Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे एक स्तोत्र
61 देवा, माझे प्रार्थना गीत ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2 मी कुठेही असलो कितीही अशक्त
असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन.
तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
3 तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
माझ्या शत्रूंपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.
4 तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे,
जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.
5 देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस
परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे.
6 राजाला भरपूर आयुष्य दे
त्याला कायमचे राहू दे.
7 त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे.
तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.
8 आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन.
ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.
शौलाच्या कुटुंबियांवर दावीदाची मेहेरनजर
9 दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का? योनाथानसाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे”
2 सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्याला दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्याला विचारले, “तूच सीबा काय?”
सीबा म्हणाला, “होय, मीच तुमचा दास सीबा.”
3 तेव्हा राजा म्हणाला, “शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्याला मिळाला पाहिजे.”
सीबा राजाला म्हणाला, “योनाथानचा मुलगाच आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे.”
4 तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला.
सीबाने सांगितले, “तो लो-दबार येथे, अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे.”
5 तेव्हा राजा दावीदाने योनाथानच्या मुलाला आणण्यासाठी तेथे माणसे पाठवली. 6 योनाथानच्या मुलगा मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला, “मफीबोशेथ?” राजाने विचारले.
मफीबोशेथ म्हणाला, “होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.”
7 त्याला दावीद म्हणाला, “भिऊ नको. माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडीलांसाठी मी एवढे करीन. तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन. माझ्या पंक्तीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल.”
8 मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, “मेलेल्या कुत्र्या एवढीही माझी किंमत नाही. पण आपण या सेवकावर कृपादृष्टी करत आहात.”
9 दावीदाने मग शौलचा सेवक सीबा याला बोलवले. त्याला तो म्हणाला, “शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे. 10 त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल.”
सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते. 11 सीबा दावीदाला म्हणाला, “मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन.”
तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला. 12 मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले. 13 मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरुशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या टेबलावर भोजन करीत असे.
स्वर्गातील आनंद(A)
15 सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते. 2 तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”
3 मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली. 4 “जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? 5 आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. 6 आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करुन म्हणतो, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे.’ 7 मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.
2006 by World Bible Translation Center