Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र दावीदाने बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर भविष्यवेता नाथान त्याच्याकडे आला तेव्हाचे स्तोत्र
51 देवा, माझ्यावर दया कर,
तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने
आणि तुझ्या महान कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देवा माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक.
माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे.
ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत
असे सांगतोस त्याच मी केल्या.
देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले.
मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास.
तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या
आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल
तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर.
मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग.
तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस,
ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्रदय निर्माण कर.
माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि
तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो,
मला पुन्हा तुझा आनंद दे,
माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
19 मोशे छावणीजवळ येऊन पोहोंचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरु व लोकांच्या नाच गाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली फेकून दिल्या; तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्यावर पडून फुटल्या व त्यांचे तुकडे तुकडे झाले. 20 नंतर लोकांनी बनविलेल ते सोन्याचे वासरु मोशेने तोडून फोडून टाकले व ते अग्नीत वितळवले; त्याचा कुटून त्याने भुगाभुगा केला; मग तो त्याने पाण्यात टाकला व ते पाणी त्याने इस्राएल लोकांस प्यावयास लावले.
21 मोशे अहरोनास म्हणाला, “ह्या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?”
22 अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; हे लोक जे वाईट ते करावयास तत्पर असतात, हे आपणास माहीत आहे. 23 लोक मला म्हणाले, ‘मोशेने आम्हाला मिसर देशातून काढून बाहेर आणले; परंतु आता त्याचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही; तेव्हा आमच्यापुढे चालतील असे देव तू आमच्यासाठी करुन दे.’ 24 तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुम्हाकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या.’ तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरु बाहेर आले!”
25 मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रुंनी पाहिला. 26 तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे पळत गेले.
प्रभु भोजन
17 पण आता ही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही, कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमची हानि होते. 18 प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये गट असतात, आणि काही प्रमाणात ते खरे मानतो. 19 (तरीही तुम्हांमध्ये पक्ष असावेत) यासाठी की, जे तुमच्यामध्ये पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावेत.
20 म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभुभोजन घेत नाही. 21 कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हांतील प्रत्येक जण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा प्यायलेला असतो. 22 खाण्यापिण्यासाठी तुम्हांला घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजविता? मी तुम्हांला काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करु काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करीत नाही.
2006 by World Bible Translation Center