Revised Common Lectionary (Semicontinuous)
सामेख
113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत
त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
114 मला लपव आणि माझे रक्षण कर.
परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
115 परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस
आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन.
माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
117 परमेश्वरा, मला मदत कर म्हणजे माझा उध्दार होईल.
मी नेहमीच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन.
118 परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला तू परत पाठव.
का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्या सांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
119 परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे.
म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन.
120 परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते,
मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.
ऐन
121 जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा,
ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
122 माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे.
परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.
123 परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि
तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
124 मी तुझा सेवक आहे.
मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.
125 मी तुझा सेवक आहे,
मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.
126 परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे.
लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
127 परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला
तुझ्या आज्ञा आवडतात.
128 मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो. [a]
मला खोटी शिकवण आवडत नाही.
योनाथानची दावीदला मदत
19 शौलाने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे. 2-3 त्याने दावीदला सावध केले. त्याला सांगितले, “जपून राहा. शौल तुला मारायची संधी शोधत आहे. सकाळी तू शेतात जाऊन लप. मी ही वडीलांना घेऊन शेतात येतो. तू लपला असशील तेथे येऊन थांबतो. तुझ्याबद्दल मग मी वडीलांशी बोलेन. त्यांच्याकडून काही कळले की तुला सांगीन.”
4 योनाथान आपल्या वडीलांशी बोलला. दावीदबद्दल त्याने चांगले उद्गार आणले. तो म्हणाला, “तुम्ही राजे आहात. दावीद तुमचा सेवक. त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही. तेव्हा तुम्हीही त्याला इजा पोचू देऊ नका. तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे. 5 गल्याथ पलिष्ट्याचा वध करताना त्याने आपले प्राण पणाला लावले. परमेश्वराने इस्राएलला विजय मिळवून दिला. तुम्हालाही ते पाहून आनंद झाला. मग तुम्ही त्याला का दुखावता? तो निरपराध आहे. त्याला कशासाठी मारायचे?”
6 शौलाने योनाथानचे म्हणणे ऐकले आणि त्याला वचन दिले. तो म्हणाला, “परमेश्वर असेपर्यंत दावीदाच्या जिवाला धोका नाही.”
7 तेव्हा योनाथानने दावीदला बोलवून सर्व काही सांगितले. मग त्याला तो शौलाकडे घेऊन गेला. पूर्वीप्रमाणेच तो त्याच्याकडे राहू लागला.
जहाज नष्ट होते
39 दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही. परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरविले. 40 म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीङ वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले. 41 परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले. तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.
42 तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरविले. यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये. 43 परंतु शतधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले. आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली. 44 बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोंचले.
2006 by World Bible Translation Center