Revised Common Lectionary (Semicontinuous)
16 देव दुष्ट लोकांना म्हणतो,
“तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता.
तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता.
17 मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता?
मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर राहाण्यासाठी तुम्ही पळत सुटता.
तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर झोपता.
19 तुम्ही वाईट गोष्टी सांगता आणि खोटे बोलता.
20 तुम्ही इतरांविषयी सतत वाईट बोलता.
स्वत:च्या भावाविषय़ी सुध्दा!
21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे
तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही.
आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते.
पण मी मुळीच गप्प बसणार नाही.
मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन
आणि तुमच्या तोंडावर टीका करीन.
22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात.
मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच
तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले
तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
23 म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो.
जर एखाद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
दावीद आणि बथशेबा यांच्या मुलाचा मृत्यू
15 यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला. 16 दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
17 घरातील वडीलधाऱ्या माणसांनी येऊन दावीदाला जमिनीवरुन उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तिथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला. 18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, “मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे. मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करुन घेईल.”
19 पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली. त्यावरुन मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, “मूल गेले का?”
नोकरांनी “होय” म्हणून उत्तर दिले.
20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला त्यांने आंघोळ केली, कपडे बदलून तयार झाला. मग आराधना करण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यानंतर घरी जाऊन त्याने खायला मागितले. सेवकांनी त्याला वाढले आणि तो जेवला.
21 दावीदाचे सेवक त्याला म्हणाले, “तुम्ही असे का वागत आहात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात. शोक केलात पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.”
22 दावीदाने सांगितले, “मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला कारण मला वाटले, न जाणो, परमेश्वराला माझी दया येईल आणि बाळ जगेल 23 पण आता ते गेलेच तेव्हा आता मी कशासाठी उपास करु? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही.”
शलमोनचा जन्म
24 दावीदाने मग आपली बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीर संबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराचा लोभ होता. 25 त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला नाथानने त्याचे नांव यदीद्या, म्हणजेच “देवाला प्रिय” असे ठेवले. देवाच्या वतीने नाथानने हे केले.
अशा मार्गाने तुम्ही जगावे
17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात सावध करतो: ज्याप्रमाणे विदेशी त्यांच्या मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. 18 त्यांची अंतःकरणे अंधकारमय अशा स्थितीत आहेत आणि देवापासून जे जीवन येते त्यापासून ते वेगळे झाले आहेत. कारण ते अजाण आहेत, आणि त्याची अंतःकरणे कठीण झाली आहेत. 19 त्यांना आता कशाचीच लाज वाटत नाही व त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेच्या सवयीला वाहून घेतले आहे. 20 परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही. आणि 21 मला यात काही शंका नाही की, तुम्ही त्याच्याविषयी ऐकले आहे. आणि येशूमध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे त्याचे अनुयायी म्हणून ते सत्य तुम्ही शिकला असाल. 22 तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी, तुम्हांला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करुन घेण्यास शिकविले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे. 23 यासाठी तुम्ही अंतःकरणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि 24 नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे.
2006 by World Bible Translation Center