Revised Common Lectionary (Semicontinuous)
शौलाच्या निधनाचे वृत्त दावीदाला समजते
1 अमालेक्यांचा पाडाव करुन दावीद सिकलाग येथे परतला. शौलाच्या मृत्यूनंतर लगेचची ही घटना आहे. दावीदाला सिकलाग येथे येऊन दोन दिवस झाले होते.
शौल आणि योनाथानला उद्देशून दावीदाचे शोकगीत
17 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक शोकपूर्ण गीत म्हटले. 18 त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.
19 “हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले पाहा,
हे शूर कसे धारातीर्थी पडले!
20 ही बातमी गथ मध्ये सांगू नका
अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करु नका.
नाहीतर पलिष्ट्यांच्या त्या मुली (शहरे) आनंदित होतील.
नाहीतर (सुंता न केलेल्या) त्या परकीयांच्या मुलींना (शहरांना) आनंद होईल.
21 “गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस
किंवा दव न पडो!
तिथल्या शेतातून यज्ञात अर्पण
करण्यापुरतेही काही न उगवो!
कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला
शौलाची ढाल तेलपाण्यावाचून तशीच पडली
22 योनाथानच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले
शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले.
रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांना वधिले,
बलदंडांची हत्या केली.
23 “शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले.
एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही
त्यांची ताटातूट केली नाही.
गरुडांहून ते वेगवान्
आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
24 इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा.
किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हाला दिली
वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
25 “युध्दात शूर पुरुष कामी आले गिलबोवाच्या
डोंगरावर योनाथानला मरण आले.
26 बंधो. योनाथान, मी अतिशय दु:खी
असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे.
तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला.
स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते
27 या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले
त्यांची शस्त्रे नष्ट झाली.”
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
2 माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
3 परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
4 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.
5 मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
6 मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
7 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
8 परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हांवरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेतही फार वाढावे.
8 मी तुम्हांला आज्ञा करीत नाही, पण मला तुमच्या प्रेमच्या प्रामाणिकतेची तुलना इतरांच्या आस्थेशी करायची आहे. 9 कारण तुम्हांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा माहीत आहे की, जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरिता तो गरीब झाला, यासाठी की, त्याच्या गरीबीने तुम्ही श्रीमंत व्हावे.
10 आणि तुमच्या फायद्यासाठी माझा सल्ला असा आहे की, गेल्या वर्षी तुम्ही केवळ देण्यातच नव्हे तर तशी इच्छा करण्यात पहिले होता. 11 आता ते काम पूर्ण करा, यासाठी की कार्य करण्याची तुमची उत्सुकता ही ती तुमच्याकडे ज्या प्रमाणात आहे त्यानुसार पूर्ण करण्यात यावी. 12 कारण जर इच्छा असेल, तर एखाद्याकडे जे असेल तसे मान्य होईल. जर नसेल तर मान्य होणार नाही. 13 दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणून. 14 सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी. यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात. मग समानता येईल. 15 पवित्र शास्त्र म्हणते,
“ज्याने पुष्कळ गोळा केले होते, त्याला जास्त झाले नाही.
ज्याने थोडे गोळा केले होते, त्याला कमी पडले नाही.” (A)
येशू मृत मुलीला जीवन देतो व आजारी स्त्रीला बरे करतो(A)
21 नंतर येशू नावेत बसून परत सरोवरापलीकडे गेल्यावर, मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला. तो सरोवराजवळ होता. 22 याईर नावाचा यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला. याईराने येशूला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला. 23 आणि आग्रहाने विनंति करून त्याला म्हणाला, “माझी लहान मुलगी मरावरायस टेकली आहे. मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा.”
24 मग येशू त्याच्याबरोबर गेला. लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागे चालत होता व ते त्याच्याभोवती गर्दी करीत होते.
25 त्या लोकांमध्ये एक स्त्री होती. ती बारा वर्षांपासून रक्तस्रावाने पीडलेले होती. 26 बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊनसुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते. पण ती बरी न होता. तिचा आजार वाढला होता.
27 त्या स्त्रीने येशूविषयी ऐकले तेव्हा ती गर्दीत त्याच्यामागे आली व त्याच्या झग्याला तिने स्पर्श केला. 28 कारण ती म्हणत होती, “जर मी त्याच्या कपड्यांना शिवले तरी बरी होईन.” 29 जेव्हा तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला, तेव्हा तिचा रक्तस्राव थांबला. व आपल्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत असे तिला जाणवले. 30 येशूला ताबडतोब जाणीव झाली की, आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे. तो गर्दीत वळून म्हणाला, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”
31 शिष्य येशूला म्हणाले, “लोक तुमच्याभोवती गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता, आणि तरीही विचारता, मला कोणी स्पर्श केला?”
32 परंतु हे कोणी केले हे पाहण्यासाठी तो सभोवार बघतच राहिला. 33 त्या स्त्रीला ती बरी झाली आहे हे माहीत होते म्हणून ती आली आणि येशूच्या पाया पडली. ती स्त्री भीतिने थरथर कांपत होती. तिने य़ेशूला सर्व काही सांगितले. 34 येशू त्या स्त्रीला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतिने जा आणि त्रासापासून मुक्त राहा.”
35 तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली. ती म्हणाली, “तुमची मुलगी मेली आहे. गुरुजींना का त्रास देता?”
36 येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो यहूद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास धर.”
37 येशूने फक्त पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांनाच आपल्याबरोबर येऊ दिले. 38 ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. त्याने लोकांना मोठ्याने आकांत करताना व रडताना पाहिले. 39 तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ही मुलगी मेलेली नाही. ती झोपली आहे.” 40 ते सर्व त्याला हसले.
त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीचे आईवडील व जे त्याच्याबरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला. 41 त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला, “तलीथा कूम” (म्हणजे “लहान मुली मी तुला सांगतो, ऊठ.”) 42 ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली (ती बारा वर्षाची होती.) ते फार आश्चर्यचकित झाले. 43 नंतर त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की हे कोणाला कळता कामा नये. त्याने तिला खाण्यास देण्याविषयी सांगितले.
2006 by World Bible Translation Center