Revised Common Lectionary (Semicontinuous)
24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
25 समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे!
आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात.
तिथे लहान मोठे प्राणी आहेत.
मोजता न येण्याइतके.
26 समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान,
तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.
27 देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत.
तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.
28 देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस.
तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.
29 आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात.
त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात.
ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.
30 पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात
आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.
31 परमेश्वराचे वैभव सदैव राहो!
परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.
32 परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते.
त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.
33 मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन.
मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.
34 मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते.
मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.
35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वराची स्तुती कर.
जगाचे विभाजन
11 जलप्रलयानंतर पृथ्वीवरील सर्व लोकांची एकच भाषा व एकच बोली होती, 2 लोक पूर्वेकडून पुढे निघाले तेव्हा जाता जाता शिनार देशात त्यांना एक मोठे मैदान लागले आणि मग त्यांनी तेथेच वस्ती केली. 3 लोक म्हणाले, “चला, आपण विटा करु व त्या विस्तवात भाजू म्हणजे त्या खूप कठीण होतील;” तेव्हा लोकांनी घरे बांधण्यासाठी दगडाऐवजी विटांचा आणि चुन्याऐवजी डांबराचा उपयोग केला.
4 मग लोक म्हणाले, “चला, आपण आपणासाठी नगर बांधू; आणि आकाशाला भिडणारा उंचच उंच बुरुज बांधू; असे केले तर मग आपण नावाजलेले लोक होऊ व आपण पांगले जाणार नाहीं तर एके जागी एकत्र राहू.”
5 परमेश्वर ते नगर व तो उंच बुरुज पाहण्यासाठी खाली आला. लोक ते बांधीत आहेत असे परमेश्वराने पाहिले. 6 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हे सर्व लोक एकच भाषा बोलतात आणि हे बांधणीचे काम करण्यासाठी ते सगळे एकत्र जमले आहेत, ते काय करु शकतात त्यांची ही तर नुसती सुरवात आहे; लवकरच ते त्यांना जे पाहिजे ते करु शकतील, 7 तेव्हा आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करुन टाकू; मग मात्र त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाहीं,”
8 तेव्हा परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली म्हणून नगर व बुरुज बांधण्याचे काम तसेच राहिले. 9 ह्याच ठिकाणी परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला म्हणून त्या नगराला बाबेल म्हटले आहे. अशा रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणापासून इतरत्र पसरण्यास लोकांना भाग पाडले.
ख्रिस्ताचे शरीर
12 कारण ज्याप्रमाणे आपणातील प्रत्येकाला एकच शरीर आणि त्याला अनेक अवयव असतात, आणि तरीही सर्व अवयव जरी ते पुष्कळ असले तरी त्यांचे मिळून एक शरीर बनते. तसाच ख्रिस्तसुद्धा आहे. 13 जर आपण यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र असून आपणांला एकच आत्मा देह म्हणून दिला आहे. कारण एका आत्म्याने आपणाला एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा दिलेला आहे.
14 आता एका मानवी शरीरात एकच अवयव असत नाही, तर पुष्कळ असतात 15 जर पाय म्हणतो, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही, होते का? 16 आणि जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही. होते का? 17 संबंध शरीरच जर डोळा असते तर आपल्याला ऐकता कसे आले असते? 18 परंतु प्रत्यक्षात शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे ठेवला आहे. 19 आणि सर्व अवयव जर एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? 20 पण असे आहे की, अवयव अनेक आहेत, शरीर मात्र एकच आहे.
21 डोळा हाताला म्हणू शकत नाही की, “मला तुझी गरज नाही.” किंवा दुसरे उदाहरण द्यायचे तर डोक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” 22 याच्या उलट जे अवयव आपण कमी महत्त्वाचे समजतो, त्यांची आपण अधिक काळजी घेतो. 23 आणि जे न दाखवण्याजोगे अवयव त्यांना मोठ्या सभ्यतेने वागवतो. 24 पण आपल्या दाखविता येण्याजोग्या अवयवांना तशी गरज नसते. त्याऐवजी जे अवयव उणे आहेत त्यांना मोठा मान देण्यासाठी देवाने असे शरीर जुळविले आहे, 25 यासाठी की शरीरात कोणतेही मतभेद नसावेत तर उलट अवयवांनी एकमेकांची काळजी घ्यावी. 26 जर शरीराचा एक अवयव दुखत असेल तर सर्व अवयव त्याच्याबरोबर दु:ख सोसतात, एका अवयवाचा सन्मान झाला तर सर्व अवयव त्याच्याबरोबर आनंदीत होतात.
27 म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात
2006 by World Bible Translation Center