Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र दावीदाने बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर भविष्यवेता नाथान त्याच्याकडे आला तेव्हाचे स्तोत्र
51 देवा, माझ्यावर दया कर,
तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने
आणि तुझ्या महान कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देवा माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक.
माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे.
ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत
असे सांगतोस त्याच मी केल्या.
देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले.
मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास.
तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या
आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल
तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर.
मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग.
तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस,
ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्रदय निर्माण कर.
माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि
तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो,
मला पुन्हा तुझा आनंद दे,
माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
मिद्यानचे इस्राएल लोकांशी युध्द
6 नंतर पुन्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराने निषिध्द म्हणून सांगितलेल्या गोष्टी केल्या. तेव्हा परमेश्वराने मिद्यानच्या लोकांच्या अंमलाखाली त्यांना सलग सात वर्षे ठेवले.
2 मिद्यानचे लोक बलशाली होतेच, पण इस्राएल लोकांशी क्रौर्यानेही वागत. तेव्हा इस्राएल लोकांनी लपून बसण्यासाठी डोंगरांमध्ये गुहा केल्या. गुहांमध्ये आणि दुर्गम अशा ठिकाणी ते अन्नधान्य ठेवत. 3 कारण मिद्यानी आणि पूर्वेकडील अमालेकी वारंवार त्यांच्या पिकांची नासधूस करत. 4 ते या प्रदेशात तळ देत आणि इस्राएल लोकांनी पेरलेल्या पिकांचा नाश करत. थेट गज्जा पर्यंतच्या जमिनीतील उत्पन्नाची वाट लावली. त्यामुळे इस्राएल लोकांसाठी काहीच शिल्लक राहिले नाही. शेव्व्यामेंढ्या, गुरेढोरे, गाढवे देखील त्यांना राहिली नाहीत. 5 आपला कुटुंब कबिला आणि जनावरे यांच्या सकट मिद्यानी लोकांनी येऊन तेथे तळ ठोकला. टोळधाडीसारखे ते घुसले. ते लोक व त्यांचे उंट यांची संख्या अक्षरश: अगणित होती. त्यांनी या प्रदेशात येऊन त्यांची नासधूस करायला सुरुवात केली. 6 त्यामुळे इस्राएल लोक कंगाल झाले. त्यांनी मदतीसाठी परमेश्वराच्या नावाने आक्रोश करायला सुरुवात केली.
7 मिद्यानी लोकांच्या छळणुकीमुळे इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. 8 तेव्हा परमेश्वराने एका संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवले. तो संदेष्टा इस्राएल लोकांना म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे. ‘मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. तेथून मी तुम्हाला सोडवून बाहेर आणले. 9 मिसरच्या समर्थ लोकांपासून तुमची सुटका केली. नंतर कनानी लोकांनी तुम्हाला जाच केला. पुन्हा मी तुम्हाला वाचवले. त्यांना मी तो देश सोडायला लावला, आणि त्यांची भूमी तुम्हाला दिली.’ 10 मग मी तुम्हाला सांगितले, ‘मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही अमोरी लोकांच्या देशात राहाल पण त्यांच्या दैवतांची उपासना करु नका.’ पण तुम्ही माझे ऐकले नाही.”
येशू यहुदी पुढाऱ्यांविषयी सावध करतो(A)
5 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले. 6 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”
7 तेव्हा ते आपापसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.”
8 पण येशून हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपापसामध्ये का करता? 9 तुम्हांला अजून आठवत नाही काय? पाच भाकरींनी पाच हजार लोकांना जेवू घातले ते, आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हांला आठवत नाही काय? 10 तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी, आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हांला आठवत नाही काय? 11 मी भाकरी विषयी तुम्हांला बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हांला कसे समजत नाही?”
12 तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.
2006 by World Bible Translation Center