Revised Common Lectionary (Semicontinuous)
14 दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही”
पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात
त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.
2 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता.
त्याला शहाणे लोक शोधायचे होते
शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
3 परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे.
सर्वलोक वाईट झाले आहेत.
एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.
4 दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला.
दुष्टांना देव माहीत नाही.
त्यांच्याकडे खायला [a] खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
5 त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते.
का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता.
6 परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो.
म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.
7 सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले?
परमेश्वरच इस्राएलला वाचवतो.
परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले.
परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील
नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
13 यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरुन पळ काढला. 14 अराम्यांनी पलायन केलेले पाहताच अम्मोनीही अबीशय समोरुन पळून गेले आणि आपल्या नगरात परतले.
अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरुशलेमला परतला.
पुन्हा युध्द करण्याचा अराम्यांचा निर्णय
15 इस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले) 16 हदरेजरने (फरात) नदीच्या पलीकडे राहाणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येते आले. हदरेजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.
17 हे दावीदाच्या कानावर आले. तेव्हा त्याने सर्व इस्राएलींना एकत्र आणले. यार्देन नदी पार करुन ते हेलाम येथे गेले.
तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला. 18 पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरुन पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.
19 हदरेजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलांशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अम्मोन्यांनी धास्ती घेतली.
31 ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”
32 परंतु येशूने उत्तर दिले. “माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हांला काहीच माहिती नाही.”
33 म्हणून शिष्य एकमेकांना विचारु लागले, “येशूला कोणीतरी अगोदरच काही खावयास आणून दिले काय?”
34 येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय. 35 जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, ‘पीक गोळा करायला अजून चार महिने आहेत.’ परंतु मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा. लोकांकडे पाहा. पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत. 36 आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो अनंतकाळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणारासह आनंदी आहे. 37 ‘एक पेरणी करतो तर दुसरा कापणी’ असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे. 38 ज्या पीकासाठी तुम्ही मेहनत केली नाही, त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हांस पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हांस मिळतो.”
2006 by World Bible Translation Center