Revised Common Lectionary (Semicontinuous)
115 परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको.
सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि
आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
2 आमचा देव कुठे आहे,
याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
3 देव स्वर्गात आहे
आणि त्याला हवे ते तो करतो.
4 त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत.
कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
5 त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही.
त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
6 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही,
त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
7 त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही.
त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही
आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
8 ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात
ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.
9 इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
10 अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव.
परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
11 परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
12 परमेश्वर आमची आठवण ठेवतो.
परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल.
परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल.
परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
13 परमेश्वर त्याच्या लहान आणि
मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.
14 परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल.
अशी मी आशा करतो.
15 परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली
आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
16 स्वर्ग परमेश्वराचा आहे.
पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
17 मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
18 पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो
आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू.
परमेश्वराची स्तुती करा.
29 “अहरोन पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या न्यायाच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलच्या मुलांची नांवे कोरलेली असतील त्यामुळे परमेश्वराला इस्राएलच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील. 30 न्यायाच्या ऊरपटात तू उरीम व थूम्मीम ठेव अहरोन परमेशवरासमोर जाईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील. त्यामुळे इस्राएल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल.
याजकासाठी इतर वस्त्रे
31 “एफोदाबरोबर घालावयाचा झागा संपूर्ण निळया रंगाचा करावा; 32 त्याच्या मध्याभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोंवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही. 33 निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोंवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत; 34 त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरु अशी क्रमावर ती असावीत. 35 याजक या नात्याने माझी सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल; त्यामुळे तो मरावयाचा नाही.
36 “शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात त्याप्रमाणे तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत. 37 ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला (फेट्याला) समोरील बाजूस निव्व्या फितीने बांधावी; 38 ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी ह्यासाठी की ज्या भेटी इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतील त्यात जर काही दोष असेल तर तो त्याने काढावा; त्यामुळे ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील व अर्पिण्यास ती पात्र होतील.
पौलाची प्रार्थना
3 प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमची आठवण करतो, तेव्हा देवाचे आभार मानतो. 4 नेहमीच तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेच्यावेळी मी आनंदाने प्रार्थना करतो. 5 कारण अगदी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत सुवार्तेच्या कामात तुमचा सहभाग आहे. 6 मला याची खात्री आहे की, ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरु केले आहे, तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणीला.
7 तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य वाटते कारण तुम्ही माझ्या हृदयात आहात. आणि मी तुरुंगात असतानाच केवळ नव्हे तर जेव्हा मी सुवार्तेचे सत्य ठासून सिद्ध करीत होतो, तेव्हा ही देवाने जी कृपा मला दिली आहे त्यात तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वाटेकरी होता. 8 देव माझा साक्षी आहे, कारण ख्रिस्त येशूने जे प्रेम दाखविले त्यामुळे तुम्हां सर्वांसाठी मी अधीर झालो होतो.
9 आणि माझी हीच प्रार्थना आहे:
की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल. 10 मी अशी प्रार्थना करतो की, तुमच्याठायी हे गुण असावेत, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष ते तुम्ही निवडावे, आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, 11 आणि देवाच्या गौरवासाठी, स्तुति साठी आणि नीतिमत्त्वाचे फळ देण्यासाठी भरुन जावे.
2006 by World Bible Translation Center