Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
21 परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते
तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
2 राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास.
राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.
3 परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास.
तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.
4 त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस,
देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.
5 तू राजाला विजयी केलेस आणि त्याला गौरव प्राप्त करुन दिलेस.
तू त्याला मान आणि स्तुती दिलीस.
6 देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास.
राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.
7 राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे,
सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.
8 देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील.
तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल.
9 भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते.
परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो.
त्याचा क्रोध अग्नी सारखा जळतो
आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
10 त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल
ते पृथ्वीवरुन निघून जातील.
11 का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द् वाईट गोष्टींची योजना आखली
परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
12 परमेश्वरा, तू त्या लोकांना तुझे गुलाम बनवलेस तू त्यांना दोराने बांधून ठेवलेस.
तू त्यांच्या मानेभोवती दोर बांधलेस.
तू त्यांना गुलामाप्रमाणे वाकायला लावलेस.
13 हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ
आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.
इस्राएल लोक दावीदाला राजा करतात
5 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीद पाशी एकत्र आले आणि त्याला म्हणाले, “आपण इस्राएल लोकांना एकाच कुटुंबातले, एकाच रकतामांसाचे आहोत. 2 शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तूच युध्दात आमचे नेतृत्व करत होतास, इस्राएलांना युध्दावरून तूच परत आणत होतास. खुद्द परमेश्वर तुला म्हणाला, ‘माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.’”
3 मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
4 दावीद राज्य करायला लागला तेव्हा तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले. 5 हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरुशलेम मधून राज्य केले.
दावीद यरुशलेम नगर जिंकतो
6 राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात [a] प्रवेश करु शकणार नाहीस. आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हाला थोपवतील.” (दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले. 7 तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीद नगर असे त्याचे नाव पडले.)
8 दावीद त्यादिवशी आपल्या लोकांना म्हणाला, “यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा.” यावरूनच, “आंधळे पांगळे यांना या घरात येता यायचे नाही” अशी म्हण पडली.
9 दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव “दावीदनगर” असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या. 10 सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक समर्थ होत गेला.
पौल त्याच्या दु:खसहनाविषयी सांगतो
16 मी पुन्हा म्हणतो: कोणीही मला मूर्ख समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन. 17 या आत्मप्रौढी मिरविण्याच्या प्रकारामध्ये मी जसा प्रभु बोलतो तसे बोलत नाही. तर मूर्खासारखे बोलतो. 18 जसे बरेच लोक जगिक गोष्टीविषयी प्रौढी मिरवितात, तशी मीही प्रौढी मिरवीन. 19 तुम्ही शहाणे असल्याने मूर्खांचे आनंदाने सहन करता! 20 वस्तुतः जे कोणी तुम्हाला गुलाम करते, किंवा छळ करते किंवा तुमचा गैर फायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता. 21 आम्ही जणू अशक्त असल्यासारखे मी लज्जेने बोलतो.
पण ज्याविषयी कोणी अभिमान धरण्याविषयी धीट असेल त्याविषयी मीही धीट आहे (हे मी मूर्खापणाने बोलतो) 22 ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? (मी हे मूर्खासारखे बोलतो) मी अधिक आहे. 23 मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, पराकाष्ठेचे फटके खाल्ले, पुन्हा आणि पुन्हा मरणाला सामोरे गेलो. 24 पाच वेळेला यहूंद्याकडून मला एकोणचाळीस फटके बसले. 25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवास घालविला. 26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. विदेशी लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रात धोका होता, खोठ्या बंधूंकडून धोका होता.
27 मी कष्ट केले आणि घाम गाळला, व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक माहीत आहे. तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी अन्नाशिवाय राहिलो, थंडीत व उघडा असा मी राहिलो, 28 या सर्व गोष्टीशिवाय मी दररोज मंडळ्याप्रती माझ्या असलेल्या आस्थेमुळे दबावाखाली होतो. 29 कोण अशक्त आहे, आणि मला अशक्तपणा माहीत नाही? कोण पापात पडला आहे? आणि मी माझ्यामध्ये जळत नाही?
30 जर मला अभिमान बाळगायचा असेल तर, माझ्या अशक्तपणा दाखविणाऱ्या गोष्टीविषयी मी अभिमान बाळगीन. 31 देव आणि प्रभु येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुति केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. 32 दिमिष्कात अरीतास राजाचा राज्यपाल याने मला अटक करण्यासठी शहराला पहारा दिला होता. 33 पण मला दोपलीत बसवून खिडकीतून गावकुसावरुन उतरविण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.
2006 by World Bible Translation Center