Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 61

प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे एक स्तोत्र

61 देवा, माझे प्रार्थना गीत ऐक.
    माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
मी कुठेही असलो कितीही अशक्त
    असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन.
तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
    माझ्या शत्रूंपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.
तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे,
    जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.

देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस
    परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे.
राजाला भरपूर आयुष्य दे
    त्याला कायमचे राहू दे.
त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे.
    तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.
आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन.
    ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.

2 शमुवेल 7:18-29

दावीदाची प्रार्थना

18 यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला,

“हे प्रभो, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस? 19 मी केवळ तुझा सेवक आहे. (तुझ्या माझ्यावर किती लोभ आहे!) पुढे माझ्या वंशजांबद्दलही तू असाच लोभ दाखवला आहेस. सर्वांशी तुझा व्यवहार नेहमी असाच असतो का? 20 मी आणखी काय बोलणार? प्रभु परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच. 21 तू करणार म्हणालास आणि तुला तसे करायची इच्छा आहे. तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस. 22 माझ्या प्रभो परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. तुझ्या लीला आम्ही ऐकल्या आहेत म्हणून आम्ही हे जाणतो.

23 “पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. (ती गुलाम होती) तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुकत केलेस. तिला आपली प्रजा मानलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भुत चमत्कार केलेस. 24 तू निरंतर त्यांना स्वतःच्या कवेत घेतलेस. तू त्यांचा देव झालास.

25 “आता तर, परमेश्वर देवा, या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करुन तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करु दे. 26 मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, ‘सर्वशक्तीमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.’

27 “सर्वशक्तीमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस. तू म्हणालास, ‘मी तुझ्यासाठी घर बांधीन’ म्हणून मी, तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे. 28 प्रभो, परमेश्वरा तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास. 29 आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभो परमेश्वरा तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”

इब्री लोकांस 13:17-25

17 आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे.

18 आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सदसदविवेक बुध्दि शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तेच सदैव करीत राहावे अशी आमची इच्छा आहे. 19 मी तुम्हांला विनंति करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून प्रार्थना करा.

20-21 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभु येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्वारे उठविले. त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हांला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.

22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंति तुम्हांला करतो. 23 आपला बंधु तीमथी हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.

24 तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व संतांना सलाम सांगा, इटली येथील सर्वजण तुम्हांला सलाम सांगतात.

25 देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center