Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 68:24-35

24 विजयाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या देवाला लोक बघतात.
    माझा देव, माझा राजा विजयांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत आहे, ते लोक बघतात.
25 गायक वाजत गाजत पुढे येतील.
    नंतर तरुण मुली खंजिऱ्या वाजवतील.
    त्यांच्या नंतर वाद्य वाजवणारे असतील.
26 मोठ्या मंडळात देवाचा जय जयकार करा.
    इस्राएलाच्या लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
27 छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे
    आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते
    आणि नफतालीचे नेते आहेत.

28 देवा, आम्हाला तुझी शक्ती दाखव.
    तू पूर्वी आमच्यासाठी तुझी शक्ती वापरलीस ती दाखव.
29 राजे त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील,
    तुझ्या यरुशलेममधील प्रासादात ती आणतील.
30 त्या “प्राण्यांनी” तुला हवे ते करावे
    म्हणून तू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलांना”
आणि “गायींना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव.
    तू त्या देशांचा युध्दात पराभव केला आहेस
    आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग.
31 त्यांना मिसरमधून संपत्ती आणायला सांग देवा,
    इथिओपियातल्या लोकांना त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणायला भाग पाड.
32 पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा,
    त्याच्यासाठी स्तुतिगीते गा.

33 देवासाठी गाणे म्हणा देव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो,
    त्याचा जोरदार आवाज ऐका.
34 तुमच्या इतर देवांपेक्षा हा देव अधिक शक्तिमान आहे.
    इस्राएलाचा देव त्याच्या लोकांना
    अधिक शक्तिमान बनवतो.
35 देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो.
    इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो.

देवाचे गुणगान करा.

2 शमुवेल 6:6-12

ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. पण परमेश्वराचा त्याच्यावर कोप होऊन उज्जाला मरण आले. पवित्र कोशाला स्पर्श करुन त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा करार कोशाशेजारीच उज्जा गतप्राण झाला. या घटनेमुळे दावीद फार खिन्न झाला आणि त्याने या जागेचे नाव “पेरेस-उज्जा” म्हणजेच “उज्जाला शासन” असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे.

मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला. तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?” 10 परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती आणि त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन गथच्या ओबेद-अदोम याच्या घरी ठेवला. 11 तिथे तो कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला.

12 पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद अदोमच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. कारण पवित्र करार कोश तेथेच आहे.” तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता.

प्रेषितांचीं कृत्यें 21:27-39

27 सात दिवस जवळ जवळ संपत आले होते. परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यानी लोकांना भडकाविले व त्याला (पौलाला) धरले. 28 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांना सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे, आणि आता त्याने विदेशी लोकांना देखील मंदिरात आणले आहे, आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.” 29 ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरुशलेम येथे पाहिले होते. त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता. लोकांना वाटले, पौलानेच त्याला मंदिरात नेले आहे.

30 सर्व शहर खवळून उठले. सगळे लोक धावू लागले. त्यांनी पौलाला पकडले व मंदिरातून बाहेर ओढून काढले. लगेच दारे बंद करण्यात आली. 31 ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे. 32 ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले. व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला. जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.

33 मग सरदार पौलाकडे आला व त्याला अटक केली व त्याला साखळदंडानी बांधण्याचा आदेश दिला. मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले. 34 गर्दितून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना. म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे. 35 जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्याला उचलून आत न्यावे लागले. 36 कारण जमाव हिंसक बनत चालला होता. जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा!”

37 शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?”

तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय? 38 मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले इजिप्तच्या ज्या मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करुन सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस. त्या इजिप्तच्या मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.”

39 पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सज्ञ नगरात राहणारा मी एक यहूदी आहे. मी एका महत्वाच्या शहराचा नागरिक आहे. मी तुम्हांला विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center