Revised Common Lectionary (Semicontinuous)
4 तेव्हा इस्राएलची सर्व वडील धारी मंडळी एकत्र जमून रामा येथे शमुवेलला भेटायला गेली. 5 शमुवेलला ते लोक म्हणाले, “तुम्ही तर वृध्द झालात. तुमच्या मुलांचे वागणे बरोबर नाही. ती तुमच्यासारखी नाहीत. तेव्हा इतर राष्ट्राप्रमाणेच आमच्यावर ही राज्यकारभार करण्यासाठी राजा नेमा.”
6 आपल्यावर शासन करण्यासाठी त्यांनी राजाची मागणी करावी हे शमुवेलला ठीक वाटले नाही. तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. 7 परमेश्वर त्याला म्हणाला, “लोक म्हणतात तसे कर. त्यांनी काही तुला नाकारलेले नाही. त्यांनी माझा धिक्कार केला आहे. त्यांना मी राजा म्हणून नको आहे. 8 हे त्यांचे वागणे नेहमीचेच आहे. मी त्यांना मिसरमधून बाहेर आणले पण मला सोडून ते इतर दैवतांच्या मागे लागले. आता ते तुझ्याशीही तसेच वागत आहेत. 9 त्यांचे ऐक आणि त्यांना हवे तसे कर. पण त्या आधी त्यांना इशारा दे. राजाचा कारभार कसा असतो, तो कशी सत्ता गाजवतो ते त्यांना सांग.”
10 लोकांनी राजा मागितला, तेव्हा, शमुवेलने, परमेश्वराने सांगितले ते सर्व त्यांना ऐकवले. 11 तो म्हणाला, “राजा आपली सत्ता कशी गाजवेल ते ऐका. तुमच्या मुलांना तो तुमच्यापासून हिरावून घेईल. त्यांना बळजबरीने सैन्यात दाखल करील. रथावर, घोड्यांवर स्वार व्हायला लावून तो त्यांना युद्धाला जुंपील. तुमची मुले राजाच्या रथा पुढे रक्षक म्हणून धावतील.
12 “काहीजण हजाराहजारावर तर काही पन्नास-पन्नास सैनिकांवर नायक म्हणून नेमली जातील. काही मुलं शेतीच्या कामात राबतील तर काहींना शस्त्रास्त्रे, रथाचे भाग बनविणे या कामाला लावले जाईल.
13 “राजा तुमच्या मुलींनाही कामाला लावील. अत्तरे करणे, स्वयंपाकपाणी, भटारखान्यात राबणे ही कामे त्यांच्याकडून करुन घेईल.
14 “तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे, जैतुनांच्या बागा तुमच्या कडून काढून घेऊन तो त्या आपल्या अधिकाऱ्यांच्या हवाली करील. 15 धान्यातील आणि द्राक्षांतील एकदशांश हिस्सा तुमच्या कडून घेऊन राजा आपल्या अधिकांऱ्याना आणि नोकरांना देईल.
16 “तुमचे नोकर, दासी, दुभती जनावरे, गाढवे तुमच्याकडून काढून स्वतःच्या ताब्यात घेईल. 17 तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशांश हिस्साही घेईल.
“तुम्ही त्याचे दास व्हाल. 18 तुमच्यावर अशी वेळ आली की मग असा राजा निवडल्याबद्दल परमेश्वराकडे गाऱ्हाणे न्याल. पण तेव्हा परमेश्वर तुमचे ऐकणार नाही.”
19 पण लोक शमुवेलाचे ऐकायला तयार नव्हते ते म्हणाले, “आम्हाला राजा हवाच आहे. 20 मग आम्ही इतर राष्ट्रांच्या बरोबरीला येऊ. तो आमचे नेतृत्व करील. आमच्यासाठी लढाया करील.”
14 तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आता आपण सगळे गिलगाल येथे जाऊ. तेथे पुन्हा नव्याने शौलाला राजा म्हणून घोषित करु.”
15 त्याप्रमाणे सर्वजण गिलगाल येथे जमले. परमेश्वरासमोर त्यांनी शौलला राजा केले. परमेश्वरासमोर शांत्यर्पणे केली. शौल आणि सर्व इस्राएली यांनी उत्सव साजरा केला.
दावीदाचे स्तोत्र.
138 देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो.
मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.
2 देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो.
मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो.
तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस.
आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस.
3 देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली
आणि तू मला होकार दिलीस.
तू मला शक्ती दिलीस.
4 परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील
तेव्हा ते तुझी स्तुती करतील.
5 ते परमेश्वराच्या पध्दतीचे गुणगान करतील
कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे.
6 देव फार म्हत्वाचा आहे पण तो दुबळ्यालोकांचा कैवारी आहे
गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे
परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो.
7 देवा, मी जर संकटात सापडलो तर मला जिवंत ठेव.
जर माझे शत्रू माझ्यावर रागावले तर त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
8 परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे.
परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते.
परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोडू नकोस.
13 असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला; म्हणून मी बोललो आहे.” विश्वासच्या त्याच आत्म्याने आम्हीसुद्धा विश्वास ठेवतो आणि म्हणून बोलतो. 14 कारण आम्हांला माहीत आहे ज्याने प्रभु येशूला उठविले, तो त्याच्याबरोबर आम्हांला उठवील व आम्हांला तुमच्याबरोबरच त्याच्यासमोर सादर करील. 15 कारण या सर्व गोष्टी तुम्हाकरिता आहेत. यासाठी की, पुष्कळांच्या द्धारे विपुल झालेली कृपा अनेकांच्या उपकारस्तुतीमुळे देवाचे भरघोस गौरव होण्याला कारण व्हावी.
विश्वासाचे जगणे
16 म्हणून आम्ही धीर सोडीत नाही. जरी बाह्यदृष्ट्या आम्ही व्यर्थ ठरत आहोत तरी अंतरीकदृष्ट्या आम्ही दिवसेंदिवस नवीन होत आहोत. 17 कारण आमची हलकी व क्षणिक दु:खे ही आमच्यासाठी अनंतकळचे गौरव मिळवीत आहेत, जे दु:खापेक्षा कितीतरी मोठे आहे. 18 म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायमस्वरुपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावीत नाही पण जे दिसत नाही, पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे, पण जे दिसत नाही, ते अनंतकालीक आहे.
5 आता आम्हांला माहीत आहे की, जेव्हा जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले, तर आम्हाला देवापासून मिळलेले अनंतकाळचे घर स्वर्गात आहे. ते मानवी हातांनी बांधलेले नाही.
काही यहूदी येशूमध्ये अशुद्ध आत्मा आहे असे म्हणतात(A)
20 नंतर येशू घरी गेला आणि पुन्हा एकदा एवढा मोठा लोकसमुदाय जमला की, येशू व त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत. 21 त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणावयास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे.
22 यरूशलेमेहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, “याच्यामध्ये बालजबूल आहे. आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भुतांना घालवून देतो.”
23 मग य़ेशूने त्यांना जवळ बोलाविले व बोधकथेच्या साहाय्याने त्याच्याशी बोलू लागला, “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल? 24 जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही. 25 आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही. 26 तर मग सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही. परंतु त्याचा शेवट होईल.
27 “खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मिळकत लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान माणसाला बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.
28 “मी तुम्हांस खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल. 29 पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”
30 येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे.
येशूचे अनुयायी हे त्याचे खरे कुटुंब आहे(B)
31 नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले. ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलवावयास पाठविले. 32 लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, “पाहा तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.”
33 त्याने त्यांना उत्तर दिले. “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?” 34 येशूने जे त्याच्याभोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पाहा माझी आई आणि माझे भाऊ. 35 जे जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई आहेत.”
2006 by World Bible Translation Center