Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
आणि आम्हाला वाचव.
4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
आमचे शत्रू आम्हाला हसतात.
7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
8 भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
9 तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
इस्राएल देवाचे नंदनवन
5 मी माझ्या मित्रासाठी (देवासाठी) गाणे गाईन. हे गाणे, माझ्या मित्राच्या द्राक्षमळ्याच्या (इस्राएलच्या) प्रेमासंबंधी असेल.
माझ्या मित्राचा द्राक्षमळा अतिशय
सुपीक जमिनीत होता.
2 माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली.
तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली.
त्याने मळ्याच्या मध्यभागी
एक मनोरा बांधला.
द्राक्षाचे उत्तम पीक येईल अशी त्याला आशा होती
पण त्यातून निकृष्ट प्रतीचीच फळे आली.
3 म्हणून देव म्हणाला, “यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनो व यहूदात राहणाऱ्या लोकांनो,
माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा जरा विचार करा.
4 माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी आणखी काय करू शकलो असतो?
मला जे करणे शक्य होते ते सर्व मी केले
मी चांगल्या पिकाची आशा केली
पण पीक वाईट आले.
असे का झाले?
5 “आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे
ते तुम्हाला सांगतो.
मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढून
मी जाळून टाकीन.
त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून
दगड पायाने तुडवीन.
6 मी माझा द्राक्षमळा उजाड करीन.
कोणीही वेलीची काळजी घेणार नाही.
कोणीही त्या मळ्यात काम करणार नाही.
त्यात तण व काटेकुटे माजतील.
तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
7 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मालकीचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल हा देश होय. ज्या द्राक्षवेली परमेश्वराला प्रिय आहेत त्या म्हणजे यहुदी लोक होत.
परमेश्वराने न्यायाची आशा केली
पण तेथे फक्त हत्याच घडली.
परमेश्वराने प्रामाणिकपणाची आशा धरली
पण तेथे फक्त वाईट रितीने वागविलेल्या लोकांचे आक्रोश होते.
आत्मा आणि मानवी स्वभाव
16 पण मी म्हणतो: तुम्ही आत्म्यात चाला, आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही. 17 कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे, आणि आत्मा जी इच्छा करतो, ती देहाविरुद्ध आहेत. परिणाम म्हणून तुम्हांला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही. 18 पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.
19 देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे, जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, 20 मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी, मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद, 21 दारुबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मी तुम्हांला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हांला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही. 22 पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, 23 सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र नाही. 24 जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहस्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे. 25 जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसा चालवितो तसे आम्हीसुद्धा त्याच्यामागे चालू या. 26 आम्ही पोकळ बढाई मारणारे, एकमेकांना चीड आणणारे, एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.
2006 by World Bible Translation Center