Revised Common Lectionary (Semicontinuous)
24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
25 समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे!
आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात.
तिथे लहान मोठे प्राणी आहेत.
मोजता न येण्याइतके.
26 समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान,
तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.
27 देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत.
तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.
28 देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस.
तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.
29 आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात.
त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात.
ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.
30 पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात
आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.
31 परमेश्वराचे वैभव सदैव राहो!
परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.
32 परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते.
त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.
33 मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन.
मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.
34 मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते.
मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.
35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वराची स्तुती कर.
सुक्या हाडांचा दृष्टान्त
37 परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. परमेश्वराच्या आत्म्याने मला गावातून उचलून दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती दरी मृतांच्या हाडांनी भरलेली होती. 2 दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होत. त्यामधून परमेश्वराने मला चालायला लावले. ती हाडे अगदी सुकलेली असल्याचे मी पाहिले.
3 मग, परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होऊ शकतील का?”
मी उत्तरलो, “परमेश्वर देवा, ह्याचे उत्तर फक्त तुलाच माहीत आहे.”
4 परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने त्या हाडांशी बोल. त्यांना सांग ‘सुक्या हाडांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. 5 परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो: मी तुमच्यात प्राण निर्माण करीन मग तुम्ही जिवंत व्हाल. 6 मी तुमच्यावर स्नायू आणि मांस चढवीन आणि त्यावर कातडे ओढीन. मग तुमच्यात प्राण ओतीन. म्हणजे तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजून चुकेल की मीच परमेश्वर व प्रभू आहे.’”
7 मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, त्याच्यावतीने हाडांशी बोललो. माझे बोलणे सुरु असतानाच, मला मोठा आवाज ऐकू आला. हाडांचा खुळखुळाट झाला. ती एकमेकांना जोडली गेली. 8 माझ्या डोळ्यासमोर हाडांवर स्नायू, मांस व कातडे चढले. पण ती शरीरे हालली नाहीत. कारण त्यांत प्राण नव्हता.
9 मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने वाऱ्याशी बोल. त्याला पुढील गोष्टी माझ्यावतीने सांग: ‘सर्व बाजूंनी येऊन तू ह्या शरीरात स्पंदन निर्माण कर त्यांच्यात प्राण घाल, म्हणजे ती पुन्हा जिवंत होतील.’”
10 मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वाऱ्याशी बोललो. मग मृत शरीरांत जीव आला. ती जिवंत होऊन उभी राहिली ते पुष्कळ लोक होते. ते मोठे सैन्यच होते.
11 मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे जणू काही सर्व इस्राएली कुळच आहे. इस्राएलचे लोक म्हणतात, ‘आमची हाडे सुकून गेली आहेत. [a] आम्हाला आशा राहिलेली नाही. आमचा संपूर्ण नाश झाला आहे.’ 12 म्हणून त्यांच्याशी माझ्यावतीने बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो ‘माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला कबरीतून बाहेर काढीन. मग मी तुम्हाला इस्राएलच्या भूमीत आणीन. 13 माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला त्यातून बाहेर काढल्यावर त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे. 14 मी तुमच्यात माझा आत्मा [b] ओतीन. म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग मी परमेश्वर असल्याचे कळेल. मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या, हे ही तुमच्या लक्षात येईल.’” परमेश्वरच हे सर्व बोलला.
येशू त्याच्या शिष्यांना दिसतो(A)
19 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.” 20 असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
21 पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.” 22 आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, “पवित्र आत्मा स्वीकारा. 23 जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्याला पापक्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.”
2006 by World Bible Translation Center