Revised Common Lectionary (Semicontinuous)
20 माझा सेवक दावीद मला सापडला
आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.
21 मी दावीदाला माझ्या उजव्या हाताने आधार दिला
आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले.
22 त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करु शकला नाही.
दुष्टलोक त्याचा पराभव करु शकले नाहीत.
23 मी त्याच्या शत्रूंना संपवले, जे लोक माझ्या निवडलेल्या
राजाचा तिरस्कार करीत होते त्यांचा मी पराभव केला.
24 माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन.
मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
25 मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले,
तो नद्यांना काबूत ठेवेल.
26 तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझे वडील आहात
तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’
27 आणि मी त्याला माझा पहिला मुलगा बनवेन.
तो पृथ्वीवरचा महान राजा असेल.
28 माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल
त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपणार नाही.
29 त्याचा वंश सदैव चालू राहील.
स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल.
30 जर त्याचे वंशज माझा कायदा पाळायचे थांबवतील आणि
माझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन.
31 जर त्या निवडलेल्या राजाच्या
वंशजांनी माझे नियम मोडले.
32 आणि माझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले
तर मी त्यांना जबरदस्त शिक्षा करेन.
33 परंतु त्या लोकांवरचे माझे प्रेम मी कधीच बाजूला करणार नाही.
मी त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहीन.
34 मी दावीदाशी झालेला माझा करार मोडणार नाही.
मी आमचा करार बदलणार नाही.
35 माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे
आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.
36 दावीदाचा वंश सदैव चालू राहील.
त्याचे राज्य सूर्य असे पर्यंत राहील.
37 ते चंद्राप्रमाणे सदैव राहील.
आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”
दावीदाच्या राज्याची भरभराट
14 हिराम सोराचा राजा होता. त्याने दावीदाकडे दूत पाठवले. याखेरीज त्याने गंधसरुचे ओंडके, गवंडी, सुतार हे देखील पाठवून दिले. दावीदासाठी घर बांधायला म्हणून त्याने ही मदत केली. 2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलचा राजा केले आहे हे दावीदाच्या लक्षात आले. दावीदावर आणि इस्राएलच्या लोकांवर प्रेम असल्यामुळे देवाने दावीदाचे साम्राज्य विशाल आणि मजबूत केले.
अथेनै येथे पौल
16 पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत होता. पौलाचे मन अस्वस्थ झाले. कारण त्याने पाहिले की, ते शहर मूर्तीनी भरलेले आहे. 17 सभास्थानामध्ये पौल जे खऱ्या देवाची उपासना करीत अशा यहूदी व ग्रीक लोकांशी बोलला. शहराच्या व्यापार क्षेत्रातील काही लोकांशीही पौल बोलला. पौल दररोज लोकांशी बोलत असे. 18 काही एपिकूरपंथी व स्तोयिक पंथीय तत्वज्ञानी मंडळीने त्याच्याशी वाद घातला.
त्यांच्यातील काही म्हणाले, “या माणसाला तो काय बोलत आहे, ते त्याचे त्यालाच कळत नाही. तो काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” पौल त्यांना येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याची सुवार्ता सांगत होता. ते म्हणाले, “असे वाटते की तो आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी देवाबद्दल सांगत आहे.”
19 त्यांनी पौलाला धरले व अरीयपगाच्या [a] सभेपुढे नेले ते म्हणाले, “तुम्ही आम्हांला जी नवी कल्पना शिकवीत आहात ती कृपा करुन स्पष्ट करुन सांगा. 20 तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या आमच्यासाठी नवीन आहेत. यापूर्वी आम्ही हे कधीही ऐकले नाही. या शिकवणीचा अर्थ काय हे आम्हांला जाणून घ्यायचे आहे.” 21 (अथेनै येथे राहणारे तसेच त्यांच्यात राहणारे विदेशी लोक नेहमी नव्या कल्पनांविषयी बोलण्यात वेळ घालवित असत).
22 मग पौल अरीयपगाच्या सभेपुढे उभा राहिला, पौल म्हणाला, “अर्थनैच्या लोकांनो, मी पाहत आहे की, सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धर्मिक आहात. 23 मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली. त्यावर असे लिहिले होते: ‘अज्ञात देवाला’. तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हांला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हांला सांगत आहे!
24 “ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभु आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही! 25 हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे. 26 देवाने एका माणसाला (आदाम) निर्माण करुन सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या.
27 “त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्याची इच्छा होती. कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल. पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही. 28 आम्ही त्याच्यासह राहतो आम्ही त्याच्यासह चालतो आम्ही त्याच्यासह आहोत. तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे: ‘आम्ही त्याची मुले आहोत’
29 “आपण देवाची मुले आहोत. म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये. तो सोने, चांदी, किंवा दगडासारखा नाही. 30 भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले ह्रदय व जीवन बदलावे. 31 देवाने एक दिवस ठरविलेला आहे, ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील. तो नि:पक्षपाती असेल, हे करण्यासाठी तो एका माणासाचा (येशूचा) वापर करील. देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे. व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे; त्या माणसाला मरणातून पुन्हा उठवून दाखवून दिले आहे!”
2006 by World Bible Translation Center