Revised Common Lectionary (Semicontinuous)
देवाचा करारकोश यरुशलेममध्ये आणतात
6 दावीदाने पुन्हा इस्राएलमधून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले. 2 त्यासह तो पवित्र करार कोश यरुशलेमला आणण्यासाठी यहूदातील बाला येथे गेला. देवाची उपासना करायची असली म्हणजे हा कोश जेथे असेल तेथे लोकांना जावे लागे. हा पवित्र करार कोश म्हणजे देवाचे सिंहासन आहे. करुब देवदूतांच्या प्रतिकृती त्यावर होत्या. त्यावर परमेश्वर राजासारखा बसलेला होता. 3 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा पवित्र कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे मुलगे उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.
4 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून हा पवित्र कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो पवित्र कोशापुढे चालू लागला.
5 तेव्हा देवदाराच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत कोशापुढे चालू लागले.
12 पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद अदोमच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. कारण पवित्र करार कोश तेथेच आहे.” तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता. 13 कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचा बळी दिला. 14 सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नाच करत होता.
15 दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते. 16 शौलाची मुलगी मीखल हे सर्व खिडकीतून पाहात होती. कोश नगरात आणत असताना दावीद त्यापुढे नाचत. उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला खेद वाटला. दावीद स्वतःचे हसे करुन घेत आहे असे तिला वाटले.
17 या करार कोशासाठी दावीदाने राहुटी उभारली होती. त्यात योग्य जागी इस्राएली लोकांनी तो ठेवला. मग दावीदाने परमेश्वरापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे वाहिली.
18 हे झाल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या वतीने आशीर्वाद दिले. 19 शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषांस त्याने भाकरीचा तुकडा, किसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले.
दावीदाचे स्तोत्र.
24 पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे.
जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.
2 परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली.
ती त्याने नद्यांवर निर्माण केली.
3 परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल?
परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
4 तिथे कोण उपासना करु शकतो?
ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्रदय शुध्द आहे,
ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही
आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
5 चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात.
ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात.
6 ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात.
ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.
7 वेशींनो, आपले मस्तक उंच करा.
जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
8 तो गौरवशाली राजा कोण आहे?
परमेश्वरच तो राजा आहे.
तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे.
9 वेशींनो, तुमची मस्तके उंच करा.
प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
10 तो गौरवशाली राजा कोण आहे?
सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.
ख्रिस्तात आध्यात्मिक आशीर्वाद
3 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गराज्यातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हांला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. 4 ख्रिस्तामध्ये देवाने आम्हांला जग निर्माण होण्यापूर्वी त्याच्या आमच्यावरिल प्रेमामुळे त्याच्यासमोर आम्ही निर्दोष व पवित्र असावे म्हणून निवडले आहे. 5 त्याच्या कृपायुक्त हेतूनुसार येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक केली. 6 त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुति व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हांला फुकट दिली.
7 त्याच्यामध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही स्वंतत्र केले गेलो, त्याच्या कृपेच्या समृद्धीने आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. 8 त्याची कृपा आपले ज्ञान आणि समजबुद्धी वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे. 9 ख्रिस्तामध्ये आपणांला दाखविण्याच्या त्याच्या अनुग्रहाप्रमाणे त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले. 10 पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र आणण्यासाठी अशी ती योजना काळाच्या पूर्णतेसाठी होती.
11 ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो. यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो. देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो 12 यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर अगोदरच आशा ठेवली होती, त्या आम्हांकडून त्याच्या गौरवाची स्तुति व्हावी. 13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा जेव्हा सत्याची म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा देवाने तुम्हांवर शिक्का मारला 14 जोपर्यंत देव, आम्ही जे त्याचे आहोत त्यांना पूर्ण आणि शेवटचे स्वातंत्र्य देईपर्यंत पवित्र आत्मा हा आमच्या वतनाच्या हिश्शाचा विसार आहे. आणि यामुळे त्याच्या गौरवाची स्तुति होईल.
हेरोद येशूला बाप्तिस्मा करणारा योहान समजतो(A)
14 हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ आहे.”
15 इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.”
तर काही जण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.”
16 परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तो मरणातून उठविला गेला आहे.”
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला असे मारले गेले
17 कारण हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती. त्याचा भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले. त्या कारणामुळे त्याने असे केले. 18 योहान हेरोदाला सांगत असे की, “तुझ्या भावाच्या पत्नीशी असे लग्न करणे तुला योग्य नाही.” 19 याकरिता हेरोदीयाने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्याला ठार मारण्याची संधी पाहात होती. परंतु ती त्याला मारु शकली नाही. 20 कारण हेरोद योहानाला भीत असे. हेरोदाला माहीत होते की, योहान नितिमान आणि पवित्र मनुष्य आहे, म्हणून तो त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई परंतु तो आनंदाने त्याचे ऐकत असे.
21 मग एके दिवशी संधी आली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालीलातील प्रमुख लोकांना मेजवानी दिली. 22 हेरोदीयाची मुलगी मेजवानीच्या ठिकाणी आली व तिने नाच केला आणि हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदीत केले.
तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” 23 तो गंभीरपणे शपथ वाहून म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मगशील ते मी तुला देईन.”
24 ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?”
आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.”
25 आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.”
26 राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्याला तिला नकार द्यावा असे वाटले नाही. 27 तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठविले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. 28 ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. 29 योहानाच्या शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते तेथे आले. त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.
2006 by World Bible Translation Center