Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
24 पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे.
जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.
2 परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली.
ती त्याने नद्यांवर निर्माण केली.
3 परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल?
परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
4 तिथे कोण उपासना करु शकतो?
ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्रदय शुध्द आहे,
ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही
आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
5 चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात.
ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात.
6 ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात.
ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.
7 वेशींनो, आपले मस्तक उंच करा.
जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
8 तो गौरवशाली राजा कोण आहे?
परमेश्वरच तो राजा आहे.
तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे.
9 वेशींनो, तुमची मस्तके उंच करा.
प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
10 तो गौरवशाली राजा कोण आहे?
सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.
इस्राएल लोक आपला तळ हलवितात
11 इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराचा कोश असलेल्या पवित्र निवास मंडपावरील ढग वर गेला. 12 तेव्हा इस्राएल लोकांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांनी सीनायचे रान सोडले आणि ढग पारानाच्या रानात थांवेपर्यंत ते प्रवासकरीत गेले. 13 छावणी हलवण्याची इस्राएल लोकांची ही पहिलीच वेळ होती. परमेश्वराने त्यांना मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हे केले.
14 यहुदाच्या छावणीतील तीन गट पहिल्याने निघाले. त्यांच्या निशाणा मागे ते चालले. पहिला गट यहुदाच्या कुळाचा होता. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांचा सेनानायक होता. 15 त्यानंतर इस्साखारचे कूळ निघाले. सुवाराचा मुलगा नथनेल त्यांचा नेता होता. 16 आणि मग जबुलूनाचे कूळ निघाले. हेलोनाचा मुलगा अलीयाब त्यांचा नेता होता.
17 मग पवित्र निवास मंडप उतरविण्यात आला आणि गेर्षोन व मरारी वंशाचे लोक पवित्र निवास मंडप घेऊन निघाले. तेव्हा ह्या वंशाचे लोक नंतरच्या रांगते होते.
18 त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशानामागे चालले होते. त्यातील पहिला गट रऊबेन कुळाचा होता. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांचा सेनानायक होता. 19 त्यानंतर शिमोन कुळाचे लोक निघाले. सुरीशदैचा मुलगा शलूमीयेल हा त्यांचा सेनानायक होता. 20 नंतर गाद वंशाच्या दलाचे लोक निघाले. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप त्यांचा सेनानायक होता. 21 मग कहाथी लोक पवित्र स्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते अशावेळी जाऊन पोहोंचले की त्यांच्या येण्याओगोदर इतर लोकांनी पवित्र निवास मंडप उभा करुन तयार ठेवला होता.
22 त्यानंतर एफ्राइम वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशाणामागे चालले होते. त्यात पहिला गट एफ्राइम कुळाचा होता. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांचा सेनानायक होता. 23 त्यानंतर मनश्शे कुळाचे लोक निघाले. पदाहसुराचा मुलगा गमलीयेल त्यांचा सेनानायक होता. 24 मग बन्यामीन कुळाचे लोक निघाले. गिदोनीचा मुलगा अबीदान त्यांचा सेनानायक होता.
25 छावण्यांच्या रागेतील सर्वात शेवटची तीन दले दान वंशाची होती. ती पुढे गेलेल्या दलांचे संरक्षण करणारी पिछाडीची तुकडी होती. तिच्यात पहिले दान कुळाचे लोक होते. ते त्यांच्या निशाणामागे चालले होते. अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर त्यांचा सेनानायक होता. 26 त्यानंतर आशेर कुळाचे लोक निघाले. आक्रानाचा मुलगा पगीयेल त्यांचा सेनानायक होता. 27 मग नफताली कुळाचे लोक निघाले. एनानाचा मुलगा अहीरा त्यांचा सेनानायक होता. 28 इस्राएल लोक ठिक ठिकाणाहून प्रवास करिताना ह्या क्रमाने निघत.
29 मोशेचा सासरा रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला मोशे म्हणाला, “देवाने आम्हाला वचन दिलेल्या देशात आम्ही जात आहोत. तू आमच्याबरोबर चल. आम्ही तुझ्याशी चांगले वागू; इस्राएल लोकांना उत्तम गोष्टी देण्याचे परमेश्वराने वचन दिले आहे.”
30 परंतु होबाबाने उत्तर दिले, “नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही. मला माझ्या देशात व माझ्या लोकात परत गेले पाहिजे.”
31 मग मोशे त्याला म्हणाला, “मी विनंती करितो की तू आम्हाला सोडून जाऊ नको; कारण ह्या रानाची आमच्यापेक्षा तुला अधिक माहिती आहे. तू आमचा वाटाड्या होऊ शकतोस. 32 तू आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर आम्हाला ज्या ज्या चांगल्या गोष्टी देईल त्यात आम्ही तुला वाटा देऊ.”
33 मग होबाब मान्य झाला. आणि परमेश्वराच्या पर्वतापासून ते प्रवास करीत निघाले. याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश घेतला व ते लोकांच्यापुढे चालले. मुक्कामासाठी जागा शोधताना तीन दिवस तो पवित्र कोश त्यांनी वाहिला. 34 प्रत्येक दिवशी परमेश्वराचा ढग त्यांच्यावर राहून त्यांना मार्ग दाखवीत असे.
35 लोक जेव्हा पवित्र कराराचा कोश उचलून मुक्काम हलवीत तेव्हा मोशे म्हणत असे,
“हे परमेश्वरा, ऊठ
तुझ्या शत्रूंची सर्व दिशांना पांगापांग होवो,
तुझे सर्व शत्रू तुजपासून पळून जावोत.”
36 आणि जेव्हा पवित्र कराराचा कोश त्याच्या जागी ठेवला जाई तेव्हा मोशे म्हणत असे,
“हे परमेश्वरा, इस्राएलाच्या
लाखो लोकांकडे परत ये.”
योहानाचा जन्म
57 अलीशिबेला तिचे मूल होण्याची वेळ आली, तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला. 58 तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले की, देवाने तिच्यावर मोठी कृपा केली आहे, ते तिच्या आनंदात सहभागी झाले.
59 मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले, ते, त्याच्या बापाचे जे नाव होते तेच म्हणजे जखऱ्या नाव ठेवणार होते. 60 पण त्याची आई म्हणाली, “नाही, त्याला योहान असे म्हणावे.”
61 ते तिला म्हणाले, “तुझ्या कोणत्याच नातेवाईकाचे नाव ते नाही.” 62 नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना खुणेने विचारले, “त्याला कोणते नाव ठेवायचे आहे?”
63 त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि लिहिले, “त्याचे नाव योहान आहे.” त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले. 64 लगेच त्याचे तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी झाली, आणि तो बोलू लागला व देवाची स्तुति करु लागला. 65 सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीयाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलत होते. 66 ज्या कोणी हे ऐकले त्या प्रत्येकाने याविषयी नवल केले, ते म्हणाले, “हे मूल पुढे कोण होणार आहे?” कारण देवाचा वरदहस्त त्यांच्यावर होता.
जखऱ्या देवाची स्तुति करतो
67 मग त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला गेला, त्याने भविष्यवाणी केली; तो म्हणाला,
68 “प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो,
कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास,
व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.
69 त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून
आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
70 देव म्हणाला की, मी असे करीन
त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.
71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात
त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.
72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे.
व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
73 हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
74 ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की,
आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.
75 त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.
76 “मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील.
प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
77 कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल
हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.
78 “कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे
स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
79 आणि शांतीच्या मार्गावर आमच्या
पावलांना मार्गदर्शन करील.”
80 अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.
2006 by World Bible Translation Center