Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीद बथशेबाला भेटतो
11 वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला.
दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला. 2 संध्याकाळी तो आपल्या पलंगावरुन उठला आणि राजमहालाच्या छतावरुन फिरु लागला. तिथून त्याला एक बाई स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती. 3 तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली. सेवकाने सांगितले, “ती अलीयमची मुलगी बथशेबा उरीया हित्ती याची ती पत्नी.”
4 तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला. नंतर स्नान करुन शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली. 5 पण बथशेबा गर्भवती राहिली. दावीदाला तिने निरोप पाठवला. तिने सांगितले, “मी गरोदर आहे.”
दावीद पाप लपवायचा प्रयत्न करतो
6 दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा.
तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदकडे पाठवले. 7 उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले. 8 मग म्हणाला, “घरी जा आणि आराम कर.”
उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली 9 पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवकवर्गा प्रमाणेच तो तिथे झोपला. 10 उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले.
तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, “तू लांबून प्रवास करुन आला आहेस तू घरी का गेला नाहीस?”
11 उरीया दावीदाला म्हणाला, “पवित्र करारकोश, इस्राएलचे सैनिक आणि यहूदा हे राहूट्यांमध्ये राहात आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशा वेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणे-पिणे, बायकोच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.”
12 दावीद उरीयाला म्हाणाला, “आजच्या दिवस इथे राहा. उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो.”
उरीयाने त्या दिवशी यरुशलेममध्येच मुक्काम केला. 13 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्याला भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने जेवणखाण केले. दावीदाने त्याला बेहोश होईपर्यंत मद्य पाजले. पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळी तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.
दावीदाचा उरीयाला मारण्याचा कट
14 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले. 15 त्या पत्रात दावीदाने लिहिले होते. “आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल तेथे उरीयाला पाठव. त्याला एकट्याला तेथे सोडा म्हणजे तो युध्दात कामी येईल.”
14 दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही”
पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात
त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.
2 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता.
त्याला शहाणे लोक शोधायचे होते
शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
3 परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे.
सर्वलोक वाईट झाले आहेत.
एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.
4 दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला.
दुष्टांना देव माहीत नाही.
त्यांच्याकडे खायला [a] खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
5 त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते.
का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता.
6 परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो.
म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.
7 सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले?
परमेश्वरच इस्राएलला वाचवतो.
परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले.
परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील
नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
ख्रिस्ताची प्रीति
14-15 या कारण्यासाठी ज्याच्यापासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक घराण्याला नाव मिळाले आहे, त्या पित्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो. 16 मी प्रार्थना करतो की, त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हांला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी. 17 आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात राहावा. व तुमची मुळे चांगली रुजलेली व प्रीतित मुळावलेली असावी. 18 यासाठी की, सर्व संतांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हांला सामर्थ्य प्राप्त व्हावे. 19 आणि ख्रिस्ताची प्रीति जी ज्ञान्यांना मागे टाकते हे कळावे यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे.
20 आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आम्हांमध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागितल्यापेक्षा किंवा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक कार्य करण्यास तो समर्य आहे, 21 त्याला मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्यासाठी सदासर्वकाळ गौरव असो.
येशू पाच हजारांहून अधिक लोकांना खावयास देतो(A)
6 नंतर येशू गालील (किंवा तिबिर्या) सरोवराच्या पलीकडे गेला. 2 तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले. कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले. व निरनिराळ्या मार्गांनी आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले. म्हणून ते त्याच्यामागे गेले. 3 मग येशू टेकडीच्या वर चढून गेला. तो आपल्या शिष्यांसह तेथे बसला. 4 त्याच सुमारास यहूदी लाकांचा वल्हांडण सण जवळ आला होता.
5 येशूने नजर वर करुन पाहिले तो लोकांचा मोठा समुदाय आपणांकडे येताना त्याला दिसला. येशू फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांना पुरेशा भाकरी कोठून विकत आणाव्या बरे?” 6 (फिलिप्पची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करुन ठेवला होता.)
7 फिलिप्पने उत्तर दिले, “येथील प्रत्येकाला थोडी थोडी भाकर दिली तरी या सर्वांना पुरेशा भाकर विकत घेण्यासाठी आपणा सर्वांना महिनाभर काम करावे लागेल.”
8 आंद्रिया नावाचा दुसरा एक शिष्य तेथे होता. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता. 9 आंद्रिया म्हणाला, “येथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत.”
10 येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” ती बरीच गवताळ अशी जागा होती. तेथे खाली बसलेले सुमारे पाच हजार पुरुष होते. 11 मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या; येशूने भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या. मासे घेऊन त्याने तसेच केले. येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले.
12 सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते. जेवण झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे व माशांचे तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.” 13 म्हणून शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले. लोकांनी जेवायाला सुरुवात केली, तेव्हा जवाच्या फक्त पाच भाकरी तेथे होत्या. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरल्या.
14 येशूने केलेला हा चमत्कार लोकांनी पाहिला, तेव्हा ते म्हणाले, “जगात येणारा संदेष्टा तो खरोखर हाच असला पाहिजे.”
15 आपण राजा बनावे असे लोकांला वाटते हे येशूला माहीत होते. येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला. तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात गेला.
येशू पाण्यावरुन चालतो(B)
16 त्या संध्याकाळी येशूचे शिष्य (गालील) सरोवराकडे गेले. 17 शिष्य एका नावेत बसून सरोवरापलीकडील कफर्णहूम नगराकडे निघाले. आता अंधार पडला होता आणि येशू अजून त्यांच्याकडे आलेला नव्हता. 18 वारा फारच जोराने वाहत होता आणि सरोवरात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या होत्या. 19 त्यांनी नाव तीन ते चार मैल वल्हवीत नेली तेव्हा त्यांना येशू नावेकडे येताना दिसला. तो सरोवराच्या पाण्यावरुन चालत होता, तो नावेकडेच येत होता. तेव्हा शिष्य घाबरले. 20 परंतु येशू त्यांना म्हणाला. “मी आहे, भिऊ नका.” 21 येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदाने येशूला नावेत घेतले. आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली.
2006 by World Bible Translation Center