Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 20

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

20 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून
    येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्व प्राप्त करुन देवो.
देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो.
    तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.
तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले
    त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो.
    तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल.
    देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल
ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.

परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले.
    देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत:च निवडलेल्या राजाला उत्तर दिले.
    देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यांवर विश्वास ठेवतात
    परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला.
    ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.

परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले.
    देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.

1 शमुवेल 13:1-15

शौलाची पहिली चूक

13 आता शौलाला राजा होऊन वर्ष झाले होते. इस्राएलवरील त्याच्या सत्तेला दोन वर्षे झाल्यावर [a] त्याने इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यापैकी दोन हजार मिखमाश येथे त्याच्या बरोबर बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात राहिली. हजार जण योनाथान बरोबर बन्यामीनमधील गिबा येथे राहिले. सैन्यातील इतर सर्वांना त्याने घरोघरी पाठवले.

गिबा येथील छावणीतील पलिष्ट्यांच्या योनाथानने पराभव केला. ते पलिष्ट्यांच्या सेनापतीच्या कानावर गेले. ते म्हणाले, “इब्री लोकांनी बंड केले आहे.”

शौल म्हणाला, “नेमके काय घडले ते इब्रींना ऐकू द्या” आणि त्याने आपल्या लोकांना इस्राएलभर रणशिंग फुंकून ही बातमी सांगायला सांगितली. सर्व इस्राएलांच्या हे कानावर आले. त्यांना वाटले, “शौलने पलिष्ट्यांच्या नेत्याला मारले. तेव्हा पलिष्ट्यांना आता इस्राएलांबद्दल द्वेष वाटतो.”

सर्व इस्राएलांना गिलगाल येथे शौलजवळ एकत्र जमायचा निरोप गेला. इस्राएलांशी सामना करायला पलिष्टे ही सिध्द झाले. पलिष्ट्यांचा सेनासागर किनाऱ्यावर जेवढे वाळूचे कण असतील तेवढे सैनिक त्यांच्याकडे होते. सेनासागर विशाल होता. त्यांच्याकडे तीन हजार रथ [b] आणि सहा हजारांचे घोडदळ होते. त्यांनी बेथ-ओवनच्या पूर्वेला मिखमाश येथे तळ दिला.

आता आपण संकटात सापडले आहोत, पुरते पलिष्ट्यांच्या कचाट्यांत सापडलो आहोत हे इस्राएलांच्या लक्षात आले. ते गुहांमध्ये आणि खडकांच्या कपारीत लपून बसले. विवर, विहिरी यात त्यांनी आश्रय घेतला. काही तर यार्देन नदी पलीकडे गाद, गिलाद या प्रांतात पळाले. शौल या वेळी गिलगाल येथेच होता. त्याच्या सैन्याचा भीतीने थरकाप उडाला होता.

शमुवेलने गिलगाल येथे भेटतो असे शौलाला सांगितले होते. त्याप्रमाणे शौलाने सात दिवस त्याची वाट पाहिली. पण शमुवेल पोचला नाही. तेव्हा सैन्य शौलला सोडून जायला लागले. तेव्हा शौल म्हणाला, “होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून द्या.” ती आणल्यावर शौलाने यज्ञार्पणे केली. 10 त्याचे हे आटोपते आहे तोच शमुवेल तेथे पोचला. शौल त्याला भेटायला पुढे झाला.

11 शमुवेलने विचारले, “तू काय केलेस?”

शौल म्हणाला, “माझे सैन्य पांगले. तुम्हीही दिलेल्या वेळेत आला नाहीत. पलिष्ट्यांची सेना मिखमाश येथे जमली. 12 तेव्हा मी विचार केला, पलिष्टी इथे गिलगाल मध्ये येऊन माझ्यावर हल्ला करतील आणि मी तर अजून परमेश्वराला मदतीचे आवाहनही केले नाही. तेव्हा मी हे होमार्पण करण्याचे घाडस केले आहे.”

13 शमुवेल म्हणाला, “तुझा हा मूर्खपणा आहे. परमेश्वर तुझा देव याची आज्ञा तू पाळली नाहीस. त्याचे म्हणणे ऐकले असतेस तर इस्राएलवर तुझ्या वंशाचे राज्य निरंतर राहिले असते. 14 पण आता तुझे राज्य सतत राहाणार नाही. परमेश्वराला त्याचा शब्द मानणारा माणूस हवा आहे आणि तसा तो मिळाला आहे. तो आता नवा नेता बनेल. तू परमेश्वराची अवज्ञा केलीस म्हणून त्याने नवीन अधिपती नेमला आहे.” आणि शमुवेल गिलगाल सोडून चालता झाला.

मिखमाश येथे युद्ध

15 शौल आपल्या उर्वरित सैन्यासह गिलगाल सोडून बन्यामीन मधील गिबा येथे गेला. त्याने बरोबरची माणसे मोजली. ती जवळपास सहाशे भरली.

मार्क 4:1-20

बी पेरणाऱ्या शेतकऱ्याविषयीची बोधकथा(A)

दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर होते. त्याने बोधकथेवरून पुष्कळ गोष्टी शिकविल्या. शिक्षण देताना तो म्हणाला,

“ऐका! एक शेतकरी आपले बी पेरावयास गेला. तो पेरीत असता काही वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले. दुसरे काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फार माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले पण सूर्य उगवल्यावर ते करपले आणि मूळ रूजले नसल्यामुळे ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडपे अधिक वाढली आणी त्यांनी त्याची वाढ खुंटविली. व त्याला पीक आले नाही पण काही बी चांगल्या जमीनीवर पडले, ते उगवले, वाढले आणि भरपूर पीक आले आणि त्याचे कोठे तीसपट, कोठे साठपट आणि कोठे शंभरपट पीक आले.”

मग तो म्हणाला, “ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!”

येशू बोधकथांचा उपयोग का करतो हे सांगतो(B)

10 जेव्हा तो एकटा होता तेव्हा त्याच्याभोवती बारा शिष्यांसह जे इतर होते त्यांनी त्या बोधकथांविषयी त्याला विचारले.

11 तो त्यास म्हणाला, “केवळ तुम्हांस देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे (अधिकार) देण्यात आले आहेत, पण बाहेराच्यांना गोष्टीरूपात सांगितले आहे. 12 यासाठी की,

‘ते पाहत असता पाहतील पण त्यांना कधीच दिसणार नाही
    ते ऐकत असता ऐकतील पण त्यांना कधीच समजणार नाही
जर त्यांनी पाहिले आणि त्यांना समजले
    तर त्यांच्यात कदाचित बदल होईल आणि त्यांना क्षमा करण्यात येईल.’” (C)

बियांविषयीच्या बोधकथेचे येशू स्पष्टीकरण करतो(D)

13 मग तो त्यांस म्हणाला, “तुम्हांला ही बोधकथा समजत नाही काय? तर मग तुम्हांला दुसरी कोणतीही गोष्ट कशी समजेल? 14 पेरणारा वचन पेरतो. 15 काही लोक वाटेवर पेरलेल्या बियांसारखे जेथे वचन पेरले आहे अशासारखे आहेत. जेव्हा ते ऐकतात तेव्हा लगेच सैतान येतो आणि त्यांच्यात पेरलेले वचन घेऊन जातो.

16 “काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात. 17 पण त्यांनी ते वचन आपल्यामध्ये खोलवर रूजू (मुळावु) न दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकटे येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात.

18 “इतर लोक काटेरी झुडपात बी पेरल्याप्रमाणे आहेत. ते असे आहेत की, जे वचन ऐकतात. 19 परंतु या संसाराच्या चिंता, संपत्तीचा मोह, आणि इतर गोष्टींची इच्छा या गोष्टी आड येतात, व वचन खुंटवितात व ते फळ देत नाहीत.

20 “आणि इतर दुसरे चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियांसारखे आहेत. ते असे आहेत की जे वचन ऐकतात, स्वीकारतात, आणि फळ देतात. कोणी तीसपट. साठपट, कोणी शंभरपट.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center