Revised Common Lectionary (Semicontinuous)
115 परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको.
सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि
आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
2 आमचा देव कुठे आहे,
याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
3 देव स्वर्गात आहे
आणि त्याला हवे ते तो करतो.
4 त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत.
कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
5 त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही.
त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
6 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही,
त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
7 त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही.
त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही
आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
8 ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात
ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.
9 इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
10 अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव.
परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
11 परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
12 परमेश्वर आमची आठवण ठेवतो.
परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल.
परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल.
परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
13 परमेश्वर त्याच्या लहान आणि
मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.
14 परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल.
अशी मी आशा करतो.
15 परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली
आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
16 स्वर्ग परमेश्वराचा आहे.
पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
17 मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
18 पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो
आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू.
परमेश्वराची स्तुती करा.
5 होमार्पणांची वेळ झाली तेव्हा मी उठलो; अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा स्थितीत मी गुडघे टेकून हात पसरुन देवापुढे बसलो. मी अतिशय लज्जित अशा अवस्थेत होतो. 6 तेव्हा मी ही प्रार्थना केली:
“हे परमेश्वरा, तुझ्याकडे पाहायाची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोचले आहेत. 7 आमच्या वाडवडीलांच्या वेळे पासून आतापर्यंत आम्ही अनेक पापांचे दोषी आहोत. आमच्या पापांची शिक्षा आमचे राजे आणि याजक यांना भोगावी लागली. परकीय राजांनी आमच्यावर आक्रमण करुन आमच्या लोकांना पकडून नेले. आमची संपत्ती लुटून त्या राजांनी आम्हाला लज्जित केले आजही तेच चालले आहे.
8 “पण आता तू अखेर आमच्यावर दया केली आहेस. बंदिवासातून सुटका करुन तू आमच्यापैकी काही जणांना या पवित्रस्थानी पारतून येऊ दिलेस. आम्हाला दास्यमुक्त करुन तू आम्हाला जीवदान दिलेस. 9 आम्ही गुलामच आहोत. पण तू आम्हाला आमच्या गुलामगीरीत आम्हाला सोडून गेला नाहीस. तू आमच्यावर दया केलीस. पारसाच्या राजांना तू आमच्याबाबतीत दयाळू केलेस. तुझे मंदिर उद्ध्वस्त झाले होते, पण त्याचा जीर्णोध्दार आमच्या हातून व्हावा म्हणून तू आम्हाला जीवदान दिलेस. यहूदा आणि यरुशलेमच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू साह्यकारी झालास.
10 “पण, देवा, आता आम्ही काय बोलावे? आम्ही पुन्हा तुझ्या मार्गापासून दूर चाललो आहेत. 11 देवा, तुझे सेवक, संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हाला त्या आज्ञा दिल्यास; तू म्हणालास, ‘तुम्ही जो प्रदेश ताब्यात घेऊन त्यात वास्तव्य करणार आहात तो वाया गेलेला देश आहे. तिथे राहणाऱ्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी तो अशुध्द झाला आहे; हा सर्वच प्रदेश त्या लोकांनी विटाळून टाकला आहे. आपल्या पापांनी ही भूमी त्यांनी अमंगळ केली आहे. 12 तेव्हा इस्राएल लोकांनो, तुमच्या मुलांशी त्यांच्या मुला-मुलींच्या सोयरिकी जुळवू नका. माझ्या आदेशांचे पालन करा म्हणजे तुम्ही बलशाली व्हाल आणि या भूमीवर चांगल्या गोष्टी भोगाल. हा प्रदेश आपल्या मुलाबाळांना सुपूर्द कराल.’
13 “आमच्यावर जी संकटे आली त्याला आम्हीच कारणीभूत आहोत. आम्ही दुर्वर्तन केले आणि त्याची आम्हाला खंत आहे. पण, परमेश्वरा, आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हाला केलेले शासन कमीच आहे. आम्ही जे भयंकर गुन्हे केले त्यांची जबरदस्त शिक्षा आम्हाला व्हायला हवी होती. आणि तू तर आमच्यापैकी काही जणांना बंदिवासातूनही सोडवलेस. 14 तेव्हा तुझ्या आदेशांचा भंग करता कामा नये हे आम्हाला कळले आहे. आम्ही त्या लोकांशी लग्नव्यवहार करता कामा नयेत. त्या लोकांमध्ये दुर्वर्तन फार आहे. आम्ही त्यांच्याशी लग्ने जुळवणे चालूच ठेवले तर तू आमचा नायनाट करशील मग मात्र इस्राएलांपैकी एकही माणूस जिवंत राहणार नाही.
15 “देवा, इस्राएलच्या परमेश्वरा, तू फार चांगला आहेस. तू आमच्यापैकी काहींना अजून जिवंत ठेवले आहेस. आम्ही अपराधी आहोत हे आम्हाला मान्य आहे. आमच्या पापाचारणामुळे आम्हाला तुझ्यापुढे उभे राहता येत नाही.”
दु:ख आनंदामध्ये बदलेल
16 “थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, नंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
17 त्याच्या शिष्यांतील काही जण एकमेकांस म्हणाले, “तो असे म्हणतो याचा अर्थ काय? थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही. मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. कारण मी पित्याकडे जात आहे!” 18 ते विचारतच राहिले, “‘थोड्या वेळाने याचा अर्थ काय?’ तो काय म्हणत आहे हे आम्हांला समजत नाही.”
19 येशूने पाहिले की, याविषयी त्यांना काही विचारायचे आहे. म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांना हे विचारीत आहात काय की, जेव्हा मी म्हणालो, ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, आणि मग थोडया वेळाने तुम्ही मला पाहाल?’ 20 मी तुम्हांला खरे सांगतो. जग आनंद करीत असताना तुम्ही रडाल आणि शोक कराल, तुम्ही दु:खी व्हाल, पण तुमचे दु:ख आनंदात बदलेल.
21 “जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते. पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते. कारण एक बाळ या जगात जन्म घेते. 22 त्याप्रमाणे तुम्हाला आता खरोखर दु:ख आहे, पण मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुम्ही आनंद कराल आणि कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही. 23 त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही, मी खरे सांगतो. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते माझा पिता तुम्हांला देईल. 24 आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल.
2006 by World Bible Translation Center