Revised Common Lectionary (Semicontinuous)
99 परमेश्वर राजा आहे
म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या.
देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो
म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
2 सियोन मधला परमेश्वर महान आहे.
तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे.
देवाचे नाव भीतीदायक आहे.
देव पवित्र आहे.
4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो.
देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि
प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि
त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते
आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता.
त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली
आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 देव उंच ढगांतून बोलला.
त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या
आणि देवाने त्यांना नियम दिले.
8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस,
तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस
आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा.
परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.
एली आपल्या नीच मुलांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी
22 एली आता म्हतारा होत चालला. शिलोह येथे येणाऱ्या इस्राएलींशी होणारे आपल्या मुलांचे वर्तन पुन्हा पुन्हा त्याच्या कानावर येऊ लागले. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवेत असलेल्या बायकांशी त्यांनी कसा अतिप्रसंग केला हेही त्याने ऐकले.
23 तेव्हा तो मुलांना म्हणाला, “तुमचे प्रताप माझ्या कानावर आले आहेत. अशी नीच कृत्ये तुम्ही का करता? 24 मुलांनो, असे करत जाऊ नका. परमेश्वराचे लोक तुमच्याविषयी फार वाईट बोलत आहेत. 25 एका माणसाने दुसऱ्या माणसाचा काही अपराध केला तर परमेश्वर एकवेळ त्याच्या मदतीला येईल. पण परमेश्वराविरुध्दच पातक केले तर त्याच्या मदतीला कोण धावून येणार?”
पण एलीच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केले. तेव्हा परमेश्वराने या मुलांना मारायचे ठरवले.
26 शमुवेल मोठा होत चालला. परमेश्वर आणि लोक त्याच्यावर प्रसन्न होते.
एलीच्या घराण्याविषयी अरिष्ट सूचक भविष्य
27 एकदा परमेश्वराचा संदेष्टा एलीकडे आला आणि म्हणाला, “परमेश्वराने हा निरोप दिला आहे: ‘तुझे पूर्वज फारोच्या घराण्यात दास होते. तेव्हा मी त्यांच्या पुढे प्रगट झालो. 28 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधून तुमच्याच घराण्याची मी माझे याजक होण्यासाठी म्हणून निवड केली. वेदीवर यज्ञबली अर्पण करावा, धूप जाळावा, एफोद घालावा म्हणून मी तुम्हाला निवडले. इस्राएलचे लोक यज्ञ करतात त्यातील मांस मी तुम्हाला घेऊ दिले. 29 तेव्हा तुम्ही त्या यज्ञाचा आणि देणग्यांचा आदर ठेवत नाही हे कसे? माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांचाच मान ठेवतोस? इस्राएल लोक मला जे मांस वाहतात, त्यातील उत्कृष्ट भाग स्वतःसाठी घेऊन तू पुष्ट झाला आहेस.’
30 “तुझे घराणेच निरंतर त्याची सेवा करील असे इस्राएलचा देव जो परमेश्वर याने म्हटले होते खरे. पण आता त्याचे म्हणणे असे आहे की, ‘इथून पुढे असे होणार नाही. माझा आदर ठेवतात त्यांचा मी मान राखीन. पण जे अनादर करतात त्यांच्यावर संकटे कोसळतील. 31 तुझ्या सर्व वंशजांचा संहार करायची वेळ येऊन ठेपली आहे. तुझ्या घराण्यातील कोणीही आता दीर्घायुषी होणार नाही.. 32 इस्राएलमध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र सगळी दुर्दशा होईल. [a] तुझ्या घरातले कोणी म्हातारा होई पर्यत जगणार नाही. 33 माझ्या वेदीजवळ याजक म्हणून सेवा करायला फक्त एकाला मी शिल्लक ठेवीन. त्याला दीर्घायुष्य लाभेल. तो जराजर्जर होईपर्यंत जगेल. तुझे वंशज मात्र तलवारीला बळी पडतील. 34 हे सर्व खरेच घडणार आहे याची प्रचीती मी तुला दाखवीन. तुझे दोनही मुलगे हफनी आणि फिनहास, एकाच दिवशी मरतील. 35 मी एका विश्वासू याजकाची माझ्यासाठी निवड करीन. तो माझे ऐकेल आणि माझ्या मनाप्रमाणे काम करील. या याजकाच्या घराण्याला मी स्थिरस्थावर करीन. मी निवडलेल्या राजापुढे तो सेवेत राहील. 36 मग तुझ्या घरातील उरले सुरले लोक येऊन या याजकापुढे नतमस्तक होतील. किरकोळ रक्कम किंवा भाकरतुकडा याच्यासाठी ते पदर पसरतील आणि म्हणतील, “माझ्या भाकरीची सोय व्हावी म्हणून याजकपदातील एखादे काम मला द्या.”’”
तळ्याकाठच्या रोग्याला येशू बरे करतो
5 नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला. 2 यरुशलेमात एक तळे आहे. त्या तळ्याला लागून पाच पडव्या आहेत. (होत्या) यहूदिभाषेत। [a] त्या तळ्याला बेथेझाथा [b] म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे. 3 तव्व्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते. [c] 4 कारण की देवदूत वेळोवेळी तव्व्यात उतरुन पाणी हालवीत असे आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. 5 तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी पडून होता. 6 येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले, तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले. “तुला बरे व्हावयाला पाहिजे का?”
7 त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले, “महाराज, पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ति नाही. सर्वांत अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की, माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो.”
8 मग येशू म्हणाला, “उठून उभा राहा! आपली खाट उचल आणि चालू लाग.” 9 तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला, तो आपली खाट उचलून चालू लागला.
हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता. 10 म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला यहुदी म्हणाले, “आज शब्बाथाचा दिवस आहे. शब्बाथाच्या दिवशी तू आपली खाट उचलून नेणे आपल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
11 परंतु तो मनुष्य म्हणाला, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले की, तू आपली खाट उचल आणि चालू लाग.”
12 यहुदी लोकांनी त्या मनुष्याला विचारले. “तुला आपली खाट उचलून चालायला कोणी सांगितले?”
13 परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते त्या ठिकाणी बरेच लोक होते, आणि येशू तेथून निघून गेला होता.
14 त्यानंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, आता तू बरा झाला आहेस. पण पाप करण्याचे सोडून दे. नाही तर तुझे अधिक वाईट होईल!”
15 नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहूदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की, ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे.
16 येशू शब्बाथ दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहूदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले. 17 परंतु येशू यहूदी लाकांना म्हणाला, “माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो”.
18 यावरुन यहूदी लोकांचा येशूला जिवे मारण्याचा पक्का निश्चय झाला. ते म्हणाले, “पहिली गोष्ट ही की, येशू शब्बाथासंबंधीचा नियम मोडतो. दुसरे, ‘देव माझा पिता आहे!’ असे तो म्हणाला. तो स्वतःची देवाशी बरोबरी करतो”.
2006 by World Bible Translation Center