 योनादाबचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे अधिकारीही शोक करु लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला.
येशू चार हजारांपेक्षा अधिक लोकांना जेवू घालतो(A)
8 त्या दिवसात आणखी एका वेळी लोकांचा मोठा समुदाय जमला. त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांस बोलाविले आणि त्यांना म्हणाला, 2 “मला या लोकांचा कळवळा येतो कारण तीन दिवसांपासून ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. 3 मी जर त्यांना उपाशी घरी पाठविले तर ते रस्त्यातच शुद्ध हरपून पडतील. त्यांच्यातील काही फार दुरून आले आहेत.”
4 त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “या निर्जन जागी एवढ्या लोकांना पुरतील इतक्या भाकरी कोण मिळवू शकेल काय?”
5 येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”
शिष्य म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत.”
6 नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या. नंतर त्यानी त्या लोकांना वाढल्या. 7 त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते मग त्याने त्यावर आभार मानले व त्यांना तेही वाढावयास दिले.
8 लोक जेवुन तृप्त झाले. उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या. 9 तेथे सुमारे चार हजार पुरुष होते. नंतर त्याने त्यांना घरी पाठवले. 10 आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला व दल्मनुथा प्रांतात आला.
2006 by World Bible Translation Center