Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे एक स्तोत्र
61 देवा, माझे प्रार्थना गीत ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2 मी कुठेही असलो कितीही अशक्त
असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन.
तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
3 तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
माझ्या शत्रूंपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.
4 तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे,
जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.
5 देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस
परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे.
6 राजाला भरपूर आयुष्य दे
त्याला कायमचे राहू दे.
7 त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे.
तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.
8 आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन.
ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.
दावीद अनेक युध्दे जिकंतो
8 यानंतर दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली. 2 मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या त्यापैकी दोन रांगांतील लोकांना ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांना जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली.
3 रहोबचा मुलगा हजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हददेजरचा पराभव केला. 4 सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने हददेजर कडून बळकावले. रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करुन टाकले.
5 दिमिष्कामधील अरामी लोक हददेजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामींनाही दावीदाने ठार केले. 6 मग त्याने दिमिष्कातील अरामात आपली ठाणी बसवली. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. दावीदाला परमेश्वराने तो जाईल तेथे यश दिले.
7 हददेजरच्या सैनिकांकडील सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरुशलेमला आणल्या 8 हददेजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हददेजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या.
9 हमाथचा राजा तोई याने, दावीदाने हददेजरच्या संपूर्ण सैन्याचा पाडाव केल्याचे ऐकले. 10 तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला राजा दावीद याच्याकडे पाठवले. हददेजरशी लढाईकरुन त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करुन त्याला आशीर्वाद दिले. (हददेजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या. 11 दावीदाने त्या स्वीकारुन परमेश्वराला अर्पण केल्या. या आधीच्या समार्पित वस्तूंबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रामधून दावीदाने लूट आणलेली होती. 12 दावीदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांचा पराभव केला. रहोबचा मुलगा, सोबाचा राजा हददेजर याचा पराभव केला. 13 क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करुन तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला. 14 अदोम मध्ये त्याने शिपायांची ठाणी बसवली. अदोमच्या सर्व प्रांतात अशी ठाणी बसवली. अदोमलोक त्याचे अंकित झाले. जेथे जाईल तेथे परमेश्वराने दावीदाला विजय मिळवून दिला.
दावीदाचे राज्य
15 दावीदाची सत्ता सर्व इस्राएलवर होती. त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले 16 सरूवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता. 17 अहीटुबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता. 18 यहोयादचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी [a] यांचा प्रमुख होता. दावीदाची मुले महत्वाचे नेते होते.
पौल इफिस येथील वडीलजनंशी बोलतो
17 मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.
18 जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हांना माहीत आहे. 19 मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली. यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. 20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हांला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हांना माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. 21 पश्चाताप करुन देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली.
22 “आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरुशलेमला चाललो आहे, आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. 23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो 24 मी माइया जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभु येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे-ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.
25 “राच्याची करीत ज्या लोकांत मी फिरलो त्या तुम्हांतील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे. 26 म्हणून मी तुम्हांला जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही. 28 तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हांला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. 29 मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाहीत. 30 तुमच्यामधूनसुद्धा लोक उठतील, चुकीचे असे तुम्हांला शिकवून आपल्या मागे घेऊन जातील. 31 यासाठी सावध राहा. तुम्हांतील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रु आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
32 “आणि आता मी तुम्हांला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे. 33 मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. 34 मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हांला चांगले माहीत आहे. 35 अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करुन मदत केली पाहिजे. व प्रभु येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.’”
36 आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. 37 तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. 38 ते पुन्हा त्याला कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दु:ख झाले, मग ते त्याला जहाजापर्चंत निरोप देण्यास गेले.
2006 by World Bible Translation Center