Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.
139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे
त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
तू माझी रोज पाहणी केलीस.
त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.
एलकाना आणि त्याचे कुटुंबीय यांची शिलोह येथे भक्ती
1 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला, एलकाना नावाचा एक गृहस्थ होता. हा एलकाना सूफ घराण्यातला असून यरोहाम (किंवा यरामील) याचा मुलगा. यरोहाम एलिहूचा मुलगा आणि एलिहू तोहूचा. तोहू, एफ्राईम घराण्यातील सूफचा मुलगा होय.
2 एलकानाला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळं होती, पण हन्नाला मात्र अजून मूल झाले नव्हते.
3 एलकाना दरवर्षी रामा या आपल्या गावाहून शिलोह येथे जात असे. तेथे तो यज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वराची भक्ती करत असे. तेथे हफनी आणि फिनहास हे एलीचे मुलगे याजक म्हणून पौरोहित्य करीत होते. 4 एलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्यांच्या वाटचे अन्न देई. 5 हन्नालाही तो समान वाटा देई. परमेश्वराने तिची कूस उजवलेली नसतानाही तो देई, कारण हन्नावर त्याचे खरेखुरे प्रेम होते.
हन्नाचा पाण उतारा
6 पनिन्ना दर वेळी काहीतरी बोलून हन्नाला दु:खवी. मूलबाळ नसल्यावरुन दूषणे देई. 7 असे दरवर्षी चालायचे. शिलो येथील परमेश्वराच्या मंदिरात सर्व कुटुंबीय जमले की पनिन्नाच्या बोलण्यामुळे हन्ना कष्टी होई. एकदा असेच एलकाना यज्ञ करीत असताना हन्ना दु:खीकष्टी होऊन रडू लागली. ती काही खाईना. 8 एलकाना ते पाहून म्हणाला, “तू का रडतेस? तू का खात नाहीस? तू का दु:खी आहेस? तुला मी आहे-मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी दहा मुलांपेक्षा अधिक आहे.”
हन्नाची प्रार्थना
9 सर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता. 10 हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले. 11 परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”
12 हन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते. 13 ती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर फुटत नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले. 14 एली तिला म्हणाला, “तू फार प्यायलेली दिसतेस. आता मद्यापासून दूर राहा.”
15 हन्ना म्हणाली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाऱ्हाणी सांगत होते. 16 मी वाईट बाई आहे असे समजू नका. मी फार व्यथित आहे, मला फार दु:खं आहेत म्हणून मी खूप वेळ प्रार्थना करीत होते इतकंच.”
17 तेव्हा एली म्हणाला, “शांतीने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”
18 “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे.” असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाल्लेही. आता तिला उदास वाटत नव्हते.
पौल कैसराची भेट घेऊ इच्छितो
25 मग त्या प्रांतात फेस्त आला. आणि तीन दिवसांनी तो कैसरीयाहून वर यरुशलेमला गेला. 2 मुख्य याजकांनी आणि यहूदी पुढाऱ्यांनी फेस्तच्या पुढे पौलावरील आरोप सादर केले. 3 आणि पौलाला यरुशलेमला पाठवून द्यावे, अशी त्याला विनंति केली. पौलाला वाटेत ठार मारण्याचा ते कट करीत होते. 4 फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे बंदिवासात आहे आणि मी स्वतः लवकरच कैसरीयाला जाणार आहे. 5 तुमच्यातील काही पुढाऱ्यांनी माझ्याबरोबर तिकडे खाली यावे, आणि जर त्या मनुष्याने काही चूक केली असेल तर त्याच्यावर दोषारोप ठेवावा.”
6 त्यांच्याबरोबर आठ ते दहा दिवस घालविल्यानंतर फेस्त खाली कैसरीयाला परत गेला. दुसऱ्या दिवशी फेस्त न्यायालयात बसला आणि त्याने आपल्यासमोर पौलाला हजर करण्याचा आदेश दिला. 7 जेव्हा पौल तेथे हजर झाला, तेव्हा यरुशलेमहून तेथे आलेले यहूदी लोकही पौलाच्या सभोवती उभे राहिले, त्यांनी त्याच्यावर पुष्कळ गंभीर आरोप ठेवले, परंतु ते आरोप यहूदी लोक सिद्ध करु शकले नाहीत. 8 पौल आपला बचाव करण्यासाठी असे म्हणाला, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या, मंदिराच्या किंवा कैसराच्या विरुद्ध काही गुन्हा केलेला नाही.”
9 फेस्तला यहूदी लोकांना खूष करायचे होते म्हणून तो पौलाला म्हणाला, “यरुशलेम येथे जाऊन माइयासमोर तुझी चौकशी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय?”
10 पौल म्हणाला, “मी आता कैसराच्या न्यायासनासमोर उभा असून त्याच्यासमोर माझा न्यायनिवाडा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. मी यहूदी लोकांचा काहीही अपराध केलेला नाही, हे आपणांस चांगले माहीत आहे. 11 मी जर काही गुन्हा केला असेल तर मला मरणदंड झाला पाहिजे. आणि त्यापासून सुटका व्हावी असा प्रयत्न मी करणार नाही. परंतु जे आरोप हे लोक माझ्यावर करीत आहेत, ते खरे नसतील तर मला कोणी यांच्या हाती देऊ शकणार नाही, मी आपले गाऱ्हाणे कैसरासमोर मांडू इच्छितो.”
12 यावर फेस्तने आपल्या सभेशी सल्लामसलत केली. मग त्याने पौलाला सांगितले, “तू कैसरापुढे आपला न्यायनिवाडा व्हावा अशी इच्छा दाखविली आहे, म्हणून तुला कैसरासमोर पाठविण्यात येईल.”
2006 by World Bible Translation Center