Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तुतिगीत.
108 देवा, मी तयार आहे.
मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
2 वीणांनो आणि सतारींनो,
आपण सुर्याला जाग आणू या.
3 परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु.
आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.
4 परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे.
तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
5 देवा, स्वर्गाच्याही वर उंच जा.
सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
6 देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर.
7 देव त्याच्या मंदिरात बोलला,
“मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन.
मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
8 गिलाद आणि मनश्शे माझी असतील.
एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल.
यहुदा माझा राजदंड असेल.
9 मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल.
अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल.
मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद करीन.”
10 मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल?
मला अदोमशी लढायला कोण नेईल?
11 देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस.
पण तू आम्हाला सोडून गेलास.
तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
12 देवा, आम्हाला आमच्या शत्रूंचा पराभव करायला मदत कर.
लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.
13 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो.
देव आमच्या शत्रूंचा पराभव करु शकतो.
शौल आपल्या वडीलांच्या गाढवांच्या शोधात
9 अबीएलचा मुलगा कीश हा बन्यामीन घराण्यातील एक ख्यातनाम गृहस्थ होता. अबीएलचे वडील सरोर, सरोरचे वडील बखोरथ आणि बखोरथचे वडील अफीया अशी ही परंपरा होती. 2 कीशाला शौल नावाचा मुलगा होता. हा देखणा आणि तरुण असून देखणेपणात आणि उंचीच्या बाबतीत इस्राएलात त्याच्याशी बरोबरी करणारे कोणीही नव्हते. प्रत्येक इस्राएल मनुष्य त्याच्या खांद्याला लागे.
3 एकदा कीशाची गाढवे वाट चुकली. तेव्हा कीश शौलाला म्हणाला, “नोकारांपैकी कोणाला तरी बरोबर घेऊन गाढवांचा शोध घे.” 4 शौल त्याप्रमाणे आपल्या वडीलांच्या गाढवांच्या शोधार्थ निघाला. एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश, शलीशाच्या भोवतालचा प्रांत पालथा घातला तरी त्याला आणि त्याच्या नोकराला गाढवे सापडेनात. तेव्हा ते शालीम प्रांतात गेले. पण तिथेही शोध लागला नाही. म्हणून पुढे ते बन्यामीन प्रदेशातून हिंडले. पण गाढवे मिळाली नाहीतच.
5 शेवटी ते दोघे सूफ या नगराशी आले. तेव्हा शौल आपल्या नोकराला म्हणाला, “आता आपण परतीच्या वाटेला लागलेले बरे. कारण गाढवांचा विचार सोडून देऊन वडील आता आपल्याच चिंतेत पडतील.”
6 पण नोकर म्हणाला, “या गावात एक परमेश्वराचा माणूस संदेष्टा आहे. लोक त्याला मानतात. तो बोललेले खरे ठरते. तेव्हा आपण या गावात जाऊ. कदाचित् तो आपल्याला पुढचा मार्ग दाखवील.”
7 शौल म्हणाला, “तर मग आपण जाऊच या पण त्याला द्यायचे काय? त्याला देण्यासारखे तर आपल्याजवळ काहीच नाही. आपल्याजवळचे फराळाचे सुध्दा संपले. मग त्याला काय देणार?”
8 तेव्हा पुन्हा नोकाराने सांगितले, “माझ्याकडे थोडे पैसे [a] आहेत तेच आपण त्या परमेश्वराच्या माणसाला देऊ. मग तो आपल्याला पुढची वाट दाखवेल.”
9-11 शौंल नोकराला म्हणाला, “ठीक आहे, चल जाऊ.” आणि ते तिकडे निघाले. चढूण जात असताना वाटेत त्यांना पाण्याला चाललेल्या काही तरुण मुली भेटल्या. त्यांना त्यांनी संदेष्ट्याचा पत्ता विचारला.
12 तेव्हा त्या म्हणाल्या, “तो आत्ताच पुढे गेला आहे. लवकर पुढे जा. तो आजच या गावी आला आहे कारण लोक उच्च स्थानी शांत्यर्पण करणार आहेत. 13 पुढे गेल्यावर तुम्हाला तो दिसेल. घाई केलीत तर भोजनासाठी तो भक्ती स्थळापाशी पोचायच्या अगादेर तुम्ही त्याला भेटू शकाल. तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तिथे पोहोंचे पर्यंत लोक जेवायला सुरुवात करत नाहीत. म्हणून लौकर जा.” पूर्वी कोणी असे परमेश्वराला प्रश्न विचारायला निघाले, “चला, संदेष्ट्याकडे जाऊ” असे म्हणत असत. कारण तेव्हा परमेश्वराच्या माणसाला संदेष्टा म्हणत.
14 तेव्हा शौल आणि त्याचा नोकर वर नगराच्या दिशेने जाऊ लागले. नगरात शिरतात तो त्यांना शमुवेल त्यांच्या दिशेने येताना दिसला. तो त्या यज्ञाच्या ठिकाणी जायला निघालाच होता.
येशूचे सामर्थ्य देवापासून आहे(A)
14 येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता तो, भूत बाहेर आल्यावर, बोलू लागला व लोकांचा जमाव चकित झाला. 15 परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की, “भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.”
16 काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले. 17 पण त्यांच्या मनात काय होत हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरात एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात. 18 आणि तुम्ही म्हणता तशी जर भुतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हांला हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो.. 19 पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी (तुमची मुले) कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. 20 परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग हे स्पष्ट आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.
21 “जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो आणि स्वतःचे रक्षण करतो तेव्हा त्याची मालमता सुरक्षित राहते. 22 परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करुन त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्यांने भरंवसा ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.
23 “जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.
रिकामा मनुष्य(B)
24 “जेव्हा भूत माणसाबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्याला ती विश्रांति मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, ‘मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’ 25 तो जातो आणि त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते. 26 नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे मिळवितो, आणि ते आत जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
खरे धन्य लोक
27 असे घडले की, तो या गोष्टी बोलला तेव्हा गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस!”
28 परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”
2006 by World Bible Translation Center