Revised Common Lectionary (Semicontinuous)
20 माझा सेवक दावीद मला सापडला
आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.
21 मी दावीदाला माझ्या उजव्या हाताने आधार दिला
आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले.
22 त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करु शकला नाही.
दुष्टलोक त्याचा पराभव करु शकले नाहीत.
23 मी त्याच्या शत्रूंना संपवले, जे लोक माझ्या निवडलेल्या
राजाचा तिरस्कार करीत होते त्यांचा मी पराभव केला.
24 माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन.
मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
25 मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले,
तो नद्यांना काबूत ठेवेल.
26 तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझे वडील आहात
तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’
27 आणि मी त्याला माझा पहिला मुलगा बनवेन.
तो पृथ्वीवरचा महान राजा असेल.
28 माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल
त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपणार नाही.
29 त्याचा वंश सदैव चालू राहील.
स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल.
30 जर त्याचे वंशज माझा कायदा पाळायचे थांबवतील आणि
माझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन.
31 जर त्या निवडलेल्या राजाच्या
वंशजांनी माझे नियम मोडले.
32 आणि माझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले
तर मी त्यांना जबरदस्त शिक्षा करेन.
33 परंतु त्या लोकांवरचे माझे प्रेम मी कधीच बाजूला करणार नाही.
मी त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहीन.
34 मी दावीदाशी झालेला माझा करार मोडणार नाही.
मी आमचा करार बदलणार नाही.
35 माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे
आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.
36 दावीदाचा वंश सदैव चालू राहील.
त्याचे राज्य सूर्य असे पर्यंत राहील.
37 ते चंद्राप्रमाणे सदैव राहील.
आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”
करारकोश यरुशलेममध्ये
15 दावीदाने दावीदानगरात स्वतःसाठी घरे बांधली. तसेच करारकोश ठेवण्यासाठी एक स्थान उभारले. ते एका तंबूसारखे होते. 2 मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच करारकोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाल परमेश्वराची सेवा करण्यासाठीच लेवींची निवड झाली आहे.”
4 दावीदाने मग काही लेवींची करार कोशाच्या सेवेसाठी निवड केली. इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम होते. 5 आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांजा वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी पुढीलप्रमाणे: उज्जियेल, शमिरामोथ, यहिएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत 6 बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी करार कोशापुढे रणशिंगे वाजवत. 7 परमेश्वराची स्तुतिगीते गाण्याचे काम दावीदाने आसाफला आणि त्याच्या भावांना दिले.
दावीदाचे आभारगीत
8 परमेश्वराचे स्तवन करा.
त्याला हाक मारा.
परमेश्वराने केलेली महान कृत्ये लोकांना सांगा.
9 परमेश्वराची स्तोत्रे गा.
त्यांचे स्तवन म्हणा.
त्याचे चमत्कार इतरांना सांगा.
10 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान धरा.
परमेश्वराकडे येणाऱ्या तुम्हा सर्वांना आनंद मिळो.
11 परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा.
मदतीसाठी त्याला शरण जा.
12 देवाच्या अद्भूत कृत्यांची आठवण ठेवा.
त्याने केलेले न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा.
13 इस्राएलचे लोक परमेश्वराचे सेवक आहेत.
याकोबाचे वंशज हे परमेश्वराने निवडलेले खास लोक आहेत.
येशू एका आंधळ्यास बरे करतो(A)
35 येशू यरीहोजवळ येत असताना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. 36 जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे.
37 त्यांनी त्याला सांगितले की, “नासरेथकर येशू जात आहे.”
38 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर!”
39 जे पुढे चालले होते त्यांनी त्याला गप्प राहण्यास सांगितले. परंतु तो आणखी मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!”
40 येशू थांबला, आणि त्याने आंधळ्याला आपणांकडे आणण्याची आज्ञा केली, जेव्हा आंधळा जवळ आला, तेव्हा येशूने त्याला विचारले, 41 “तुला काय हवे?”
आंधळा मनुष्य म्हणाला, “प्रभु, मला परत दृष्टी प्राप्त व्हावी.”
42 येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टि येवो: तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
43 तत्काळ त्याला दृष्टि आली आणि देवाचे गौरव करीत तो येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुति केली.
2006 by World Bible Translation Center