Revised Common Lectionary (Semicontinuous)
34 मग शमुवेल तिथून निघाला. तो रामा येथे गेला. शौल आपल्या गिबा येथील घरी परतला. 35 पुढे आयूष्यभर शमुवेलाला शौलाचे दर्शन झाले नाही. शौलाबद्दल त्याला फार वाईट वाटले. शौलाला इस्राएलचा राजा केल्याबद्दल परमेश्वरालाही खेद झाला.
शमुवेल बेथलहेमला जातो
16 परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “शौलसाठी तू किती दिवस शोक करत बसणार आहेस? राजा म्हणून मी त्याला झिडकारले तरी तू त्याच्याबद्दल वाईट वाटून घेत आहेस? आपल्या शिंगात तेल भरुन घे आणि बेथलहेमला जायला नीघ. तुला मी इशाय नावाच्या माणसाकडे पाठवतो. इशाय बेथलहेमला राहतो. त्याच्या एका मुलाची मी राजा म्हणून निवड केली आहे.”
2 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलाने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील.”
परमेश्वर त्यावर त्याला म्हणाला, “तू बेथलहेमला जायला नीघ, बरोबर एक वासरु घे. ‘मी परमेश्वराला यज्ञ करायला चाललो आहे’ असे म्हण. 3 इशायला यज्ञासाठी बोलाव. मग मी काय करायचे ते सांगीन. मी सांगेन त्या व्यक्तीला अभिषेक कर.”
4 शमुवेलने मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. तो बेथलहेम येथे आला. तेव्हा तेथील वडीलधाऱ्यांना धास्ती वाटली. ते शमुवेलला भेटले. “आपली ही सलोख्याचीच भेट आहे ना”, असे त्यांनी शमुवेलला विचारले.
5 शमुवेल म्हणाला, “होय, मी स्नेहभावाने आलो आहे. मला परमेश्वरासाठी यज्ञ करायचा आहे. तयारीला लागा आणि माझ्याबरोबर यज्ञासाठी या.” शमुवेलने इशायला व त्याच्या मुलांना तयार केले. त्यांनाही यज्ञात आमंत्रित करुन त्यात भाग घ्यायला सांगितले.
6 इशाय आणि त्याची मुले आली तेव्हा शमुवेलने अलियाबला पाहिले. शमुवेलला वाटले, “हाच तो परमेश्वराने निवडलेला माणूस!”
7 तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रुपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरुपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”
8 मग इशायने आपला दुसरा मुलगा अबीनादाब याला बोलावले. तो शमुवेल समोरुन गेला. शमुवेल म्हणाला, “हीही परमेश्वराची निवड नव्हे.”
9 मग इशायने शम्माला शमुवेलच्या समोर यायला सांगितले. तेव्हाही शमुवेल म्हणाला, “हाही तो नव्हे.”
10 इशायने आपल्या सातही मुलांना शमुवेल पुढे हजर केले. पण शमुवेल म्हणाला, “यापैकी कोणालाही परमेश्वराने निवडलेले नाही.”
11 त्याने पुढे इशायला विचारले, “इथे तुझी सगळी मुलं हजर आहेत ना?”
इशाय म्हणाला, “नाही आणखी एक आहे सगळ्यात धाकटा तो रानात मेंढरे राखायला गेला आहे.”
शमुवेल म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून इथे आण. तो येईपर्यंत आपण जेवायला सुरुवात करयाची नाही.”
12 इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता.
परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”
13 शमुवेलने आपले तेलाने भरलेले शिंग उचलले आणि इशायच्या या धाकट्या मुलावर सर्व भावंडांसमोर त्या खास तेलाने अभिषेक केला. तेथून पुढे दावीदवर परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊ लागला. एवढे झाल्यावर शमुवेल रामा येथे परतला.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
20 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून
येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्व प्राप्त करुन देवो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो.
तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.
3 तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले
त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
4 तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो.
तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
5 देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल.
देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल
ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
6 परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले.
देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत:च निवडलेल्या राजाला उत्तर दिले.
देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
7 काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यांवर विश्वास ठेवतात
परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
8 त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला.
ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.
9 परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले.
देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.
6 म्हणून आम्हांला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की, जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत, तोपर्यंत आम्ही प्रभुपासून दूर आहोत. 7 आम्ही विश्वासाने जगतो, जे बघतो त्याने 8 आम्हांला विश्वास आहे, मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करु. आणि प्रभुसंगती राहू. 9 म्हणून त्याला संतोषविणे हे आम्ही आमचे ध्येय करतो, आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभुपासून दूर असलो तरी. 10 कारण आम्हांला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. आणि प्रत्येकाला त्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षिस मिळेल.
देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे
11 म्हणून आम्ही जाणतो की देवाचे भय कशासाठी धरायचे व त्यासाठी आम्ही मनुष्यांना वळविण्याचे प्रयत्न करतो. आम्ही जे आहोत ते देवासमोर स्पष्ट आहोत. आणि माझी आशा आहे की, तुमची सद्विवेकबुध्दि आम्हांला जाणते. 12 आम्ही तुमच्यासमोर आमची पात्रता पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नाही. पण आमच्याविषयी तुम्ही अभिमान बाळगावा यासाठी संधी देत आहोत, यासाठी की तुम्ही अशांना उत्तर द्यावे की जे पाहिलेल्या गोष्टीविषयी अभिमान बाळगतात आणि अंतःकरणात जे आहे त्याविषयी बाळगत नाहीत. 13 जरी आम्ही वेडे असलो तरी ते ख्रिस्तासाठी, जर आम्ही आमच्या योग्य मनःस्थितीत असलो तर ते तुमच्यासाठी.
14 कारण ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते, कारण आमची खात्री झाली आहे की, जर एक सर्वांसाठी मेला आणि म्हणून सर्व मेले. 15 आणि तो सर्वांसाठी मेला, यासाठी की जे जगतात त्यांनी स्वतःसाठीच जगू नये तर जो त्यांच्यासाठी मेला व पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे.
16 म्हणून आतापासून जगिक दृष्टीकोनातून आम्ही कोणाला मानत नाही, तरी एकेकाळी आम्ही ख्रिस्ताला अशाप्रकारे मानले. पण आता आम्ही तसे करीत नाही. 17 म्हणून, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ति आहे. जुने गेल आहे. नवीन आले आहे!
येशू बियांच्या बोधकथेचा उपयोग करतो
26 आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, एखादा मनुष्य जमिनीवर बी पसरून टाकतो. 27 रात्री झोपतो आणि दिवसा उठतो. बी रूजते व ते वाढते हे कसे होते हे त्याला कळत नाही. 28 जमीन आपोआप पीक उपजवते. प्रथम अंकुर, नंतर तुरा, त्यानंतर दाण्यांनी भरलेले ओंबी, मग कणसात पूर्ण वाढलेला दाणा. 29 पीक तयार होते तेव्हा तो त्याला लगेच विळा लावतो. कारण कापणीची वेळ आलेली असते.”
देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे(A)
30 येशू म्हणाला, “आपण देवाचे राज्य कशासारखे आहे असे म्हणावे किंवा कोणती गोष्ट ते समजावून सांगाण्यासाठी उपयोगात आणावी? 31 ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असतो. 32 परंतु तो पेरला जातो तेव्हा तो वाढतो व मळ्यातील सर्व झाडात मोठा होतो. त्याला मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात.”
33 अशा अनेक बोधकथांनी त्याने ते समजू शकतील असा संदेश त्यांना सांगितला. 34 बोधकथेचा उपयोग केल्याशिवाय त्याने त्यांना इतर काहीही सांगितले नाही, परंतु जेव्हा तो शिष्यांसह एकांतात होता तेव्हा त्याने शिष्यांना सर्व समजावून सांगितले.
2006 by World Bible Translation Center