Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचा बथशेबाशी विवाह
26 उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले. तिने पतिनिधनाबद्दल शोक केला. 27 काही काळाने तिचे दु:ख ओसरल्यावर दावीदाने सेवकांकरवी तिला आपल्याकडे आणवले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या मुलाला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वराला पसंत पडले नाही.
नाथान दावीदाशी बोलतो
12 परमेश्वराने नाथानला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, “एका नगरात दोन माणसे होती. एक श्रीमंत होता आणि एक गरीब. 2 श्रीमंत माणसाकडे मेंढरे आणि गुरे भरपूर होती. 3 पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब माणसाच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली. त्याच्याच अन्नातला घास ती खाई, त्याच्याच कपातले पाणी ती पिई. त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे. त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती.
4 “एकदा एक प्रवासी श्रीमंत माणसाकडे आला. त्या प्रवाश्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत माणसाची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्याला काही काढून घ्यायचे नव्हते. तेव्हा त्याने त्या गरीब माणसाची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या प्रवाश्यासाठी अन्न शिजवले.”
5 दावीदाला या श्रीमंत माणसाचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, “परमेश्वराची शपथ, या माणसाला प्राणदंड मिळाला पाहिजे 6 त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत. कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्याला दया आली नाही.”
नाथान दावीदाला त्याच्या पापाबद्दल सांगतो
7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तूच तो माणूस आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, ‘इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला. तुला शौलापासून वाचवले. 8 त्याचे घरदार आणि बायका तुझ्या स्वाधीन केल्या. इस्राएल आणि यहूदाचा तुला राजा केले. एवढे पुरेसे नव्हते म्हणून तुला आणखीही देत राहिलो. 9 असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस आणि त्याच्या बायकोचा स्वतःची बायको म्हणून स्वीकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास. 10 तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या बायकोचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.’
11 “परमेश्वर म्हणतो, ‘आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या बायका तुझ्यापासून मी हिरावून घेऊन त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायका बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल. 12 बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलां देखत होईल.’”
13 मग दावीद नाथानला म्हणाला, “माझ्याहातून परमेश्वराचा मोठाच अपराध घडला आहे.”
नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने हा तुझा अपराध पोटात घातला आहे. तू मरणार नाहीस.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र दावीदाने बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर भविष्यवेता नाथान त्याच्याकडे आला तेव्हाचे स्तोत्र
51 देवा, माझ्यावर दया कर,
तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने
आणि तुझ्या महान कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देवा माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक.
माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे.
ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत
असे सांगतोस त्याच मी केल्या.
देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले.
मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास.
तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या
आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल
तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर.
मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग.
तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस,
ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्रदय निर्माण कर.
माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि
तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो,
मला पुन्हा तुझा आनंद दे,
माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
शरीराचे ऐक्य
4 म्हणून मी, जो प्रभूमधील कैदी, (दास) तो तुम्हांला विनंती करतो, देवाकडून तुम्हांला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल अशा प्रकारे राहा. 2 नेहमी नम्रता, सौम्यता दाखवा. आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा. 3 शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा. 4 एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलाविले होते. 5 एक प्रभु, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, 6 एक देव आणि पिता जो सर्वांचा मालक आहे. जो प्रत्येक गोष्टीद्वारे कार्य करतो आणि जो प्रत्येकात आहे,
7 ख्रिस्ताच्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणांस प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे. 8 यासाठीच पवित्र शास्त्र असे म्हणते.
“जेव्हा तो उच्चस्थानी चढला,
तेव्हा त्याने युद्धकैद्दांस आपणांबरोबर नेले
आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.” (A)
9 आता, जेव्हा ते असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या खालील प्रदेशात सुध्दा उतरला असाच होतो की नाही? 10 जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याला भरता याव्यात. 11 आणि त्याने स्वतःच काही लोकांना प्रेषित, इतर काही जणांना भविष्य सांगणारे सुवार्तिक, तर दुसऱ्यांना मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली. 12 ख्रिस्ताने त्या देणग्या देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व आत्मिकरीतीने ख्रिस्ताचे शरीर सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या. 13 आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोंचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते.
14 हे असे आहे म्हणून यापूढे आपण लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपटयोजनेला महत्त्व देते, अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत 15 त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे. ख्रिस्त हा मस्तक आहे. 16 ज्यावर सर्व शरीर आधारित आहे, ते आधार देणाऱ्या प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले आणि एकत्र बांधलेले असते. आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो, संपूर्ण शरीर वाढते व प्रीतीत बळकट होत जाते.
24 आता येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोकांनी पाहिले. म्हणून लोक नावांमध्ये बसले आणि कफर्णहूमला गेले. त्यांना येशूला शोधायचे होते.
येशू जीवनाची भाकर
25 लोकांना येशू सरोवराच्या दुसऱ्या काठावर भेटला. लोक म्हणाले, “गुरुजी, तुम्ही इकडे कधी आलात?”
26 येशूने उत्तर दिले, “तुम्ही माझा शोध का करता? माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का? मी तुम्हांस खरे सांगतो, तुम्ही मला शोधता, कारण तुम्ही भाकरी खाल्या आणि तुमची तृप्ती झाली. 27 ऐहिक अन्न नाश पावते. म्हणून नाश पावणाऱ्या अन्नासाठी कष्ट करु नका. परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंतकाळचे जीवन देते, अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा. मनुष्याचा पुत्र ते अन्न तुम्हांला देईल. देव जो पिता याने दाखवून दिले आहे की, तो मनुष्याच्या पुत्राबरोबर आहे.”
28 लोकांनी येशूला विचारले, “आम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात अशी देवाची इच्छा आहे?”
29 येशूने उत्तर दिले, “तुम्ही जे काम करावे अशी देवाची इच्छा आहे, ते हेच की, देवाने ज्याला पाठविले, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
30 मग लोक येशूला म्हणाले, “देवाने तुम्हांलाच पाठविले आहे हे पटविण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार कराल? तुम्हांला एखादा चमत्कार करताना जर आम्ही पाहिले तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. तुम्ही काय कराल? 31 अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला मान्ना खाल्ला. पावित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायाला दिली.”
32 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो. मोशेने तुमच्या लोकांना स्वर्गातील भाकर दिली नाही. माझा पिता तुम्हांला खरी स्वर्गीय भाकर देतो. 33 देवाची भाकर कोणती? देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो, तोच ती भाकर.”
34 ते लोक येशूला म्हणाले, “महाराज, आम्हांला हीच भाकर नेहमी द्या.”
35 मग येशू म्हणाला. “मीच ती जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
2006 by World Bible Translation Center