Revised Common Lectionary (Semicontinuous)
यहूदी नसलेल्यांवर पवित्र आत्मा येतो
44 पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा आला. 45 यहूदी विश्वासाणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले. यहूदी नसलेल्या लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतला गला, यामुळे ते चकित झाले. 46 आणि यहूदी नसलेल्या लोकांना निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुति करताना यहूदी लोकांनी पाहिले. 47 मग पेत्र म्हणाला, “या लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हांला मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.” 48 म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्याला विनंति केली.
स्तुतिगान
98 परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या
म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
त्याच्या पवित्र उजव्या बाहूने
त्याच्याकडे विजय परत आणला.
2 परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली.
परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
3 त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला.
दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
4 पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर.
त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
5 वीणे, परमेश्वराची स्तुती करा.
वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.
6 कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे,
परमेश्वराचे गुणवर्णन करा.
7 समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना
जोर जोरात गाऊ द्या.
8 नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो,
सगळ्यांनी बरोबर गाणे गा.
9 परमेश्वरासमोर गा.
कारण तो जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने राज्य करेल,
तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.
देवाची मुले जगाविरुद्ध विजयी होतात
5 प्रत्येकजण जो विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे तो देवाचे मूल झालेला आहे. आणि प्रत्येकजण जो पित्यावर प्रीति करतो तो त्याच्या मुलावरही प्रीति करतो. 2 अशा प्रकारे आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या पुत्रावर प्रीति करतो: देवावर प्रीति करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने. 3 देवाप्रती असलेली आमची प्रीति आम्ही त्याच्या आज्ञापालनाकडून दाखवू शकतो आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत. 4 कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो, आणि यामुळे आम्हांला जगावर विजय मिळाला: आमच्या विश्वासाने. 5 येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?
देवाने आम्हाला त्याच्या पुत्राविषयी सांगितले
6 येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला, व आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे.
9 “जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीति केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. 10 ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतित राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. 11 माझा आनंद तुम्हांमध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. 12 जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. ही माझी आज्ञा आहे. 13 आपल्या मित्रासाठी मरावे, यापेक्षा कोणाचीही प्रीति मोठी नाही. 14 मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात. 15 आता मी तुम्हांला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हांला मित्र म्हणतो कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हांला कळविल्या आहेत.
16 “तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि नेमले आहे. यासाठी की, तुम्ही जाऊन फळ द्यावे. आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांस द्यावे 17 तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांस आज्ञा देऊन सांगतो.
2006 by World Bible Translation Center