Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
2 माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
3 परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
4 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.
5 मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
6 मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
7 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
8 परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
27 दुसऱ्या दिवशी पुन्हा दावीदाचे आसन रिकामेच राहिले. तेव्हा मात्र शौल योनाथानला म्हणाला, “इशायचा मुलगा या प्रंसगी दिसत नाही. कालही नव्हता, आजही नाही. असे का?”
28 योनाथानने सांगितले, “त्याने माझ्याजवळ बेथलहेमला जायची परवानगी मागितली. 29 तो म्हणाला, ‘मला जायला हवे. बेथलहेमला आमच्या कुटुंबात यज्ञ आहे. माझ्या भावाने मला यायची आज्ञा केली आहे. आपल्या मैत्रीला स्मरुन तू मला भावांना भेटायला जायची परवानगी दे.’ दावीद आज राजाच्या पंक्तीला नाही याचे हे कारण आहे.”
30 शौल योनाथानवर संतापला. तो म्हणाला, “अरे दासीपुत्रा, तू माझी अवज्ञा करतोस? आणि तू तिच्यासारखाच निपजलास. तू दावीदाच्या बाजूचा आहेस हे मला माहीत आहे. तू तुला आणि तुझ्या आईला लाज आणली आहेस. 31 हा इशायचा मुलगा जिवंत असेपर्यंत तू राज्यावर येणार नाहीस. आत्ताच्या आत्ता दावीदला आणून हजर कर. त्याला मेलेच पाहिजे.”
32 योनाथान आपल्या वडीलांना म्हणाला, “त्याने काय केले? का म्हणून त्याने मेले पाहिजे?”
33 यावर शौलाने योनाथानवर आपला भाला फेकला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा, दावीदाला मारायचा आपल्या वडीलांनी निश्चय केला आहे हे योनाथानच्या लक्षात आले. 34 संतापाने तो पंक्तीतून चालता झाला. त्या रागात त्याने अन्नाला स्पर्शसुध्दा केला नाही. शौलाने आपल्याला शरमिंदे केले आणि दावीदाला मारायचे ठरवले म्हणून त्याला फार राग आला.
दावीद आणि योनाथान निरोप घेतात
35 दुसऱ्या दिवशी सकाळी योनाथान शेतावर आला. ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला तो आला. आपल्याबरोबर त्याने मदतनीस मुलालापण आणले. 36 त्याला तो म्हणाला, “धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण.” मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरुन बाण मारले. 37 बाण पडले त्या ठिकाणी तो मुलगा पोचल्यावर योनाथान म्हणाला, “बाण आणखी पुढेच आहेत.” 38 मग तो म्हणाला, “जा धावत जा, लौकर आणि नुसता उभा राहू नको.” मुलाने मग बाण उचलून गोळा करुन आणले. 39 काय चालले आहे याची त्या मुलाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त योनाथान आणि दावीदला ते कळत होते. 40 योनाथानने धनुष्यबाण त्या मुलाकडे दिले आणि त्याला तो म्हणाला, “आता तू गावात परत जा.”
41 मुलगा दिसेनासा झाल्यावर दावीद डोंगराच्या पलीकडे लपला होता तिथून बाहेर आला. त्याने योनाथानला तीनदा वाकून अभिवादन केले. मग त्यांनी परस्परांचे मुके घेतले. दोघेही रडू लागले. पण दावीदाचा आक्रोश योनाथानपेक्षा जास्त होता.
42 योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”
येशू अशुद्ध आत्मा असलेल्या मनुष्याला बरे करतो(A)
31 नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला. तो त्यांना शब्बाथ दिवशी शिक्षण देत असे. 32 ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवीत असे.
33 सभास्थानात एक मनुष्य होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता. 34 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे: देवाचा पवित्र तोच तू आहेस.” 35 येशूने त्याला दटावले आणि म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला.
36 सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, “हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात.” 37 अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली.
2006 by World Bible Translation Center