Revised Common Lectionary (Semicontinuous)
सामेख
113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत
त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
114 मला लपव आणि माझे रक्षण कर.
परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
115 परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस
आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन.
माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
117 परमेश्वरा, मला मदत कर म्हणजे माझा उध्दार होईल.
मी नेहमीच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन.
118 परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला तू परत पाठव.
का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्या सांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
119 परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे.
म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन.
120 परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते,
मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.
ऐन
121 जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा,
ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
122 माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे.
परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.
123 परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि
तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
124 मी तुझा सेवक आहे.
मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.
125 मी तुझा सेवक आहे,
मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.
126 परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे.
लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
127 परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला
तुझ्या आज्ञा आवडतात.
128 मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो. [a]
मला खोटी शिकवण आवडत नाही.
पुन्हा दावीदाला मारायचा शौलाचा प्रयत्न
8 पुन्हा युध्द सुरु झाले आणि दावीद पलिष्ट्यांशी लढायला गेला. पलिष्ट्यांचा त्याने पराभव केला. त्यांनी पळ काढला. 9 पण शौलवर परमेश्वराच्या दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल आपल्या घरात बसला होता. त्याच्या हातात भाला होता. दावीद वीणा वाजवत होता. 10 शौलने हातातील भाला फेकून दावीदला भिंतीत चिणायचा प्रयत्न केला. पण दावीद उडी मारुन निसटला. भाल्याचा नेम चुकून तो भिंतीत गेला. त्या रात्री दावीद पळून गेला.
11 शौलाने काही जणांना दावीदाच्या घरी पाठवले. त्यांनी त्याच्या घरावर पहारा दिला. रात्रभर ते बसून राहिले. सकाळी त्याला मारावे असा त्यांचा बेत होता. पण दावीदाच्या बायकोने, मीखलने. दावीदाला सावध केले. तिने त्याला रातोरात पळून जाऊन जीव वाचवायला सांगितले, नाही तर उद्या तुझा खून होईल असे ती त्याला म्हणाली. 12 तिने त्याला खिडकीतून पळून जायला मदत केली. दावीद निसटला आणि पळाला. 13 मीखलने घरातील देवतेची मूर्ती घेतली आणि पलंगावर ठेवून त्यावर पांघरुण घातले. बकरीचे केस डोक्याच्या ठिकाणी लावले.
14 दावीदाला पकडून आणण्यासाठी शौलाने जासूद पाठवले. पण मीखलने दावीद आजारी असल्याचे सांगितले.
15 जासूद परतले. त्यांनी राजाला वर्तमान सांगितले. राजाने त्यांना दावीदला पाहून यायला फर्मावले. शौल म्हणाला, “त्याला माझ्यापुढे हजर करा. त्याला शक्य नसेल तर पलंगावर झोपवूनच आणा. मग मीच त्याला मारतो.”
16 जासूद परत गेले, त्याच्या शोधार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आढळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
17 शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला दाविदाला पळून जायला मदत केलीस.”
मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेईल असे म्हणाला.”
येशू पाण्यावर चालतो(A)
45 नंतर येशूने लगेच शिष्यांना नावेत बसविले आणि पलीकडे असलेल्या बेथसैदा येथे त्याच्यापुढे जाण्यास सांगितले. तोपर्यंत त्याने लोकांना निरोप देऊन घरी पाठवले. 46 त्यांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
47 संध्याकाळ झाली तेव्हा नाव सरोवराच्या मध्यभागी होती आणि जमिनीवर येशू एकटाच होता. 48 मग त्याने त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे पाहिले. कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू नावेकडे गेला. येशू पाण्यावरून चालत होता व तो त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला. 49 जेव्हा त्यांनी त्याला सरोवरावरून पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. 50 कारण त्या सर्वांनी त्याला पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भीऊ नका, मी आहे,” 51 नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले. 52 कारण त्यांना भाकरीच्या संदर्भातील चमत्कार समजलाच नव्हता आणि त्यांची मने कठीण झाली होती.
2006 by World Bible Translation Center