Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
आणि आम्हाला वाचव.
4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
आमचे शत्रू आम्हाला हसतात.
7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
8 भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
9 तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
कठीण काळ येत आहे
9 तुम्ही काही स्त्रिया आता शांत आहात. तुम्हाला आता सुरक्षित वाटते आहे. पण तुम्ही जरा उभे राहून माझे म्हणणे ऐकावे. 10 आता तुम्हाला सुरक्षित वाटते पण आणखी एक वर्षाने तुम्ही अडचणीत याल. का? कारण तुम्ही पुढच्या वर्षी द्राक्षे गोळा करू शकणार नाही. पुढच्या वर्षी द्राक्षाचे पीक येणार नाही.
11 स्त्रियांनो, आता तुम्ही शांत आहात पण तुम्हाला भिती वाटली पाहिजे. आता तुम्हाला सुरक्षित वाटते, पण तुम्ही चिंता केली पाहिजे. तुमची चांगली वस्त्रे काढा आणि शोकप्रदर्शक कपडे घाला. ते कपडे तुमच्या कमरेभोवती गुंडाळा. 12 दु:खाने भरलेल्या छातीवर शोकप्रदर्शक कपडे चढवा. रडा! कारण तुमची शेते उजाड झाली आहेत. तुम्हाला द्राक्षे देणारे तुमचे द्राक्षमळे ओस पडले आहेत. 13 माझ्या लोकांच्या भूमीसाठी शोक करा. कारण तेथे फक्त काटेकुटे आणि तण माजतील. एकेकाळी आनंदाने भरलेल्या शहरासाठी व हर्षभरित घरांसाठी आता शोक करा.
14 लोक राजधानी सोडून जातील. राजवाडा व बुरूज रिकामी पडतील. लोक घरांत न राहता गुहेत राहतील. रानगाढवे व मेंढ्या शहरात राहतील. जनावरे गवत खाण्यास तेथे जातील.
15-16 देव वरून त्याचा आत्मा आम्हांला देईपर्यंत असेच घडत राहील. आता या भूमीवर चांगुलपणा राहिला नाही. ही भूमी जणू वाळवंट झाली आहे. पण भविष्यात, ते वाळवंट कर्मेल प्रमाणे होईल. तेथे योग्य न्याय नांदेल आणि कर्मेल हिरव्यागार रानासारखे होईल. चांगुलपणा तेथे वस्ती करील. 17 तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील. 18 माझे लोक शांतीच्या सुंदर मळ्यात राहतील. माझी माणसे सुरक्षिततेच्या तंबूत राहतील. ते निवांत आणि शांत जागी राहतील.
19 पण ह्या गोष्टी घडण्यापूर्वी जंगल उजाड झालेच पाहिजे, शहराचा पाडाव झाला पाहिजे. 20 तुम्ही काहीजण प्रत्येक झऱ्याकाठी बी पेरा. तुमच्या गुरांना आणि गाढवांना मोकळे सोडा. व तेथे चरू द्या. तुम्ही लोक खूप सुखी व्हाल.
17 पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शांतिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते. 18 जे लोक शांततेच्या मार्गाने शांति स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ, नीतिपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो.
2006 by World Bible Translation Center