Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र
47 लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा.
तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा.
2 सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे.
तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.
3 त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली.
त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.
4 देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली.
त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.
5 परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात
आपल्या सिंहासनाकडे जातो.
6 देवाचे गुणगान करा.
आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
7 देव सर्व जगाचा राजा आहे.
त्याच्या स्तुतिपर गाणे गा.
8 देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो.
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
9 देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात.
सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत.
देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे. [a]
मोशे देवाला भेटतो
15 मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला; 16 परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वर मोशेबरोबर ढगातून बोलला. 17 इस्राएल लोकांनी पर्वतावर परमेश्वराचे तेज पाहिले; ते पर्वताच्या शिखरावर भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे होते.
18 मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.
9 मी योहान आहे, आणि मी तुमचा बंधु आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टींमध्ये वाटेकरी आहोत. दु:खसहनात, राज्यात, धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो त्यामुळे मी पात्म [a] नावाच्या बेटावर होतो. 10 प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माझ्या मागे मी एक मोठा आवाज ऐकला. तो आवाज कर्ण्यासारखा ऐकू आला. 11 तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू पुस्तकात लिही, आणि सात मंडळ्यांना पाठव: इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया.”
12 माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, जेव्हा मी मागे वळालो, तेव्हा मी सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या. 13 मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले जो “मनुष्याच्या पुत्रासारखा” होता. त्याने लांब पायघोळ झगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता. 14 त्याचे डोके आणि केस बरफासारख्यापांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. 15 त्याचे पाय भट्टीत गरम झाल्यानंतर चमकणाऱ्या पितळासारखे होते. त्याचा आवाज पुराचे पाणी जसा आवाज करते तसा होता. 16 त्याच्या उजव्या हातात सात तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली. तो दिवसाच्या मध्यान्ही अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.
17 जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे, 18 मी मेलो होतो, पण पाहा; मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत.
2006 by World Bible Translation Center