Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
आणि आम्हाला वाचव.
4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
आमचे शत्रू आम्हाला हसतात.
7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
8 भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
9 तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
नवीन काल येत आहे
17 “मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन.
लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत.
त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.
18 माझे लोक सुखी होतील.
ते अखंड आनंदात राहतील का?
मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल.
मी यरूशेमला आनंदाने भरून टाकीन
आणि त्यांना सुखी करीन.
19 “मग यरूशलेमबरोबर मलाही आनंद होईल.
मी माझ्या लोकांबरोबर सुखी होईन.
त्या नगरीत पुन्हा कधीही आक्रोश
व दु:ख असणार नाही.
20 तेथे पुन्हा कधीही अल्पायुषी मुले जन्माला येणार नाहीत.
त्या नगरीत कोणीही माणूस अल्प वयात मरणार नाही.
आबालवृध्द् दीर्घायुषी होतील.
शंभर वर्षे जगणाऱ्याला तरूण म्हटले जाईल.
पण पापी माणूस जरी शंभर वर्षे जगला तरी त्याच्यावर खूप संकटे येतील.
21 “त्या नगरीत घर बांधणाऱ्याला त्या घरात राहायला मिळेल.
आणि द्राक्षाचा मळा लावणाऱ्याला त्या मळ्यातील द्राक्षे खायला मिळतील.
22 एकाने घर बांधायचे व त्यात दुसऱ्याने राहायचे किंवा
एकाने द्राक्ष मळा लावायचा व दुसऱ्याने
त्या मळ्यातील द्राक्षे खायची
असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही.
माझे लोक वृक्षांएवढे जगतील.
मी निवडलेले लोक, त्यांनी स्वतः तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
23 स्त्रियांना बाळंतपणाचा त्रास कधीच होणार नाही.
बाळंतपणात काय होईल ह्याची त्यांना भिती वाटणार नाही.
परमेश्वर माझ्या सर्व लोकांना व त्यांच्या मुलांना आशीर्वाद देईल.
24 त्यांनी मागण्या आधीच त्यांना काय पाहिजे ते मला समजेल.
आणि त्यांचे मागणे पुरे होण्याआधीच मी त्यांना मदत करीन.
25 लांडगे आणि कोकरे,
सिंह आणि गुरे एकत्र जेवतील.
माझ्या पवित्र डोंगरावरील कोणाही माणसाला जमिनीवरचा साप घाबरविणार नाही.
अथवा चावणार नाही.”
परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.
18 “मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. 19 आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. 20 त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे. 21 ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वतःला त्याच्यासाठी प्रगट करीन.”
22 मग यहूदा (यहूदा इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “पण प्रभु, तू आम्हांसमोर स्वतःला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?”
23 येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू. 24 जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”
25 “मी तुम्हांजवळ राहत असतानाच तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत. 26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.
27 “शांति मी तुमच्याजवळ ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका. 28 ‘मी जातो आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे. 29 मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.
30 “मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही. 31 परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीति करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो.
“चला आता, आपण निघू या.”
2006 by World Bible Translation Center