Revised Common Lectionary (Semicontinuous)
16 देव दुष्ट लोकांना म्हणतो,
“तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता.
तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता.
17 मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता?
मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर राहाण्यासाठी तुम्ही पळत सुटता.
तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर झोपता.
19 तुम्ही वाईट गोष्टी सांगता आणि खोटे बोलता.
20 तुम्ही इतरांविषयी सतत वाईट बोलता.
स्वत:च्या भावाविषय़ी सुध्दा!
21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे
तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही.
आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते.
पण मी मुळीच गप्प बसणार नाही.
मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन
आणि तुमच्या तोंडावर टीका करीन.
22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात.
मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच
तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले
तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
23 म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो.
जर एखाद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
अम्नोन आणि तामार
13 दावीदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती. ती दिसायला फार सुरेख होती. दावीदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता. 2 त्याचे तामारवर प्रेम होते. तामार कुमारिका होती. तिच्याशी वावगे वागण्याची त्याची छाती नव्हती. पण तिच्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा होती. तिच्याविषयी विचार करून करून तो आजारी पडला.
3 अम्नोनला योनादाब नावाचा मित्र होता. दावीदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा. योनादाब धूर्त होता. 4 तो अम्नोनला म्हणाला, “दिवसेंदिवस तू क्षीण होत चालला आहेस. तू तर राजपुत्र! खायची प्यायची रेलचेल असताना तू असा अशक्त का होत आहेस? माझ्यापाशी मनमोकळे कर.”
तेव्हा अम्नोन योनादाबला म्हणाला, “माझे तामार वर प्रेम आहे, पण ती माझा सावत्र भाऊ अबशालोमची बहीण आहे.”
5 योनादाब यावर अम्नोनला म्हणाला, “आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा. मग वडील भेटायला आले की त्यांना सांग, ‘तामारला माझ्याकडे येऊ द्या. तिने मला खायला घालू द्या. माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करु द्या. मग तो तिच्या हातून मी खाईन’”
6 तेव्हा अम्नोन आजारी असल्याचे भासवून बिछान्यावर झोपून राहिला. राजा दावीद त्याच्या समाचाराला आला. त्याला तो म्हणाला, “तामारला माझ्याकडे पाठवा. तिला इथे माझ्यादेखत दोन पोव्व्या करु द्या आणि मला भरवू द्या. मग मी त्या खाईन.”
7 दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, “आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर.”
8 तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन कडे गेली. तो पलंगावरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोळ्या केल्या अम्नोन हे सर्व पाहात होता. 9 पोळ्या तयार झाल्यावर तव्यावरून काढून तिने त्या अम्नोनसाठी ताटात मांडल्या पण अम्नोन ते काही केल्या खाईना. मग आपल्या नोकरांना त्याने बाहेर निघून जाण्याची आज्ञा देऊन तिथून घालवले. सर्व नोकर बाहेर पडले.
अम्नोनचा तामारवर बलात्कार
10 यानंतर अम्नोन तामारला म्हणाला, “ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव.”
तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली. 11 त्याला ती भरवू लागली तोच त्याने तिचा हात धरला. तिला तो म्हणाला, “हे बहिणी, ये आणि माझ्याजवळ झोप.”
12 तामार त्याला म्हणाली, “भाऊ नको! अशी बळजबरी तू माझ्यावर करु नकोस. ही मोठी शरमेची गोष्ट आहे. असल्या भयंकर गोष्टी इस्राएलमघ्ये कदापि घडता कामा नयेत. 13 मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल. लोकांच्या दृष्टीने तू इस्राएलमधल्या अनेक मूर्खांपैकी एक ठरशील. तू कृपा करुन राजाशी बोल. तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल.”
14 पण अम्नोनने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शक्तीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला. 15 मग तिच्याबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. पूर्वी त्याचे तिच्यावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा अधिक तो आता तिचा द्वेष करु लागला. त्याने तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितले.
16 तामार त्याला म्हणाली, “नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस. ते तर तुझ्या या आत्ताच्या कृत्यापेक्षाही वाईट होईल.”
पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले. 17 नोकरांना बोलावून तो म्हणाला, “हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा आणि दार बंद करून टाका.”
18 तेव्हा अम्नोनच्या नोकराने तिला तेथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला.
तामरने रंगीबेरंगी, पट्ट्यापट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता. राजकन्या लग्नापूर्वी असा पोषाख करत असत. 19 तामारने उद्विग्न मनःस्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करु लागली.
27 म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात 28 शिवाय देवाने मंडळीत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, जे चमत्कार करतात ते, ज्यांना आरोग्य देण्याचे दान आहे ते, 29 जे लोक मदत करतात, जे पुढारीपण करतात व ज्या लोकांना भिन्न भिन्न भाषा बोलण्याचे दान आहे, असे लोक ठेवले आहेत. म्हणजे सर्वच प्रेषित नाहीत, सर्वच संदेष्टे नाहीत, सर्वच शिक्षक नाहीत, सर्वांनाच चमत्कार करण्याची शक्ति नाही. 30 सर्वांनाच आरोग्य देण्याची दाने नाहीत, सर्वच अन्य भाषेत बोलत नाहीत, सर्वांनाच भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ति नाही. 31 तथापि आत्म्याच्या अधिक मोठ्या दानांसाठी प्रयत्न करा. आणि आता मी तुम्हांस ह्याहूनही उत्तम मार्ग दाखवितो.
2006 by World Bible Translation Center