Revised Common Lectionary (Semicontinuous)
12 दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात.
13 परंतु आपला प्रभु त्या दुष्टांना हसतो.
त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.
14 दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात.
त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे.
15 परंतु त्यांचे धनुष्य मोडेल
व त्यांच्या तलवारी त्यांच्याच छातीत घुसतील.
16 मूठभर चांगले लोक वाईटांच्या
जमावापेक्षा चांगले असतात.
17 का? कारण दुष्टांचा नाश होईल
आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेतो.
18 परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो
त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते.
19 संकटाच्यावेळी चागल्या माणसांचा नाश होणार नाही.
भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल.
20 वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत
आणि त्या माणसांचा नाश होणार आहे
त्यांच्या दऱ्या कोरड्या पडतील आणि जळून जातील.
त्यांचा संपूर्ण नाश होईल.
21 वाईट माणूस पैसे चटक्न उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही.
परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो.
22 जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल
परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
दावीदाचा उरीयाला मारण्याचा कट
14 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले. 15 त्या पत्रात दावीदाने लिहिले होते. “आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल तेथे उरीयाला पाठव. त्याला एकट्याला तेथे सोडा म्हणजे तो युध्दात कामी येईल.”
16 यवाबाने नगराची टेहेळणी करुन सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले आणि उरीयाला तेथे नेमले. 17 राब्बा नगरातील लोक यवाब विरुद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली. उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.
18 नंतर यवाबाने युध्दातील हकिकतींचे साद्यंतवृत्त दावीदाला पाठवले. 19 युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले. 20 यवाब सेवकाला म्हणाला, “कदाचित राजा संतापून म्हणेल, ‘यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भितीवरुन शिरसंधान करतील हे त्याला ठाऊक असायला हवे. 21 तेबेसमध्ये यरुब्बेशेथचा मुलगा अबीमलेख याला एका बाईने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरुन जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला?’ राजा दावीद असे काही म्हणाला तर त्याला हे ही म्हणावे, ‘उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यात मारला गेला.’”
फिलिप्पैच्या ख्रिस्ती लोकांचे पौल आभार मानतो
10 मी प्रभूमध्ये खूपच आनंदित झालो कारण शेवटी तुमची माझ्याबद्दलची काळजी जागृत झाली. अर्थात तुम्ही नेहमीच माझी काळजी घेतली. परंतु ती दाखविण्याची संधी तुम्हांला मिळाली नाही. 11 मी हे गरजेपोटी बोलतो असे नाही कारण आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे. 12 गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो. कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपूरेपणात राहण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे. 13 जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकतो.
14 तरीही माझ्या संकटकाळात तुम्ही साहाय्य केलेत हे चांगले केले. 15 तुम्हा फिलिप्पैकरांना माहीत आहे की, सुवार्ता सांगण्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी मासेदोनिया सोडले, तेव्हा तुमच्याशिवाय कोणत्याही मंडळीने माझ्याशी देवाणघेवाण केली नाही. 16 कारण जेव्हा मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा बऱ्याचदा तुम्ही माझी गरज भागविण्यासाठी मदत पाठविली, 17 मी तुमच्याकडून केवळ देणगीची अपेक्षा करतो असे नाही, उलट, तुमच्या हिशेबी अधिक फळवृद्धी व्हावी असे पाहतो. 18 माझ्या गरजेपुरते माझ्याजवळ सर्व काही आहे आणि ते विपुल आहे. एपफ्रदीताच्या करवी ज्या गोष्टी तुम्ही पाठविल्या त्या मिळाल्यामुळे गरजेपेक्षा अधिक माझ्याजवळ आहे. ते मधुर सुगंधी अर्पण स्वीकारण्यास योग्य असा यज्ञ जो देवाला संतोष देणारा असा आहे. 19 आणि माझा देव तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या त्याच्या गौरवी संपत्तीला साजेल अशा रीतीने पुरवील. 20 आपला देव व पिता याला अनंतकाळ गौरव असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center