Revised Common Lectionary (Semicontinuous)
इथिओपियाच्या मनुष्याला फिलिप्पा शिक्षण देतो
26 देवाचा दूत फिलाप्पाशी बोलला, तो म्हणाला “तयार हो आणि दक्षिणेकडे जा, यरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा-तो रस्ता वाळवंटातून जातो.”
27 मग फिलिप्प तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. 28 आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशया संदेष्टयाचे पुस्तक वाचत होता.
29 पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!” 30 मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले, फिलिप्प त्याला म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात, त्याचा अर्थ तुम्हांला कळतो का?”
31 तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करुन मला सांगायला हवे.” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. 32 पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता, तो भाग पुढीलप्रमाणे होता:
“वधायला नेत असलेल्या मेंढरासारखा तो होता.
लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत राहिला.
त्याने आपले तोंड उघडले नाही.
33 त्याला लज्जित केले गेले, त्याचे हक्क काढून घेतले गेले.
त्याच्या पिढीविषयी कोणतीही गोष्ट पुढे वर्णीली जाणार नाही.
कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.” (A)
34 तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “क्रुपा करुन मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसन्या कोणाविषयी बोलत आहे?” 35 मग फिलिप्पाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करुन येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.
36 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ) आले. अधिकारी म्हणाला, “पहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” 37 [a] 38 आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरुन पाण्यात गेले आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला. 39 जेव्हा ते पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. 40 आपण अजोत नगरात आहोत असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरीयाला गेला.
25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले.
त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील.
जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी.
तुमचे ह्रदय सदैव आनंदी राहो.
27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो.
आणि ते परमेश्वराकडे परत येवोत.
सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.
28 का? कारण परमेश्वरच राजा आहे
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन
देवापुढे नतमस्तक झाले आहेत.
तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत
व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील.
लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.
31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत
त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.
प्रीति देवापासून येते
7 प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण 8 जो प्रीति करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीति आहे. 9 अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीति दर्शविली: त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे. 10 आम्ही देवावर प्रीति केली असे नाही तर त्याने आम्हांवर प्रीति केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्र्चित्त म्हणून पाठविले; यामध्ये खरी प्रीति आहे.
11 प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आम्ही एकमेकांवर प्रीति केलीच पाहिजे. 12 देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीति करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्याची आम्हांवरील प्रीति पूर्णत्वास आणलेली आहे.
13 अशा प्रकारे आम्हांला समजू शकते की देव आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो: त्याने त्याचा आत्मा आमच्यात राहू दिला आहे. 14 ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा होण्यासाठी पित्याने पुत्राला पाठविले आहे. 15 जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतो तर देव त्या व्यक्तीमध्ये राहतो आणि ती व्यक्ति देवामध्ये रहाते. 16 आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीति आहे.
आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो 17 अशा प्रकारे आमच्याबाबतीत प्रीति पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढविश्वास प्राप्त व्हावा. अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्या जीवनासारखे आहे. 18 प्रीतीमध्ये कोणतीही भिति नसते. उलट पूर्ण प्रीति भीतीला घालवून देते. प्रीति शिक्षेशी संबंधित आहे. आणि जो भीतीमय जीवन जगतो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही.
19 आम्ही प्रीति करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीति केली. 20 जर एखादा म्हणतो, “मी देवावर प्रीति करतो,” पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीति करीत नाही. तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीति करु शकत नाही! 21 आम्हांला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे: जो देवावर प्रीति करतो त्याने त्याच्या भावावर प्रीति केलीच पाहिजे.
येशू द्राक्षवेल आहे
15 मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. 2 तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो. 3 जे वचन मी तुम्हांला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहा. 4 तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावचून त्याच्याने फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांला फळ देता येणार नाही.
5 “मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा, जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. 6 कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते. 7 तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हांस मिळेल. 8 तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते, आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
2006 by World Bible Translation Center