Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
20 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून
येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्व प्राप्त करुन देवो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो.
तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.
3 तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले
त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
4 तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो.
तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
5 देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल.
देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल
ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
6 परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले.
देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत:च निवडलेल्या राजाला उत्तर दिले.
देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
7 काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यांवर विश्वास ठेवतात
परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
8 त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला.
ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.
9 परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले.
देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.
15 आदल्या दिवशी परमेश्वराने शमुवेलला सांगितले होते, 16 “उद्या यावेळी मी तुझ्याकडे बन्यामीन घराण्यातील एकाला पाठवीन. त्याला तू अभिषेकपूर्वक इस्राएलवर राजा म्हणून नेम. पलिष्ट्यांपासून तो माझ्या लोकांना वाचवील. लोकांचे गाऱ्हाणे माझ्याकडे आले आहे. ते मी ऐकून घेतले आहे.”
17 शौल शमुवेलच्या दृष्टीस पडताक्षणीच परमेश्वर म्हणाला, “हाच तो मी सांगितलेला माणूस. तो माझ्या लोकांवर राज्य करील.”
18 शौलने शमुवेलला वेशीजवळ गाठले आणि तो म्हणाला, “संदेष्ट्यांचे घर कोठे आहे ते कृपा करुन मला सांगाल का?”
19 शमुवेल म्हणाला, “मीच तो, तू पुढे हो आणि भक्तीच्या ठिकाणी जा. तुम्ही दोघेजण आज माझ्याबरोबर भोजन करा. उद्या सकाळी मी तुझी रवानगी करीन. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. 20 आणि तीन दिवसांपूर्वी हरवलेल्या त्या गाढवांची काळजी करु नकोस. ती सापडली आहेत. आता इस्राएलला तुझी गरज आहे. इस्राएलला तू आणि तुमच्या घराण्यातील सर्व हवे आहात.”
21 शौल म्हणाला, “मी बन्यामीन घराण्यातला आहे. आमचे घराणे इस्राएल मधले सर्वात लहान घराणे आहे आणि बन्यामीन घराण्यात आमचे कुटुंब सगळ्यात छोटे आहे. मग इस्राएलला मी कशासाठी हवा आहे बरे?”
22 शमुवेलने मग त्यांना आणि त्याच्या नोकराला भोजनाच्या ठिकाणी नेले. तेथे तीस एक लोकांना भोजनासाठी आणि यज्ञात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. शमुवेलने या दोघांना पंगतीतल्या मानाच्या ठिकाणी बसवले. 23 शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “मांसाचा मी तुला राखून ठेवायला सांगितलेला वाटा आण.”
24 आचाऱ्याने मांडीचा भाग आणून शौलाच्या पुढे ठेवला. शमुवेल म्हणाला, “तुझ्यासाठी मी हा राखून ठेवला आहे. या विशेष प्रसंगासाठी मी तो ठेवला होता. तो तू खा.” तेव्हा शौल शमुवेलच्या पंगतीला बसून जेवला.
25 भोजन आटोपल्यावर ते उपासना स्थळाहून खाली नगरात आले. शमुवेलाने शौलासाठी घराच्या गच्चीत बिछाना घातला. शौल तेथे झोपला.
26 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे शमुवेलाने शौलाला जोरात हाक मारुन उठवले. तो म्हणाला, “ऊठ आता मी तुझी रवानगी करतो.” शौल उठला आणि शमुवेल बरोबर घराच्या बाहेर पडला.
27 शौल त्याचा नोकर आणि शमुवेल गावाच्या सीमेपाशी आले. तेव्हा शमुवेल शौलाला म्हणाला, “तुझ्या नोकराला पुढे व्हायला सांग तुझ्यासाठी परमेश्वराचा संदेश आहे.” तेव्हा नोकर पुढे चालू लागला.
त्यांचे तारण करण्यासाठी ख्रिस्त मनुष्यांसारखा झाला
5 जे येणारे नवीन जग होते त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही, त्याच भविष्याकाळातील जगाविषयी आपण बोलत आहोत. 6 पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे:
“मनुष्य कोण आहे की ज्याची
तुला चिंता वाटते?
किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की
ज्याचा तू विचार करावास?
7 थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले
तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
8 तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” (A)
देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही. 9 परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
2006 by World Bible Translation Center