Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
21 परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते
तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
2 राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास.
राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.
3 परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास.
तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.
4 त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस,
देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.
5 तू राजाला विजयी केलेस आणि त्याला गौरव प्राप्त करुन दिलेस.
तू त्याला मान आणि स्तुती दिलीस.
6 देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास.
राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.
7 राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे,
सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.
8 देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील.
तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल.
9 भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते.
परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो.
त्याचा क्रोध अग्नी सारखा जळतो
आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
10 त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल
ते पृथ्वीवरुन निघून जातील.
11 का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द् वाईट गोष्टींची योजना आखली
परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
12 परमेश्वरा, तू त्या लोकांना तुझे गुलाम बनवलेस तू त्यांना दोराने बांधून ठेवलेस.
तू त्यांच्या मानेभोवती दोर बांधलेस.
तू त्यांना गुलामाप्रमाणे वाकायला लावलेस.
13 हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ
आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.
दावीदाचे पालिष्ठ्यांशी युध्द
17 दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्याला शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरुशलेम येथील किल्ल्यात आला. 18 पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
19 दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करु का? तुझे साहाय्य मला लाभेल का?”
परमेश्वर उत्तरला, “होय, पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”
20 तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घुसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूंवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव “बाल परासीम” म्हणजेच खिंडार पाडणारा प्रभू असे ठेवले. 21 पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ति त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या माणसांनी त्या तेथून हलवल्या.
22 पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
23 दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर. 24 तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हाला झाडाच्या शेंड्यांवरुन ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वराच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”
25 दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गेबापासून गेजेरपर्यंत त्यांचा पाठलाग त्यांना घालवून दिले.
येशू आणि त्याचे भाऊ
7 यानंतर येशू गालील प्रांतात फिरला. येशूला यहूदीया प्रांतातूल प्रवास करायला नको होता, कारण तेथील काही यहूदी लोकांना येशूला जिवे मारायचे होते. 2 यहूदी लोकांचा मंडपाचा सण [a] जवळ आला होता. 3 म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले, “तू येथून सणासाठी यहूदीयात जा. म्हणजे तू करतोस ते चमत्कार तेथे तुझे शिष्य पाहू शकतील. 4 लोकांना माहिती व्हावी असे एखाद्याला वाटत असेल तर त्याने तो करतो ती कामे लपवू नयेत. तू जगाला प्रगट हो. तू जे चमत्कार करतोस ते त्यांना पाहू दे.” 5 येशूच्या भावांनीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
6 येशू आपल्या भावांना म्हणाला. “माझी योग्य वेळ अजून आलेली नाही. पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल. 7 जग तुमचा द्वेष करु शकत नाही. परंतु जग माझा द्वेष करते. कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगतो. 8 तेव्हा तुम्ही सणासाठी जा. मी आत्ताच सणाला येणार नाही. माझी योग्य वेळ अजून आली नाही.” 9 हे सांगितल्यानंतर येशू गालीलातच राहिला.
2006 by World Bible Translation Center