Revised Common Lectionary (Semicontinuous)
देव यशयाला संदेष्टा होण्यास बोलावतो
6 उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते. 2 देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत. 3 ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते. 4 त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराची चौकट हादरली नंतर मंदिर धुराने भरून गेले.
5 मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द् नाहीत. [a] तरीसुध्दा् राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.”
6 तेथे वेदीवर अग्नी प्रज्वलित केलेला होता एका सराफ देवदूताने चिमट्याने त्यातील निखारा उचलला. सराफ देवदूत तो निखारा घेऊन माझ्याकडे उडत आला. 7 त्या निखांऱ्याचा स्पर्श त्याने माझ्या तोंडाला केला नंतर तो देवदूत म्हणाला, “हे बघ! ह्या निखाऱ्याच्या स्पर्शाने तुझी सर्व दुष्कृत्ये नाहिशी झाली आहेत. तुझी पापे आता पुसली गेली आहेत.”
8 नंतर मला माझ्या परमेश्वराचा आवाज ऐकू आला. परमेश्वर म्हणाला, “मी कोणाला पाठवू! आमच्यासाठी कोण जाईल?”
मग मी म्हणालो, “हा मी तयार आहे, मला पाठव.”
दावीदाचे स्तोत्र.
29 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
2 परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा.
तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
3 परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो
गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
4 परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते.
त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
5 परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो.
परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6 परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते.
सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
7 परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
8 परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
9 परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो.
परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता
आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो.
परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.
12 तर मग बंधूनो, आम्ही कर्जदार आहोत, देहाप्रमाणे जगण्यास देहाचे नव्हे. 13 कारण जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात, परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल.
14 कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो, तितके देवाची मुले आहेत. 15 पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो. 16 तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर दुजोरा देतो की, आपण देवाची मुले आहोत. 17 आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. खरोखर आपण त्याच्याबरोबर दु:ख भोगतो यासाठी की, त्याच्याबरोबर आपणांस गौरवही मिळावे.
येशू आणि निकदेम
3 निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परूशी लोकांपैकी एक असून तो यहूदी लोकांचा एक महत्त्वाचा पुढारी होता. 2 एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, “रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हांला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत.”
3 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखाद्या माणसाचा नव्याने जन्म झाला नाही, तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही.”
4 निकदेम म्हणाला. “जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही! म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही!”
5 येशूने उत्तर दिले. “मी तुम्हांला खरे सांगतो: मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. 6 मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो. परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. 7 तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हांला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका. 8 वाऱ्याला वहायला पाहिजे तिकडे तो वाहतो, वारा वाहताना तुम्हांला त्याचा आवाज ऐकू येतो. परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्थेक माणसाचे असेच असते.”
9 निकदेम म्हणाला, “हे सारे कसे शक्य आहे?”
10 येशू म्हणाला, “तुम्ही इस्राएलाचे प्रमुख शिक्षक आहात. तरीही तुम्हांला या गोष्टी कळत नाहीत काय? 11 मी तुम्हांला खरे तेच सांगतो. आम्हांला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविष्यी आम्ही सांगतो. परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानीत नाही. 12 मी तुम्हांला जगातील गोष्टीविषयी सांगितले पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हांला स्वर्गातील गोष्टीविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही! 13 मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरुन खाली आला.”
14 “मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. [a] मनुष्याच्या पुत्रालाही तसेच उंच केले पाहिजे. 15 अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळू शकते.”
16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले.
2006 by World Bible Translation Center